
पणजी: दाबोळी विमानतळावर मॉक ड्रिल करण्यात आले, तसेच आयओसीएल टर्मिनल वास्को येथे नागरी संरक्षण मॉक ड्रिल केले. उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी सांगितले की, मॉक ड्रिल यशस्वी झाले. तत्पूर्वी तयारीचा आढावा घेण्यात आला. दुपारी ४ वाजता, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वास्को येथील आयओसीएल टर्मिनल येथे उच्च-तीव्रतेच्या नागरी संरक्षण मॉक ड्रिलचे आयोजन केले.
गृह मंत्रालयाने राज्यातील दोन्ही जिल्ह्यांना नागरी संरक्षण जिल्हे म्हटले आहे. एनसीसी, एनएसएस, गृह रक्षक दल, आपदा मित्र यांनी आपत्कालीन स्थितीत कशा प्रकारे काम करणे आवश्यक आहे, यासाठीची मॉक ड्रिल ही तयारी आहे. उपजिल्हाधिकारी भगवंत करमली आणि मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी मुरगाव तालुक्यातील बंदर, दाबोळी येथील माॅक ड्रीलची धुरा सांभाळली.
दुपारची चारची वेळ होती, नेहमीप्रमाणे मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी होती. इतक्यात सायरनचा भोंगा वाजला व प्रवाशांमध्ये चलबिचल सुरू झाली. नंतर हा मॉक ड्रिलचा प्रकार असल्याचे सर्वांना समजल्यावर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.
कोकण रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी कडक बंदोबस्तात मॉक ड्रिल घेण्यात आले. यात ७९ एजन्सी सहभागी झाल्या होत्या. एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक, मडगाव उपजिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी, पोलिस, कोकण रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बळ, क्रीडा संचनालय खात्याचे कर्मचारी, अग्निशामक दळ, वाहतूक पोलिस, आरोग्य खाते आदींचाही समावेश होता.
पत्रकारांना उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी माहिती देताना एकूण ४० अपघाताच्या घटना घडल्या, १५ जण अडकून पडले. दोन गंभीर जखमी झाले, त्यांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले, तर ८ जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले. अर्थात हा मॉक ड्रिलचा भाग होता.
दाबोळी विमानतळावर बुधवारी (ता.७) सायंकाळी मॉक ड्रिल करण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये गोवा पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, एनसीसी कॅडेट, अग्निशमन दल वगैरेंना सामावून घेण्यात आले होते. या मॉक ड्रिलमुळे दाबोळी विमानतळावरील दोन विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले, अशी माहिती दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक जॉर्ज वर्गिस यांनी दिली.
येथील दाबोळी विमानतळाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. सायंकाळी चार वाजता त्या इमारतीच्या एका भागाला आग लागल्याने भोंगा वाजू लागला. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्याची धावपळ सुरु झाली.
यावेळी तेथे पोचलेल्या अग्निशमन दलाने त्वरित आग विझविण्याचे काम सुरू केले. त्या इमारतीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनाही इमारतीबाहेर काढण्याचे काम सुरू झाले. जे गुदमरले होते, त्यांना स्ट्रेचर घालून तसेच उचलून बाहेर आणण्यात आले. त्यांना रुग्णवाहिकेमधून घालून उपचारासाठी नेण्यात आले. एकंदर नियोजनानुसार सदर मॉक ड्रिल झाले.
पाकिस्तानने अचानक आगळीक केल्यास देशात युद्धसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. तसे झाल्यास सुरक्षा यंत्रणांवर जबाबदारी वाढेल. या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्यात युद्धसज्जतेचा सराव करण्यात आला. काही ठिकाणी सरावात गांभीर्य दिसून आले, तर काही ठिकाणी केवळ फार्स ठरला. याचाच वृत्तांत...
मिरामार येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्टस् (एनआयडब्ल्यूएस) येथील इमारतीत आज संध्याकाळी ५ च्या सुमारास काळाकुट्ट अंधार करण्यात आला.
हवाई हल्ला झाल्याचा कृत्रिम प्रसंग तयार करत त्यातील जखमींना या अंधारातून शोधून काढून त्यांना सुरक्षितस्थळी आणण्यासाठी एनसीसी, स्वयंसेवक तसेच अग्निशमन दलाचे जवान धावपळ करत होते.
स्ट्रेचरवरून इमारतीबाहेर त्यांना आणून तपासण्यात आले. डॉक्टर्स तसेच परिचारिकांचे पथकही उपस्थित होते.
उपचारासाठी जखमींना त्वरित रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनांनी इस्पितळात पाठवण्यात आले.
युद्धसदृश स्थिती उद्भवल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनीही सुरक्षितस्थळी कसे जावे, याचेही प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी नागरी सुरक्षा दलामधील स्वयंसेवक व आपदा मित्र हे अग्निशमन दलाच्या जोडीला मदत करत होते. या मॉक ड्रिलवेळी संकटात सापडलेल्यांना सुरक्षित स्थळी आणून त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेने इस्पितळात पोचवण्याची प्रात्यक्षिके करण्यात आली. उपजिल्हाधिकारी (डीआरओ) ईश्वर मडकईकर आणि उपजिल्हाधिकारी विनायक च्यारी यांच्या नेतृत्वाखाली मॉक ड्रिल करण्यात आले.
मिरामार येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्टस् व पणजी फेरी धक्का येथे आज संध्याकाळी मॉक ड्रिल ऑपरेशन अभ्यास करण्यात आले. हवाई हल्ला ब्लॅकआऊट, निर्वासन, सायरन अलर्ट, शोध व बचाव याचा सराव नागरी सुरक्षा व स्वयंसेवकाच्या मदतीने करण्यात आला. मदतीसाठीची धावपळ तसेच अडकलेल्यांची सुटका करण्याची प्रात्यक्षिके करण्यात आली.
दाबोळीवर हवाई हल्ल्याचा मॉक अलर्ट मिळाल्यावर, क्विक रिस्पॉन्स टीम - अग्निशमन, पोलिस, नागरी संरक्षण, सीआयएसएफ, महसूल आणि एनसीसी अधिकाऱ्यांनी त्वरित बचाव कार्य केले. यात ३० कामगारांची सुखरूप सुटका केली. २६ जणांना दाबोळीमधील चक्रीवादळ निवारागृहात हलविले, तर ४ गंभीर जखमी कामगारांवर चिखली रुग्णालयात उपचार केले. ड्रिलमध्ये आपत्कालीन तयारी आणि विविध विभागांमधील समन्वयाची चाचणी घेण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.