Vijayadurga Idol In Zuari River सांकवाळ येथे झुआरी नदीच्या पात्रामध्ये सापडलेली श्री विजयादुर्गा देवीची प्राचीन मूर्ती सरकारच्या ताब्यात देण्यास भाविकांनी नकार दिला आहे. मूर्ती ताब्यात देण्यासंबंधीची नोटीस त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी होत आहे.
सध्या मूर्ती सांकवाळ येथील डॉ. कालिदास वायंगणकर यांच्या घरात विधीवत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याला त्या मूर्तीसंबंधी जी काही तपासणी करावयाची आहे ती त्यांनी डॉ. वायंगणकर यांच्या निवासस्थानी करावी, अशी विनंती केली आहे.
मुरगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ही मूर्ती चोवीस तासांमध्ये पुरातत्व खात्याकडे सोपविण्यात यावी, अशा आशयाचे निर्देश देणारे पत्र बुधवार, 24 रोजी दिले होते.
त्यामुळे मूर्ती नेण्यास विरोध करण्यासाठी तेथे भाविक जमा झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक सुभाष वेलिंगकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे राज्य अध्यक्ष नितीन फळदेसाई, भारत माती की जय संघाच्या धर्मजागरण प्रकोष्टाचे प्रतिनिधी राजेंद्र वेलिंगकर, करणी सेनेचे गोवा प्रमुख संतोषसिंह राजपूत व इतरांनी डॉ. वायंगणकर यांच्या निवासस्थानाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी तेथील एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मूर्तीची श्रीक्षेत्र शंखावलीत प्रतिष्ठापना करण्यावर चर्चा झाली.
प्रतिष्ठापना सांकवाळ येथेच करा: कर्णी सेना
सांकवाळ येथे सापडलेल्या विजयदुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सांकवाळ येथेच करावी, अशी मागणी कर्णी सेना गोवा या संघटनेने सरकारला केली आहे.
कर्णी सेनचे सचिव संतोष सिंग राजपूत म्हणाले, की विजयदुर्गा देवीची मूर्ती ही हिंदू लोकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे.
ती मूर्ती पुरातत्व खात्याने संग्रहालयात न ठेवता तिची रितसर प्रतिष्ठपना सांकवाळ येथेच करावी. हिंदू देवी देवतांची मूर्त्या जेव्हाही सापडतात तेव्हा त्या लगेच संग्रहालयात ठेवल्या जातात.तिथे त्यांची पूजा अभिषेक होत नाही.
सरकारने असे न करता, सापडलेल्या मूर्त्यांची त्याच जागी प्रतिष्ठापना करावी. पत्रकार परिषदेवळी गोवा कर्णी सेनेचे अध्यक्ष योगेश नाईक आणि कर्णी सेनचे सचिव संतोष सिंग राजपूत उपस्थित होते.
सरकारने मूर्ती ताब्यात घेऊन ती कोपऱ्यात ठेवण्यापेक्षा तिची दुरुस्ती करून तिची स्थापना करण्यास नागरिकांनी सहकार्य करावे.
पोर्तुगिजांनी शांखवाळचे मंदिर पाडून चर्च बांधले नाही त्यामुळे ही जागा हिंदूंच्या ताब्यात देऊन तिचा धार्मिक स्थळ म्हणून विकास करावा. धार्मिक भावना दुखविण्याचा प्रयत्न करू नये.
- प्रा. सुभाष वेलिंगकर
दाव्याला मिळाली पुष्टी
दरम्यान, डॉ. वायंगणकर यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राला उत्तर दिले आहे. त्यांनी या पत्रामध्ये प्राचीन विजयादुर्गा मंदिरासंबंधी तसेच त्यानंतरच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला आहे.
जी मंदिरे पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केली होती. त्यासंबंधीची माहिती गोवा सरकारने मागितली होती. त्यासंबंधी आपण यापूर्वीच अर्ज केला आहे. आता मूर्ती सापडल्याने या दाव्याला पुष्टी मिळाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.