

केपे: धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी)चा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या २३ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू असून केंद्र सरकारकडे सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. तरीही समाजाला न्याय मिळालेला नसल्याची खंत केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर यांनी व्यक्त केली. ‘गाव चलो अभियान’द्वारे राज्यभर जनजागृती सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
केपे तालुका धनगर समाजाच्या वतीने तिळामळ येथे आयोजित ‘गाव चलो अभियान’ सभेत कवळेकर बोलत होते. आपल्या आमदारकीच्या काळात प्रत्येक अधिवेशनात एसटी दर्जाच्या मागणीसाठी आवाज उठविल्याचे सांगत, गेल्या साडेचार वर्षांत ही मागणी विधानसभेत प्रभावीपणे मांडली गेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
समाजाने एकजूट कायम ठेवून युवकांनी या लढ्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लक्ष्मण कवळेकर आणि वाघा मिसाळ यांनीही सरकारवर नाराजी व्यक्त करत धनगर समाजाची प्रलंबित मागणी तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.
तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार!
तांत्रिक कारणांमुळे ‘एसटी’ दर्जा मिळण्यास उशीर झाला असला, तरी आमचा हक्क मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. ‘एसटी’ दर्जा पदरात पडेपर्यंत धनगर बांधवांचा संघर्ष सुरूच राहणार, असे गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी स्पष्ट केले आहे.
धनगर समाजाला ‘एसटी’ दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असून, त्यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. धनगर समाजाने संघटित राहावे, असे आवाहन डिचोली तालुका समितीतर्फे कासारपाल येथील श्री संदीपक सभागृहात आयोजित मेळाव्यात बाबू कवळेकर यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.