फातोर्डा- देश सद्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. गेल्या 75 वर्षांत देशाने सर्वोत्तम प्रगती साधली आहे. जर सर्वांनीच सकारात्मक दृष्टिकोन बाळगला तर देशाची आणखी भरीव समृद्धी शक्य असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर (Chandrakant Kavlekar) यानी केले. रवीन्द्र भवन मडगाव (Margao) येथे केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या आझादीकी अमृत महोत्सव प्रदर्शनाचे उदघाटन केल्यावर ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी केलेले लहानातले लहान कार्य सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यास कारणीभूत ठरले असेही ते म्हणाले. सद्याच्या काळात माणुसकीच्या नात्याने देशबांधवानी एकमेकांना सहकार्य करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही कवळेकर म्हणाले. गोव्यातील जास्तीत जास्त स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारने नोकरी दिलेली आहे्. जे कोण बाकी आहेत त्यांची प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण केली जाईल असेही कवळेकर म्हणाले. सद्या सरकारने नोकर भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातील काही टक्के जागा स्वातंत्र्यसैनिकांसाठी
राखीव केल्याचे त्यानी सांगितले. तसेच मडगावच्या लोहिया मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु झाल्याचेही त्यानी सांगितले. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या फिल्ड आउटरीच ब्युरोद्वारे हे प्रदर्शन भरविण्यात आले असुन प्रदर्शनात भारतीय क्रांतियात्रेच्या प्रमुख घटना लेखी रुपाने मांडलेल्या आहेत. शिवाय दांडी यात्रा, महात्मा गांधीजींचा संघर्ष, 1857 ते 1947 मधील स्वातंत्र्याच्या संघर्षपुर्ण घटनांच्या नोदीही प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. बाळ गंगाधर टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, गोपाळ कृष्ण गोखले, जवाहरलाल नेहरु यांच्या योगदानाची माहितीही लेखी व फोटोच्या स्वरुपात प्रदर्शित केली आहे.
तत्पुर्वी प्रदर्शनाचे उदघाटन रिबन कापुन व समई प्रज्वलित करुन करण्यात आले. या प्रसंगी कुंभारजुवे येथील कलाकारांनी समई नृत्य सादर केले. वामन प्रभुगावकर, गोपाळ चितारी, अॅंथनी वाझ, विष्णू आंगले या स्वातंत्र्यसैनिकांचा प्रमुख पाहुण्या हस्ते सत्कार करण्यात आला. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे प्रसिद्धी अधिकारी रियास बाबू टी यानी सर्वांचे स्वागत केले. रविन्द्र केळेकर ज्ञानमंदिराचे मुख्याध्यापक अनंत अग्नी यानी भारताच्या स्वातंत्र्यांचा इतिहास व नंतर देशाने काय कमावले व गमावले याचा आलेख आपल्या माहितीपुर्ण भाषणातुन प्रस्तुत केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन आकाशवाणी पणजीच्या अधिकारी ओरेना वाझ यानी केले. या कार्यक्रमाला रविन्द्र भवन मडगावच्या सदस्य सचिव संध्या कामत सन्माननिय अतिथी उपस्थित होत्या. हे प्रदर्शन रविवार पर्यंत खुले असुन पुढील दोन दिवसात अनेक सांस्कृतिक, गौरव सोहळा कार्क्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.