डिचोली: आपली सतावणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई झाली नाही, तसेच आपल्याला न्याय मिळाला नाही, तर दीड वर्षांच्या बालिकेसह पोलिस स्थानकासमोर तीव्र आंदोलन करणार, असा इशारा दीप्ती विपुल नाईक या महिलेने दिला आहे.
घर बांधकामासाठी पंचायतीकडून ''एनओसी'' मिळवून देण्याच्या नावाखाली पुनर्वसन-साळ येथील महिला पंचसदस्याचा पती देविदास नाईक यांनी आपली अक्षरशः सतावणूक चालवली आहे. तसेच नाईक यांनी हजारो रुपये लुटून काही युवकांच्या मदतीने बांधकाम सुरू असलेल्या आपल्या घराची मोडतोड केली आहे, अशी तक्रार दीप्ती नाईक यांनी डिचोली पोलिसांत केली आहे.
तसेच देविदास शिवा नाईक यांच्यासह अनिकेत आनंद नाईक (पुनर्वसन-साळ), संजय बाबूराव नाईक, अमर अरविंद नाईक, सचिन संजय नाईक आणि समीर संजय नाईक (कसई-दोडामार्ग) यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.
पुनर्वसन-साळ येथे आपण एक घर विकत घेतले होते. ते घर मोडकळीस आल्याने त्या घराच्या जागेत नवीन घर बांधण्यासाठी आपण स्थानिक पंच दिव्या नाईक यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी पंचमहिलेचे पती देविदास नाईक यांनी पंचायतीला ''सेटल'' करण्याच्या नावाखाली माझ्याकडून दोनवेळा मिळून ७५ हजार रुपये उकळले. नंतर पैशांची मागणी वाढतच गेली.
पैसे देऊनही पंचायतीकडून ''एनओसी'' मिळाली नसल्याने मी पंचायतीकडे संपर्क साधला असता माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. नंतर मी आणखी पैसे देण्यास नकार देताच, गेल्या जुलै महिन्यात देविदास नाईक यांनी इतरांच्या मदतीने बांधकाम सुरू असलेल्या आपल्या घराची मोडतोड केली. याबाबत १३ जुलै रोजी पोलिसांत तक्रारही केली, मात्र मला न्याय मिळाला नाही, असे दीप्ती नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी लक्ष घालून मला न्याय द्यावा. अशी मागणीही नाईक यांनी केली. यावेळी साळच्या पंच नीता राऊत उपस्थित होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.