मिलिंद म्हाडगुत
‘गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने चार वर्षांपूर्वी ग्राहकांकडून गॅस कनेक्शन देण्याकरता आगाऊ पैसे घेऊन मीटर्स बसवले; पण अजूनही बरेच ग्राहक फक्त हा गॅस पुरवठा कधी सुरू होणार याची प्रतीक्षाच करत आहेत. त्यामुळे सध्या हे मीटर्स 'शोपीस' बनले आहेत.
‘गॅस कनेक्शन’चा मोठा गाजावाजा करून या संस्थेने फोंडा शहरातील नागरिकांकडून आगाऊ पैसे घेऊन त्यांना ग्राहक बनवले होते. पाचशे ते तीन हजार रुपये एवढे पैसे प्रत्येक कुटुंबाकडून या संस्थेने आगाऊ घेतले होते. पाणी व विजेप्रमाणे घरात थेट गॅस पुरवठा होणार असल्यामुळे तसेच सध्या जे सिलिंडर मिळवण्याकरता बुकिंग करायला लागते तसेच सिलिंडरची वाट पाहत बसावे लागते, या कटकटीतून सुटका होणार असल्यामुळे बऱ्याच ग्राहकांनी या सेवेचे बुकिंग केले होते.
2020 पर्यंत ही कनेक्शने देण्यात येतील, असा वायदा करण्यात आला होता. पण, कोविडमुळे हा वायदा पुरा होऊ शकला नाही. आता कोविड महामारी संपूनही बराच काळ लोटला. अजूनही शहरातील बऱ्याच ग्राहकांना कनेक्शन्स देण्यात आलेली नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ग्राहकांना कनेक्शने देऊन शहरातच विषमता निर्माण केली आहे.
त्यामुळे आता नाही तर कधी, असा प्रश्न कनेक्शन्स न मिळालेल्या ग्राहकांना पडायला लागला आहे. संपर्क साधायचा म्हटले तर दिलेला फोन नंबर एक तर चालत नाही आणि वाजल्यास दुसऱ्या बाजूने कोणी घेताना दिसत नाही. त्यामुळे ग्राहकांना आता जावे तरी कुठे असा प्रश्न पडायला लागला आहे.
'ग्राहक मंच'कडे तक्रार करण्याची तयारी
मध्यंतरी ऑक्टोबरमध्ये या संस्थेच्या एका कर्मचाऱ्याने ज्या घरांना कनेक्शन मिळाले नाहीत तिथे येऊन पाहणी केली होती आणि त्यांना फेब्रुवारी 2023 पर्यंत कनेक्शने देण्याचे आश्वासन दिले होते. पण, अजूनही त्या आश्वासनाला मूर्त स्वरूप प्राप्त झालेले नाही.
‘गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेचे मुख्य कार्यालय पर्वरी येथे असल्याचे पैशांच्या पावतीवर दिलेल्या पत्त्याप्रमाणे दिसत असले तरी तिथेही प्रत्यक्ष संपर्क साधता येत नाही. त्यामुळे आगाऊ पैसे पाण्यात गेले की काय असे ग्राहकांना वाटायला लागले आहे.
घरात कनेक्शनची लाईन ओढलेली आहे; पण गॅस पुरवठा मात्र नाही अशी बऱ्याच ग्राहकांची स्थिती झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात असून काही जण ''ग्राहक मंच''चा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत.
‘गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने आमच्याकडून गॅस कनेक्शन देण्याकरता आगाऊ पैसे घेतले होते. हा पुरवठा थेट घरात होणार असल्यामुळे तसेच त्याचा दर सिलिंडरपेक्षा बराच कमी असल्यामुळे आम्ही पैसे भरून या संस्थेचे ग्राहक बनलो होतो. पण, आता चार वर्षे झाल्यामुळे हात दाखवून अवलक्षण असा प्रकार झाल्यासारखे दिसायला लागले आहे.
महादेव खानोलकर, ग्राहक, दुर्गाभाट फोंडा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.