Goa Politics: खरी कुजबुज, अमित शहा भेट, बोलावले की गेले?

Khari Kujbuj Political Satire: देशातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींची यादी प्रसिद्ध झाली. त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना स्थान मिळाले.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

अमित शहा भेट, बोलावले की गेले?

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर व मंत्री सुदिन ढवळीकर यांचा मंगळवारचा दिल्ली दौरा चर्चेचा ठरला आहे. ते स्वतःहून दिल्लीत गेले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या अहवालानंतर त्यांना दिल्लीला बोलावले गेले, अशी चर्चा रंगली होती. प्रियोळ येथील भाजप मेळाव्यानंतर त्यांनी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची भेट मागितली की, त्याआधीच त्यांनी ही भेट मागितली होती, असाही या चर्चेला पदर होता. प्रियोळ मतदारसंघ कोणाचा यावरून सुरू झालेला वाद, एकमेकांवर मगो भाजपकडून झालेले शरसंधान या पार्श्वभूमीवर २४ तासांच्या आत मगोचे नेते दिल्लीत हाही चर्चेचा विषय ठरला नसता तर नवल ! ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत बोलबाला!

देशातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींची यादी प्रसिद्ध झाली. त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना स्थान मिळाले. याचा थेट अर्थ दिल्लीत त्यांच्या नावाचा बोलबाला आहे, असा होतो. विशेष म्हणजे या यादीत भाजपचा वरचष्मा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अश्विनी वैष्णव, पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा, केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडविय, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, भाजपचे सरचिटणीस बी. एल. संतोष, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, ज्योतिरादित्य सिंदिया, किरण रिजेजू, गजेंद्रसिंह शेखावत ही नावे यादीत आहेत. हेच पुरसे बोलके ठरावे. ∙∙∙

ऑल ईज वेल!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मगो भाजप युतीविषयी बोलताना ‘ऑल ईज वेल’ असे उदगार काढले आहेत. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी युतीतून हवे तर चालते व्हा, असा मगोला इशारा दिल्यानंतर मंत्री गोविंद गावडे यांनी मगोला माधवरावांच्या गोठ्यातील पक्ष असे संबोधले. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तरही दिले. असे असले तरी त्याचा ताण माध्यमांपर्यंत जाणार नाही असे दामू यांनी मनोमन ठरवले होते. त्यामुळे मंगळवारी पत्रकारांनी कितीही खोदून खोदून विचारले, तरी मगो भाजप युतीत कोणताही वाद नाही हेच पालुपद दामू यांनी ठेवले होते. ∙∙∙

लेंट महिना... तरीही म्‍युझिक शो?

कार्निव्‍हल नंतर जो महिना येतो तो ख्रिस्‍ती धर्मात प्रायश्‍चिताचा महिना म्‍हणून पाळला जातो. या महिन्‍यात ख्रिस्‍ती लोक सामिष आहाराला रजा देत असतात आणि मनोरंजनाचे कार्यक्रमही या महिन्‍यात आयोजित करत नाहीत. हा महिना फक्‍त देवभक्‍तीत काढायचा, असे संकेत आतापर्यंत पाळले जात हाेते. मात्र आता असा लेंट महिना चालू असतानाही दक्षिण गोव्‍यात हे सगळा परिसर दणाणून सोडणारे म्‍युझिक शो आयोजित होतात तरी कसे? आणि तिथे हाऊजीच्‍या नावे चाललेल्‍या जुगारात ख्रिस्‍ती लोक भाग घेतात तरी कसे? एवढेच नव्‍हे तर स्‍वत:ला भाविक म्‍हणणारे ख्रिस्‍ती आमदार या पवित्र अशा महिन्‍यात हे म्‍युझिक शो, कसे स्‍पॉन्‍सर करतात? यावर कुणी उत्तर देईल का? ∙∙∙

भाजप ‘पक्ष भक्ष्यी’ आहे का?

एकाने दुसऱ्यास गिळावे, दुसऱ्याने तिसऱ्यास गिळावे, हाच जगाचा न्याय खरा हीच जगाची परंपरा, या काव्य पंक्ती आपल्याला आरसा दाखविणाऱ्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या जवळ जो येतो तो संपतो, असा आरोप विरोधक नेहमीच करतात. महाराष्ट्रात शिवसेना, हरियाणा व राजस्थानात स्थानिक लहान पक्ष भाजप जवळ आले भाजपशी युती केली आणि भाजप सत्तेवर आल्यावर त्या पक्षांचे अस्तित्व संपले, असा इतिहास आम्ही नव्हे भाजपचे विरोधक सांगतात. आता गोव्यात भाजपाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती केली.आता भाजप मगो पक्षाशी घटस्फोट घेण्याच्या तयारीत असून भाजप ‘मगो’ला भक्ष्य बनवणार, असा दावा काही राजकीय तज्ज्ञ करू लागलेत.यात तथ्य किती आहे हे भाजप व ‘मगो’च सांगू शकणार नाही का? ∙∙∙

हा तर मासळी बाजार!

‘मासळी बाजार’ हा शब्द प्रयोग आपल्या गोव्यात बराच वापरला जातो. आपल्या राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना व सरकारी वेतन घेणाऱ्या कुणालाच सरकारचा वचक राहिला नाही, हे वेळोवेळी अनेक उदाहरणांनी सिद्ध झाले आहे. काल म्हणे मत्स्योद्योग खात्यातील एक अधिकारी कामावर उशिरा आल्यामुळे त्याच खात्यातील सुरक्षा रक्षकाने त्याला अडविले.म्हणून साहेबांचा पारा चढला. एक भाडेपट्टीवरील सुरक्षा गार्ड आपल्याला गार्ड करतो, म्हणून तो लेट लतिफ अधिकारी भडकला. कर्तव्यनिष्ठ सुरक्षा रक्षकानेही त्याच्याशी दोन हात केले. परिणामी दोघांत ‘रोड साईड’ हाणामारी झाली. या प्रकरणात सुरक्षा रक्षक जखमी झाला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्या कर्तव्यनिष्ठ सुरक्षारक्षकावर वारे साहेब! याला म्हणतात चोर सोडून संन्याशाला फाशी. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज, आलेमाव विरुद्ध आलेमाव?

दामू यांचा धाक

प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक आल्यापासून त्यांच्याविषयी अनामिक असा धाक सर्वांनाच वाटत आला आहे. मंगळवारी पणजीत झालेल्या विस्तारीत बैठकीसाठी बाहेरगावी असलेले पंचायतमंत्री माविन गुदिन्हो वगळता सर्व मंत्री व आमदार उपस्थित होते. बैठकीसाठी २३४ जणांना निमंत्रित केले होते. त्यापैकी २२१ जण वेळेवर उपस्थित होते. पणजीतील पक्षाच्या किंवा सरकारच्या कार्यक्रमांना न फिरकणारे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरातही उपस्थित होते. दामू यांनी प्रगतीपुस्तक आपल्या हाती आहे, हे सांगितल्यानंतर सारेजण शिस्तीत आल्याचे दिसून येते. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: भाजप - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी; ढवळीकर बंधुंची बीएल संतोष यांच्याशी चर्चा

भाजप-मगो विलीनीकरण

भाजप सातत्याने आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर देत आहे. त्यातच, मुख्यमंत्री जिथे जातील तिथे भाजपचा उमेदवार उभा करणार, अशी जाहीर भूमिका ते घेत आहेत. यामुळे आता मगो पक्ष आणि भाजप यांच्यात वाक् युद्ध सुरू झाले आहे. परंतु, राजकीय पंडितांच्या मते, हे वाक्युद्ध केवळ दाखवण्यासाठी आहे आणि पडद्यामागे वेगळीच खिचडी शिजत आहे. जोपर्यंत मगोचे नेतृत्व ढवळीकर बंधू (सुदिन आणि दीपक) कडे आहे, तोपर्यंत पक्षाचे विलिनीकरण शक्य नाही. त्यामुळे, भाजपकडून बाहेरून थोडा दबाव आणून आमदार जीत आरोलकर यांना मगोचे अध्यक्षपद देण्यास भाग पाडले जाईल. आणि एकदा जीत अध्यक्ष झाले की, मग सहजपणे ‘मगो’चे भाजपात विलिनीकरण करता येईल, अशी ही खेळी असल्याची चर्चा आहे. आता या चर्चेत किती तथ्य आहे, हे येणारा काळच ठरवेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com