Goa Politics: खरी कुजबुज, सरकारी खाती झोपतात?

Khari Kujbuj Political Satire: नियोजित तिसऱ्या जिल्ह्यातून फोंडा तालुक्याला वगळण्याचे संकेत मिळायला लागल्यामुळे फोंड्यातील कृषिमंत्री रवी नाईक यांच्या कार्यकर्त्यांत याचे जोरदार पडसाद उमटू लागले आहेत.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

सरकारी खाती झोपतात?

दोना पावला येथील आयटी विभागाच्या जागेतील अतिक्रमण सोमवारी पोलिस बंदोबस्तात हटवले. आयटी विभागाला हे अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व सोपस्कार पार पाडावे लागले, हा कायद्याचा भाग. परंतु त्या जागेत कोणी अतिक्रमण केले होते, हे सर्वज्ञात होते. सरकारातील मंत्र्यांनाही त्याची कल्पना होती, परंतु अखेर कारवाई झाल्यानंतर याविषयी फारशी वाच्यता होऊ नये याची काळजी घेण्यात आली. विशेष बाब म्हणजे आयटी विभागाच्या जागेत शेडची व एक इमारत उभारली जाईपर्यंत कोणालाच याबाबत कशी काय कल्पना नव्हती, हे आश्चर्यच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून त्या ठिकाणी उद्यान निर्मितीचे कामही केले जाणार होते, असे आता सांगितले जात आहे. मागील काही महिन्यांपूर्वी ‘लाला की बस्ती’चे प्रकरण गाजले होते. त्यामुळे सरकारी खाती आपापल्या खात्याच्या जागांबाबत पाहणी किंवा तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच अशाप्रकारे जागा लाटण्याचे प्रकार घडतात असे म्हणता येऊ शकते.

रवींना डावलण्याचे षडयंत्र?

नियोजित तिसऱ्या जिल्ह्यातून फोंडा तालुक्याला वगळण्याचे संकेत मिळायला लागल्यामुळे फोंड्यातील कृषिमंत्री रवी नाईक यांच्या कार्यकर्त्यांत याचे जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. तिसऱ्या जिल्ह्यात फोंडा तालुका असणे हे रवींचे स्वप्न होते. गृहमंत्री असताना त्यांनी हे स्वप्न साकारायला सुरवात केली होती आणि आता ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना जर त्यांच्या फोंड्यालाच वगळले गेले, तर तो त्यांना धक्का ठरू शकतो असे बोलले जात आहे. त्यांना डावलण्याचे हे षडयंत्र असल्याचे शेरेही मारले जात आहेत. या राजकारणामागे २०२७ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी हे सध्या भाजप उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. भाजपचे काही राज्यस्तरीय नेते त्यांना या उमेदवारीसाठी प्रोजेक्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. यातूनच हे राजकारण शिजायला लागले आहे. हे आम्ही नाही, दळवींचे कार्यकर्तेच जाहीरपणे बोलत आहेत. आता हे खरे आहे की नाही हे सांगणे कठीण असले, तरी राजकारणात व त्यातल्या त्यात गोव्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते हे मात्र शंभर टक्के खरे आहे. नाही का? ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; ‘आओ-जाओ गोवा तुम्‍हारा?’

आता म्‍हणे तक्रारींचा वर्षाव

उदय भेंब्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वक्‍तव्‍य केल्‍यामुळे त्‍याचे पडसाद सगळीकडे उमटू लागले आहेत. यापूर्वी काहीजणांनी उदय भेंब्रे यांच्‍या समर्थनार्थ जाहीर सभा घेऊन बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्यांचा निषेध केला होता. आता उदय भेंब्रे यांचा निषेध करण्‍यासाठी आज कुंकळ्‍ळीत सभा होणार आहे. एका अर्थाने ही सभा म्‍हणजे शक्तिप्रदर्शच असेल यात दुमत नाही. आता म्‍हणे शिवप्रेमींनी गोव्‍यातील प्रत्‍येक तालुक्‍यात उदय भेंब्रे यांच्‍या विरोधात तक्रारी दाखल करण्‍याचे ठरविले आहे. याचाच अर्थ येत्‍या काही दिवसांत गोव्‍यातील विविध पोलिस स्‍थानकात भेंब्रे विरोधात तक्रारींचा वर्षाव होणार आहे. अशा परिस्‍थितीत भेंब्रे समर्थक कोणती भूमिका घेतात ते पाहणे गरजेचे आहे. भेंब्रे समर्थक हे आव्‍हान पेलणार का? ∙∙∙

बजरंग दलाचे हिंदुत्व

उदय भेंब्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, तेव्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन निषेध नोंदवला. त्यांच्या या वेगवान आणि ठाम कृतीचे काहींनी कौतुक केले, तर काहींनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. खाप्रेश्वर येथे घडलेला प्रकार धर्म आणि परंपरेशी संबंधित होता. मात्र, त्याप्रसंगी हेच बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर का नव्हते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रविवारी सुट्टी असूनही धर्मरक्षणासाठी ते का पुढे आले नाहीत, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. बजरंग दलाचे हिंदुत्व हे ठरावीक प्रसंगापुरते मर्यादित आहे का? किंवा केवळ काही विशिष्ट विषयांवरच त्यांचा आक्रमकपणा दिसून येतो का? हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भूमिका घेणारे कार्यकर्ते खरोखरच तळमळीने काम करतात की केवळ प्रसंगानुरूप वागतात, असे आता लोक बोलू लागले आहेत. ∙∙∙

दिलासा आणि विश्वासघात

पर्वरी येथील वटवृक्ष आणि मंदिर हटविण्याच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात आणि जनतेत चांगलीच चर्चा रंगली आहे. मंत्री रोहन खंवटे यांनी आपल्या वक्तव्यात २०१९ मध्येच येथील काही स्थानिकांनी मंदिर हटविण्यास हरकत नाही असे सांगितले होते. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांनी रविवारी भाविकांना दिलासा देत ‘मंदिर बांधल्याशिवाय मूर्ती हलवणार नाही’ असे ठामपणे सांगितले होते. मात्र, खरे नाट्य यानंतरच घडले! रात्री ३ वाजता अचानक मूर्ती हलवली गेली आणि सकाळी वटवृक्षही हटविण्यात आला. यामुळे भाविकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. ‘भाविकांची फसवणूक झाली’ हे स्पष्टच आहे, पण खरी फसवणूक कुणी केली? या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे रविवारी दिलेले आश्वासन आणि त्यानंतरच्या रात्री मूर्ती हटवण्याच्या घटनेने ‘रविवारी दिलासा आणि रात्री विश्वासघात’ असे चित्र निर्माण झाल्याची चर्चा पर्वरी परिसरात सुरू होती. ∙∙∙

पंचायत कर्मचाऱ्यांची मागणी

गोव्यात पंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपणाला सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे. वरकरणी ही मागणी योग्यच वाटते. कारण सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच पंचायत कर्मचारीही काम करत असतात. त्यामुळे सरकारी कर्मचारी जे वेतन घेतात तेच त्यांनाही मिळणे उचित आहे असे अनेकांना वाटते, पण मुद्याची गोष्ट म्हणजे पंचायत कर्मचारी हे स्थानिक म्हणजे पंचायत कक्षेतीलच असतात. त्यामुळे वर्षानुवर्षे ते एकाच ठिकाणी असतात. त्यामुळे त्यांचे विविध बाबतीत हितसंबंध तयार झालेले असतात. काही ठिकाणी तर हे कर्मचारीच पंचायतीत राजकारण खेळत असल्याचा आरोप होतो. त्याच कारणास्तव या लोकांचा एक कॅडर करून त्यांची अन्य पंचायतीत बदली करण्याची योजना मध्यंतरी आखली होती. त्यामुळे या मंडळींना वेतन व अन्य सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे हव्यात, पण अन्यत्र बदली नको अशी टीका झाली होती व नंतर त्या प्रश्नाचा पाठपुरावाही झाला नव्हता. आता पंचायत कर्मचारी संघटनेने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची मागणी करताना समान कॅडर व बदल्यांची अटही मान्य का करू नये असा मुद्दा उपस्थित झाला आहे. पंचायतमंत्र्यांनीही तो पुढे नेणे उचित ठरेल. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्री चुकले की, भेंब्रेचा तर्क खोटा?

वेरेकरांची संपर्क मोहीम

फोंड्यात काँग्रेसचे कार्य सध्या तळागाळात सुरू आहे. आवाज न करता मतदारांकडे संपर्क करण्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना करण्यात येत आहे. मात्र, त्याबाबत अजिबात खळखळ केली जात नसून वाच्यताही केली जात नाही. सध्या सत्तेवर असलेल्या भाजपाला आणि सरकार पक्षात सहभागी झालेल्या मगो पक्षाला फोंड्यात ही निवडणूक बरीच कठीण जाणार असल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. मागच्या दोन निवडणुकीत फोंड्याचे राजेश वेरेकर यांनी भरभक्कम मते मिळवली होती, तरीपण त्यांना विजय मिळवता आला नव्हता. आता यावेळी तरी राजेश वेरेकर यांना संधी द्यायला हवी, असे बरेच फोंडेकर बोलताना आढळत आहेत. राजेश वेरेकर हे शांत आणि निगर्वी व्यक्तिमत्त्व असल्याने त्यातच त्यांचे दिवंगत वडील माजी मंत्री असल्याने त्यांचा मतदारांशी चांगला संपर्क आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही स्थितीत बाजी मारण्याचा चंग राजेशबाबनी केला आहे. निवडणूक जरी लांब असली तरी या लढाईत काँग्रेस, भाजप आणि मगो यांच्यात चुरस निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ∙∙∙

गावकर पवित्र्यात

सावर्डेचे आमदार गणेश गावकर हेही सध्या मंत्रिमंडळ प्रवेशासाठी एक दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या समर्थक सरपंच, पंचांनी गावकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी जाहीरपणे केली होती. आता मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचाली गतिमान होणार असल्याने त्यांचे समर्थक गावकर यांच्या मंत्रिमंडळ समावेशाकडे डोळे लावून बसले आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com