

पणजी: दिल्लीतील स्मशानभूमीजवळ मंगळवारी मध्यरात्री झालेल्या चकमकीत गोळ्यांच्या वर्षावात पोलिसांनी गोव्याला हादरवणाऱ्या बांगलादेशी दरोडेखोर टोळीचा ‘गेम ओव्हर’ केला. दोनापावला आणि म्हापसा येथील दरोड्यांनंतर फरार असलेल्या या टोळीतील सहा जणांना अखेर एक वर्षांनतर अटक करण्यात आली. यातील दोघे अद्याप फरार आहेत. या कारवाईमुळे गोवा पोलिसांची मान उंचावली आहे.
पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले, ‘सहाही दरोडेखोरांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे गोव्यात आणण्यासाठी गोवा पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच या टोळीला गोव्यात आणले जाईल, ज्यामुळे या गुन्ह्यांतील अधिक धागेदोरे हाती लागू शकतील’. अत्यंत ‘सिनेमॅटिक’ पाठलागानंतर दिल्ली गुन्हे शाखेने या दरोडेखोरांना ताब्यात घेतले. दिल्लीतील एका स्मशानभूमीत ही टोळी मध्यरात्री येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून विशेष पथके तैनात करत स्मशानभूमी परिसराला वेढा घातला. पोलिसांनी टोळीला शरण येण्याचे आवाहन केले असता दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. अंधाराचा फायदा घेऊन दोन संशयित घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
सर्व संशयित हे बांगलादेशातील बागेरहाट जिल्ह्यातील आहेत. त्यांचे नाव आणि थोडक्यात इतिहास...
१ सुमन हलदर उर्फ पन्नू (३५) : १४ दरोड्यांच्या गुन्ह्यांत सामील. कर्नाटकात खून करून दरोडा टाकल्याचा आरोप. गोव्यातही वॉन्टेड.
२ सैफुल इस्लाम (३१) : गोवा, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेशमध्ये १४ गुन्हे दाखल.
३सोहेल शेख (३५) : २०२४ मधील हुबळी आणि २०२५ मधील गोव्यातील दोन दरोड्यांच्या गुन्ह्यांत सामील. दरोडा प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट.
४मोहम्मद नासिर (४८) : हुबळीतील दरोडा-खून आणि गोव्यातील गुन्ह्यांत हवा असलेला आरोपी. १४ दरोड्यांत सामील असल्याचा आरोप.
५ नूर इस्लाम उर्फ नदीम खान (५६) : २०२२ मध्ये गोव्यात दोन घरफोडी प्रकरणांत अटक झाली होती. आता २०२५ च्या दोन दरोड्यांतही सामील.
६ झाकीर हलदर
(४०) : २०१८ मधील एसटीएफ चकमक प्रकरणात फरार. 4 दरोड्यांत सामील. गोव्यातही गुन्हे दाखल. दरोडा प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने (अँटी-एक्सटोर्शन आणि अँटी-किडनॅपिंग सेल) एका धाडसी कारवाईत सहा सराईत बांगलादेशी दरोडेखोरांना अटक केली आहे. या टोळीने २०२५ मध्ये म्हापसा आणि पणजी येथे दोन मोठे दरोडे टाकून खळबळ उडवून दिली होती. १४ एप्रिल २०२६च्या मध्यरात्री दक्षिण दिल्लीत सराई काळे खान परिसरात झालेल्या गोळीबारानंतर या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईमुळे गोवा, कर्नाटक, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. धक्कादायक म्हणजे, ही टोळी गेल्या आठ वर्षांपासून भारताच्या विविध राज्यांत गुन्हे करून बांगलादेशात पळून जात होती.
दिल्लीतील काळे खान स्मशानभूमी
दिल्ली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डीसीपी संजीव कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली काळे खान येथील स्मशानभूमीजवळ सापळा रचला होता. मध्यरात्री ६ सशस्त्र दरोडेखोर तेथे पोहोचले. पोलिसांनी त्यांना शरण येण्यास सांगितले असता दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात, पोलिसांनी गोळ्यांच्या तीन फेऱ्या झाडल्या आणि अत्यंत कौशल्याने सहा जणांना जागेवरच पकडले. त्यांचे ‘शाकायत’ आणि ‘इलियास’ नावाचे दोन साथीदार मात्र पळाले.
या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत अतिशय नियोजनबद्ध होती. पहाटेच्या वेळी एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरांना लक्ष्य करणे, शस्त्रे दाखवून कुटुंबाला बांधून ठेवणे, तोंडात कपडे कोंबणे आणि अमानुष मारहाण करून दागिने व रोकड लुटणे, अशी त्यांची कार्यपद्धती होती.
लूट केल्यानंतर चोरीच्या किंवा खासगी वाहनाने वेगाने पळ काढणे, पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून मोबाईलचा वापर टाळणे, तसेच चोरीचा माल घेऊन मानवी तस्करांच्या मदतीने सीमा ओलांडून बांगलादेशात पळून जाणे, ही त्यांची पद्धत होती. काही महिने तेथे राहून पुन्हा नव्या राज्यात गुन्हे करण्यासाठी भारतात घुसखोरी केली जात असे.
म्हापसा (७ ऑक्टोबर २०२५) हाउसिंग बोर्ड येथील घरात घुसून कुटुंबाला बांधून मारहाण करण्यात आली होती. ३५ लाख रुपयांची रोकड आणि दागिने लुटून दरोडेखोर पसार झाले होते.
दोनापावल (२० एप्रिल २०२५) : एका बंगल्यात शिरून केअरटेकर आणि वृद्ध पालकांना बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आले. दागिने, तीन लाखांची रोकड लंपास केली होती.
लवकरच गोव्यात आणणार : पोलिस अधीक्षक
गोवा पोलिस आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे दोनापावल आणि म्हापसा येथील दरोड्याच्या गुन्ह्यांतील दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. संशयितांना लवकरच ‘ट्रान्सफर वॉरंट’वर ताब्यात घेऊन गोव्यात आणले जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.