Goa Politics: खरी कुजबुज, आलेमाव विरुद्ध आलेमाव?

Khari Kujbuj Political Satire: गोवा मंत्रिमंडळात आज बदल होणार की उद्या बदल होणार, असे करत करत काँग्रेसमधून भाजपात आलेल्‍या आमदारांना झुलवत ठेवण्‍यात आले होते.
Goa Politics
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

आलेमाव विरुद्ध आलेमाव?

विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी असली तरी बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी यावेळीही आपण निवडणुकीच्‍या रिंगणात असू शकताे, असे संकेत दिलेले आहेतच. चर्चिल यांनी काही कारणास्‍तव रिंगणातून माघार घेतली तर त्‍यांची कन्‍या वालंका किंवा पुत्र सावियो यापैकी कुणीतरी एक बाणावलीतून निवडणूक लढविणार आहेत. अशा परिस्‍थितीत चर्चिल आलेमाव यांचे पुतणे वॉरन आलेमाव यांनीही बाणावलीतील एकेक विषय घेऊन आपली स्‍वत:ची हवा तयार केली आहे. असे म्‍हणतात, की यावेळी आलेमाव यांना आव्‍हान आलेमाव यांच्‍याकडूनच मिळू शकते. त्‍यामुळे २०२७ च्‍या निवडणुकीत बाणावलीत आलेमाव विरुद्ध आलेमाव अशी लढत होणार तर नाही ना? याबद्दल सध्‍या उलट सूलट चर्चा चालू आहे. ∙∙∙

कुणाला लागणार लॉटरी?

गोवा मंत्रिमंडळात आज बदल होणार की उद्या बदल होणार, असे करत करत काँग्रेसमधून भाजपात आलेल्‍या आमदारांना झुलवत ठेवण्‍यात आले होते. मात्र, आता जिल्‍हा पंचायतीची निवडणूक तोंडावर आली असताना हा मंत्रिमंडळ बदल होणारच, असे संकेत मिळू लागले आहेत. मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांच्‍या वाढलेल्‍या दिल्‍लीवार्‍या पाहिल्‍यावर मंत्रिमंडळात बदल लवकरच होणार. मात्र या बदलात लॉटरी कुणाला लागेल? याबद्दल अजूनही स्‍पष्‍टता नाही. मागच्‍यावेळी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्‍या आमदारांपैकी दिगंबर कामत, मायकल लोबो आणि संकल्‍प आमोणकर, अशी तीन नावे सध्‍या चर्चेत आहेत. मात्र त्‍यातील नेमके कुणाला मंत्री करतील याबद्दलचे कुतूहल अद्याप तसेच आहे. मडगावात त्‍यामुळे एक वेगळेच धाकधुकीचे वातावरण तयार झाले आहे. आता तरी आमच्‍या बाबांना मंत्रिमंडळात स्‍थान मिळणार ना? असा सवाल बाबांचे तमाम समर्थक करू लागलेत. ∙∙∙

भाजपकडून ‘मगो’ची अवहेलना!

प्रियोळ येथील भाजपच्या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पक्ष प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी प्रियोळ मतदारसंघ हा भाजपचाच असून तो भाजपचाच राहणार, असे ठामपणे सांगून ज्यांना सरकारमध्ये राहायचे नाही, त्यांनी वाट पकडा असे स्पष्टपणे सांगितले. त्यातून मगोला अप्रत्यक्षपणे सरकारमध्ये असलेल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्याचीच री ओढत प्रियोळचे भाजप आमदार व मंत्री गोविंद गावडे यांनीही ‘मगो’ नेत्यांवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. ‘मगो’ची एवढी हेळसांड करूनही ‘मगो’चे नेते मात्र अजूनही अपमान सोसून खुर्चीला खेटून आहेत. राज्यातील सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय हा केंद्रातील नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे झाल्याचा दावा करत होणारी मानहानी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी किती दिवस हा अपमान ‘मगो’ सहन करणार, अशी चर्चा लोकांत सुरू झाली आहे. ‘मगो’ कडे निवडणूक जिंकणारे उमेदवार नाहीत. प्रियोळ, फोंडा, मडकई व शिरोडा या मतदारसंघावरच लक्ष आहे, मात्र मडकई वगळता इतर कोणत्याच मतदारसंघात डाळ शिजत नाही, हे त्यांनाही कळून चुकले आहे. ∙∙∙

‘स्मार्ट सिटी’चे काम कुर्मगतीने

राजधानी पणजीत स्मार्ट सिटी योजनेखाली सुरू असलेली खोदकामे मार्चच्या अखेरीस पूर्ण करण्याची हमी उच्च न्यायालयाला दिली असली तरी अवकाळी पावसामुळे त्यात अडथळा येण्याची शक्यता आहे. अजूनही ही कामे सुरूच आहेत. काही ठिकाणी खोदकाम पूर्ण झालेल्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम केले जात असले तरी त्याचा दर्जा सुमार असल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायालयाला दिलेली वेळ व हमी त्याचे पालन करण्यासाठी ही कामे घिसाडघाईने सुरू आहेत. अजूनही पणजीतील रस्ते खडबडीत आहे तसेच अनेक ठिकाणी सांडपाणी निचरा टाक्यांना जोडण्या करण्यासाठी खोदकाम केले ते बुजवले तरी त्याचे डांबरीकरण केलेले नाही. हे काम पणजी पालिकेशी संबंध नसल्याने महापौर व स्थानिक आमदारांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. या कामाचा आढावा अधुनमधून घेण्यासाठी या स्मार्ट सिटी योजनेच्या कामासाठीचे नोडल अधिकारी फिरकलेले नाहीत. जून अखेरीस सर्व कामे पूर्ण करण्याची हमी उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे, मात्र सध्याची कामाचा वेग व अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास कामाचे तीन तेरा वाजण्याची शक्यता आहे.∙∙∙

मंत्रिपदासाठी आतूर

मंत्रिमंडळ फेरबदल कधी होईल याकडे आपले लक्ष नाही असे जो तो जाहीरपणे सांगत असला तरी कधी एकदा मंत्रिपद मिळते असे काहींना झाले आहे. त्यापेक्षा त्यांचे समर्थक अधीर झाले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीवारी केली, की उद्याच मंत्रिमंडळ फेरबदल होईल, अशी दिवसा स्वप्ने काही जणांना पडू लागतात. काहीजण राज्यपाल राज्यात आहेत की नाहीत, याचीही माहिती मिळवतात. सोमवारी राजभवनावर राज्यपाल आहेत का, अशी विचारणा करणारे दूरध्वनी गेले आणि तेथील कर्मचाऱ्यांची घटकाभर करमणूक झाली. ∙∙∙

Goa Politics
Goa politics: ..हत्ती नाचे थयाथया! ढवळीकरांचे मंत्री गावडेंना कवितेतून प्रत्युत्तर; निराश, हताश, वैफल्‍यग्रस्‍त असल्याचा केला दावा

न केलेली दिल्लीवारी!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक कुटुंबीयांसमवेत नाशिक येथे रविवारी गेले होते. कुटुंबीय मागे राहिले आणि एकटेच दामू गोव्यात परतले. ते दिल्लीला गेल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच मुख्यमंत्री दिल्लीला असल्याने मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा जोर धरू लागली. पक्षाच्या पणजीतील कार्यालयात संघटनात्मक बैठकांचे नियोजन करत बसलेल्या दामू यांना त्याची साधी कल्पनाही नव्हती. रात्री १० वाजता काम आटोपून घरी निघताना आपल्या न केलेल्या दिल्लीवारीची माहिती त्यांना मोबाईलमध्ये डोकावल्यावर आली आणि त्यांनी आपण रविवारी नाशिकला होतो, असे सांगून टाकले.∙∙∙

Goa Politics
Goa politics: भाजप-मगो युती कायम राहील! नेतृत्‍वाच्‍या पातळीवर पक्षांमध्‍ये वाद नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

भौतिकशास्त्राचे नियम धाब्यावर

राज्यात अनेक नवीन प्रकल्प आले असून नवीन झुवारी पूल हा भव्यदिव्य आहे. परंतु पुलाच्या ‘ऍक्सपांशन जॉईंट’ भागातील काँक्रीट खाली कोसळल्याने वाहतुकादारांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. सुमारे हजारो कोटी रूपयांचा पैसा पुलावर खर्च करण्यात आली, असला तरी भौतिकशास्त्राचे नियमांचे पालन केलेले दिसत नाही. राज्यातील बहुतांश प्रकल्पांची अशीच स्थिती काही तज्ज्ञांच्या निरीक्षणात दिसून आली असून ‘ऍक्सपांशन जॉईंट’ भाग भौतिकशास्त्रानुसार विशिष्ट कार्यासाठी तेथे असल्याने त्यात सिमेंट भरले जात नाही. आता झुवारी पूल उभारणाऱ्या कंपनीचे अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता नेमके काय करत होते. एवढी मोठी चूक त्यांच्या नजरेखाली घडली, त्याचे गंभीर परिणाम लोकांना सहन करावे लागणार असल्याची, चर्चा रंगलीय. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com