
Danielle McLaughlin Murder Case Ireland Reaction
मडगाव: आयरिश आणि ब्रिटीश असे दुहेरी नागरिकत्व असलेल्या डॅनियली मॅकलॉग्लीन या २८ वर्षीय युवतीचा देवाबाग-काणकोण येथे खून झाल्यावर तिचा खून करणाऱ्या संशयिताला शिक्षा व्हावी यासाठी तिच्या कुटुंबीयांसह आयर्लंडमधील कित्येक लोक प्रयत्न करत होते. त्यासाठी यापूर्वी त्यांनी प्रार्थनाही केल्या हाेत्या. काल या प्रकरणातील संशयित विकट भगत याला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर आयर्लंडमध्येही समाधानाचे वातावरण पसरले आहे.
बीबीसी न्यूज या ब्रिटीश वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा निकाल जाहीर झाल्यानंतर आयर्लंडचे उपपंतप्रधान सायमन हॅरिस यांनी या निकालावर समाधान व्यक्त करताना, या निकालामुळे डॅनियलीच्या कुटुंबीयांचे दु:ख काही प्रमाणात तरी हलके होईल, असे मत प्रदर्शित केले होते. ही खुनाची घटना घडल्यानंतर आयरिश सरकारनेही हे प्रकरण गंभीरतेने घेतले होते.
२०१८ मध्ये तत्कालीन आयरिश पंतप्रधान लियो वराडकर यांनी तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. डॅनियलीचा मृतदेह तिच्या डोनेगल काऊंटीमधील घरी आणण्यासाठी केविन बेन रिपार्टीशन ट्रस्टने मदत केली होती. तिचा मृतदेह बुनर्कांना येथे दफन करण्यात आला होता.
गोव्याच्या प्रेमात पडलेली डॅनियली २३ फेब्रुवारी २०१७ रोजी गोव्यात आली होती. १३ मार्च रोजी ती होळी साजरी करण्यासाठी काणकोणला आली होती. १४ मार्च रोजी तिचा मृतदेह देवबाग-काणकोण येथील एका शेतात सापडला होता. त्यानंतर पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजवर डॅनियली आणि विकट भगत हे एकत्र दिसल्यानंतर पोलिसांनी विकटला अटक केली. त्यानंतर पाेलिसांनी त्याच्याकडून डॅनियलीचे रक्ताळलेले कपडेही जप्त केले.
२२ मार्च २०१७ रोजी डॅनियलीचा मृतदेह आयर्लंडमध्ये पाठविण्यात आला. या खून प्रकरणात काणकोण पाेलिसांनी जून २०१७ मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र, नंतर कोविडच्या साथीमुळे हा खटला न्यायालयात रेंगाळला. त्यामुळे डॅनियलीच्या घरचे लोक हवालदील झाले होते.
गेली आठ वर्षे आम्ही खूप काही साेसले. डॅनियली ही माझी सर्वांत मोठी मुलगी. ती हसतमुख हाेती आणि सर्वांवर प्रेम करणारी हाेती. तिच्या मृतात्म्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही आठ वर्षे लढा दिला. शेवटी काल तिला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया तिच्या आईने व्यक्त केली.
डॅनियलीचा जन्मगाव असलेल्या ब्रुनकाना येथील चर्चचे पाद्री फा. फ्रान्सिस ब्रॅडली यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना, डॅनियली एक आनंदात राहणारी मुलगी होती. तिला साहसी कामे करण्यास आवडायचे. तिच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर आघात झाला होता. काल या कुटुंबीयांना न्याय मिळाला, असे त्यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.