म्हापसा : म्हापसा येथील बार्देश बझार ग्राहक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष धर्मा चोडणकर यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष रमाकांत खलप यांचे पुत्र निखिल खलप यांचा 8 विरुद्ध 4 मतांनी त्यांनी पराभव केला. बार्देश बझारच्या सुमारे तीस वर्षांच्या इतिहासात (History) यंदा प्रथमत:च खलपविरोधी गटाचा उमेदवार अध्यक्षपदी निवडून आला आहे.
संस्थेच्या संचालक मंडळावरील चौदापैकी तेरा सदस्यांनी या मतदान प्रक्रियेत भाग घेतला. त्यापैकी एक मतदान बाद ठरले. या बैठकीला धर्मा चोडणकर, रघुवीर देसाई, शशिकांत कांदोळकर, प्रमोद कर्पे, निखिल खलप, निर्मला खलप, एकनाथ नागवेकर, महादेव नाटेकर, चंद्रकांत शेटगावकर, गोकुळदास शिरोडकर, बापू तुयेकर, पूनम नाईक-आजगावकर व नारायण राठवड यांची उपस्थिती होती. जोसेफ कुटो हे एकमेव सदस्य आरोग्यविषयक कारणांस्तव अनुपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष अॅड. पूनम नाईक-आजगावकर यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव 11 विरुद्ध 2 मतांनी संमत झाल्याने ते पद रिक्तच होते. नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी सहकार उपनिबंधक महादेव कळंगूटकर यांनी दि. 31 ही तारीख निश्चित केली होती. त्यानुसार त्या खात्याचे निरीक्षक तथा निर्वाचन अधिकारी म्हणून संदेश देसाई यांनी या निवडणुकीचे कामकाज हाताळले.
विद्यमान कार्यकाळातील नव्या संचालक (Director) मंडळातर्फे पहिला अध्यक्ष निवडताना तेरापैकी आठ मते अॅड. पूनम नाईक यांना मिळून त्या विजयी झाल्या होत्या, तर धर्मा चोडणकर यांना पाच मते मिळाली होती. परंतु, आताच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खलप गटातील गणली जाणारी तीन मते स्वत:च्या बाजूने वळवण्यात धर्मा चोडणकर यशस्वी ठरले.
संचालक सुशिक्षित असतानाही मत बाद!
संस्थेचे सर्व संचालक सुशिक्षित असतानाही या निवडणुकीत मतदान केलेल्या तेरा संचालकांपैकी एका संचालकाचे मत बाद ठरल्याने त्याबाबत लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ते बाद मत माजी अध्नयक्ष पूनम नाईक यांचेच असल्याची शक्यता वर्तवली जात होती.
रमाकांत खलप यांना चपराक!
या निवडणुकीमुळे (Election) रमाकांत खलप यांना एका एका परीने चपराक बसली आहे. निखिल यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवण्यास त्यांचाच आग्रह होता. त्यासंदर्भात त्यांनी काही संचालकांशी फोनवर संपर्कही साधला होता व त्याचाच राग काही संचालकांना होता. त्या रागाचा विस्फोट या निवडणुकीत झाला. रमाकांत खलप गटातील काही संचालकांनी इंगा दाखवत निखिल यांचा पराभव करून सुमारे तीस वर्षे असलेले त्या गटाचे वर्चस्व मोडीत काढल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.