
दिगंबर कामत यापूर्वी मंत्री, मुख्यमंत्रीही होते. पण त्यांच्यावर जनता दरबार घेण्याची पाळी आली नव्हती, ती आज आली आहे. २०२२ मध्ये कॉंग्रेस मधून भाजपमध्ये आल्यावर तीन वर्षांनी मंत्री झाल्यावर. नगरपालिका निवडणूक पाच ते सहा महिने बाकी असताना. सध्या दिगंबरबाबांना अनेक आरोपांनी ग्रासले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडप निधी वरुरून ते ‘बॅकफूट’वर आल्याचे दिसते. आजच्या त्यांच्या जनता दरबाराला तसा अल्प प्रतिसादच मिळाला, असे म्हणावे लागते. जे त्यांच्या घरी जाऊन आपल्या मागण्या मांडू शकले असते, तेच लोक उपस्थित होते.कार्यकर्ते सोडून इतर सामान्य लोकांची उपस्थिती अपेक्षित होती. विजय यांच्या जनता दरबाराला तर मोठी गर्दी होत असते. दिगंबरला ‘भिवपाची गरज आसा’ अशी चर्चा भाजपच्याच कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे. ∙∙∙
राजकारणात शब्दाने शब्द वाढत जात असतो. हळदोणे मतदारसंघात सोमवारी ‘माझे घर’ योजनेंतर्गत सरकारी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते. स्थानिक आमदार या नात्याने ॲड. कार्लुस फेरेरा यांनाही निमंत्रण होते आणि तेही उपस्थित राहिले. कॉंग्रेसच्या आमदारांसह ‘माझे घर’ योजनेबाबत विधानसभेत घेतलेली भूमिका सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे त्या योजनेच्या मंचावर फेरेरा पाहून अनेकांना आश्चर्यही वाटले. मुख्यमंत्र्यांनी हसत हसतच फेरेरा यांचा विरोध होता ना, अशी विचारणा केली. फेरेरा यांनीही मी कायदे नीट करा, असे सांगत होतो, असे सांगत वातावरण शक्य तितके हलके फुलके ठेवले. ∙∙∙
कोमुनिदाद, सरकारीसह खासगी जमिनीत तसेच १९७२ च्या सर्वे आराखड्यावर घरे बांधून राहिलेल्यांच्या नावांवर ती आतापर्यंत झालेली नव्हती. त्यामुळे अनेक कुटुंबांना स्वत:च्याच घरात ‘परक्या’सारखे रहावे लागत होते. अशा कुटुंबियांना आधार देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘माझे घर’ योजना राबवून अशी घरे कायदेशीर करण्यासंदर्भात गत पावसाळी अधिवेशनात विधेयके आणली आणि विरोधकांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी ती मंजुरही करून घेतली. त्यानंतर राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी दिलेल्या मान्यतानंतर या विधेयकांचे कायद्यात रुपांतरण झाल्यानंतर सोमवारपासून या योजनांचे अर्जही वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ‘माझे घर’ योजना केवळ जनतेला दिलासा देण्यासाठी आहे. या योजनेचा आगामी जिल्हा पंचायत किंवा विधानसभा निवडणुकांशी संबंध नसल्याचा दावा आतापर्यंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करीत होते. परंतु, सोमवारपासून पायाला भिंगरी लावून ते ज्या पद्धतीने अनेक मतदारसंघांत जाऊन अर्जांचे वितरण करीत आहेत ते पाहता खरोखरच या योजनेचा निवडणुकांशी संबंध नाही? असा प्रश्न अनेक मतदार भाजप कार्यकर्त्यांना विचारत आहेत. ∙∙∙
फोंड्यातील पालिका इमारतीच्या कार्यक्रमाला नगरविकासमंत्री विश्वजीत राणे आले होते. फोंडा मतदारसंघ हा रवींचा. पण काही कारणास्तव रवी पात्राव कार्यक्रमाला आले नव्हते. पण विश्वजित राणे यांनी भाषणबाजी झकास केली. आपल्या भाषणात त्यांनी रवींचे कौतुकही केले. रवी नाईक आणि आपल्या वडिलांचे चांगले संबंध होते, आपले वडील आजारी असताना रवी नाईक यांनी मुंबईहून खास डॉक्टरला बोलावले, ते त्यांचे उपकार आपण विसरू शकत नाही, असे सांगताना ज्येष्ठांचा आदर करा, असे युवावर्गाला सांगायला ते विसरले नाहीत. ∙∙∙
आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे काल कार्यक्रमानिमित्त फोंड्यात आले होते. त्यांनी सांगितले, मंत्र्यांनीही वेळ पडली तर जनतेची माफी मागण्याची तयारी ठेवायला हवी, त्यांनीही नम्र असायला हवे, असे सांगून कृषिमंत्री रवी नाईक यांचे उदाहरण दिले. आपण याचकरता रवींना मानतो, असेही ते बोलून गेले. ज्या थोड्या लोकांना आपण मानतो त्यात रवींचा नंबर असल्याचीही पुस्ती त्यांनी जोडली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अनेकांना २००७ सालची आठवण झाली. त्यावेळी रवीना मुख्यमंत्री होण्यास विरोध करणाऱ्यांत विश्वजितही होते, असे बोलले जात होते. तेच विश्वजित आज ‘पात्रांव’वर स्तुती सुमनांचा वर्षाव करताना दिसत असल्यामुळे या मागचे ‘गिमिक्स’ काय असा प्रश्न उपस्थित लोक विचारू लागले. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, तसा मित्रही नसतो, हे जरी खरे असले तरी ही नव्या समीकरणाची नांदी तर नव्हे ना, अशी चर्चा कार्यक्रमानंतर दबक्या आवाजात सुरू झाल्याचे ऐकू येत होते. ∙∙∙
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी चोपडे चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली. आता त्याच चौकात भगवान परशुराम यांचा पुतळा उभारावा, यासाठी मांद्रे मतदारसंघात जोरात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे तेथे नेमका कोणाचा पुतळा बसवला जाणार, असा प्रश्न चर्चेत आला आहे. आरोलकर यांच्या घोषणेमुळे कोण नाराज झाले याकडे आमदार समर्थकांचे लक्ष आहे. या निमित्ताने एरव्ही दुर्लक्षित असलेला चोपडेचा चौक सध्या चर्चेत आला आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी मांद्रेचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले म्हणून त्यांचा पुतळा उभारावा, असाही सूर या निमित्ताने ऐकू येऊ लागला आहे. ∙∙∙
राज्यात तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा झाली, पण अजूनही तो अस्तित्वात आलेला नाही. अजूनही त्याविषयीची प्रशासकीय कार्यवाही संथगतीने सुरू असल्यासारखे दिसते. सध्या कळंगुटच्या माजी आमदाराला कळंगुट नगरपालिका होईल, असे वाटते. तसे पाहिले तर त्यात तथ्यही आहे. कळंगुटचा विस्तार आणि पंचायतीचे उत्पन्न पाहता तेथे नगरपालिका अस्तित्वात येऊ शकते. परंतु यापूर्वी पर्वरीतील विस्तार आणि आस्थापने, सरकारी कार्यालये पाहता या भागाचे नगरपालिकेत रुपांतर होईल, अशीही चर्चा होती. मात्र, नगरपालिका झाल्यास काय अडचणी असतात, हे त्या-त्या ठिकाणच्या आमदारांना पूर्ण कल्पना आहे. त्याशिवाय पंचायतीत जसा हस्तक्षेप करता येतो, तेवढ्या मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप नगरपालिकांत करता येत नाही, हे सांगायला नको. उदाहरण द्यायचे झाले तर ताळगावचे आहे. पणजीत हा भाग समाविष्ट करण्याचा घाट घातला जात होता, तेव्हा त्याला ताळगावच्या लोकांनी आणि सध्याच्या पणजीच्या आमदारांनी विरोध केला होता, तो विरोध कशासाठी, हे ताळगावात गेल्यावर कळते. त्यामुळे कळंगुटला नगरपालिका करण्याचा घाट घातल्यास त्याला विरोध होणार,की त्या प्रस्तावाचा स्वीकार होणार हे येणाऱ्या काळात कळेलच. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.