
फोंडा: धारबांदोडा ग्रामपंचायतीच्या माटवाडा, ओकंब, पिळये गावात आयआयटी कॅम्पस आणि इतर मेगा प्रकल्पांसाठी प्रस्तावित भूसंपादन करण्यास ग्रामस्थांनी रविवारी ग्रामसभेत तीव्र आक्षेप घेतला. हे भूसंपादन झाल्यास अनुसूचित जमाती समुदायाच्या उपजीविका आणि सांस्कृतिक वारसा, पर्यावरण, वन्यप्राण्यांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
स्थानिक परिसंस्था आणि आदिवासी संस्कृतीचा कणा असलेले हे जंगल आहे.त्यामुळे धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील नियोजित आयआयटी प्रकल्पाला मटवाडा,ओकांब,पिळये भागातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. ३१९ ग्रामस्थांच्या सह्यांसह ठरावाची आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, मुख्यसचिव, महसूलमंत्री, स्थानिक आमदारांना पाठविण्याचे ग्रामसभेत ठरले.
यावेळी सरपंच विनायक गावस, पंच सदस्य सुचिता गावस, महेश नाईक, मालू गवळी, गुरू गावकर, रवींद्र गावकर, कविता गावकर, दामोदर नाईक, स्वाती गावस, पंचायत सचिव लक्ष्मण खुटकर, सभेच्या पर्यवेक्षक म्हणून धारबांदोडा गट विकास अधिकारी कार्यालयातील ग्रामसेविका ट्रिकल माईणेकर उपस्थित होत्या.
ग्रामस्थांनी सांगितले की, भू संपादन केल्यास नंतर होणारी जंगलतोड पर्यावरणीय ऱ्हासास कारणीभूत ठरतील. तसेच आदिवासींच्या ताब्यात काही भूखंड आहेत. निरक्षरता व प्रतिनिधित्वाच्या अभावामुळे प्रत्यक्ष आदिवासी जमीन वापरकर्त्यांची नावे नोंदविण्यात आली नाहीत, जी चूक आहे.
ग्रामसभेत ग्रामस्थांनी सांगितले, की या जमिनी केवळ स्थानिक जैवविविधतेला आधार देत नाहीत तर राज्याच्या पर्यावरणीय स्थिरतेलाही हातभार लावतात. येथे पारंपरिक जलस्रोत, दूधसागर नदी आणि त्याच्याशी जोडलेले विविध नाले. काही ठिकाणी पवित्र देवता (राखणदार), श्रीकृष्णाचे मंदिर, सती देवीचे मंदिर, राखण्यांचे मंदिर, जुनाचो आजो पेड़, गुरुभूमी मंदिर आहेत. आम्ही शैक्षणिक विकासाच्या विरोधात नाही, पण विकास विनाशाच्या किमतीवर येऊ नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.