
Danielle McLaughlin Murder Case
पणजी: आयरिश-ब्रिटिश तरुणी डॅनियली मॅकलॉलीन खून प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपी विकट भगतला दोषी ठरवले आहे. सोमवारी त्याला शिक्षा ठोठावण्यात येईल. न्यायासाठी अविरत लढा देणारे डॅनियलीचे कुटुंबीय आणि अनेक अडथळ्यांवर मात करून तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे हे मोठे यश आहे.
गोव्यात आलेल्या ब्रिटिश तरुणीवर अमानुष अत्याचार करून तिचा झालेला खून राज्याच्या पर्यटन क्षेत्राला कलंकित करणारी घटना होती. डॅनियली प्रकरणाकडे जागतिक माध्यमांचे लक्ष लागले होते. आठ वर्षे खटला लांबला; परंतु उपरोक्त निवाड्याने भारतीय न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ होण्यास मदत होणार आहे.
सत्र न्यायालयाने निवाडा दिल्यानंतर डॅनियलीच्या कुटुंबीयांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. पत घसरलेल्या पोलिस खात्यासाठी हा निवाडा ऊर्जादायी ठरावा. खुनाचा छडा लावणे पोलिसांसमोर आव्हानात्मक होते. परंतु, पोलिसांनी चिकाटी दाखवली. सीसीटीव्ही फुटेजसह भक्कम पुरावे एकत्र केले.
संशयित विकट भगत हा स्थानिक. परिणामी साक्षीदारांना फोडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता अधिक होती. ती गृहीत धरून पोलिसांनी पुढे पाऊल टाकले. स्थानिकांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. त्याशिवाय डॅनियलीच्या कुटुंबीयांनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यामुळेच संशयित, आरोपी ते दोषी हा न्यायाच्या दिशेने प्रवास घडला.
बरेचदा पोलिसांकडून तपासात त्रुटी राहून जातात, अनेकदा त्या ठेवल्याही जातात आणि आरोपींना त्याचा फायदा मिळतो. इथे तसे घडलेले नाही वा आरोपीचे वकील सिद्ध करू शकले नाहीत. म्हणूनच पोलिसांचे कौतुक करावे लागेल. विकटसारख्या प्रवृत्तींना ठेचावेच लागेल.
त्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. खून प्रकरण आणि निवाडा या अनुषंगाने काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील. परदेशी पर्यटकांनी स्थानिकांशी कशा प्रकारचे वर्तन व संबंध ठेवावे, या संदर्भात काही विधिनिषेध जरूर बाळगावे. अप्रिय घटना घडतात, तेव्हा अतिविश्वास हे एक कारण समोर येते.
मैत्रीच्या नात्यातील सीमा ओळखल्यास आपबीतीचे प्रसंग टळू शकतात. परदेशातील संस्कृती निराळी आहे. एखादी परदेशी महिला विमुक्तपणे वावरत असल्यास तिची शारीरिक संबंधांसाठी परवानगी आहे, असे गृहीत धरले जाते. त्यातून बलात्कारासारखी अशी विकृत धारणा बळावते. अशा सडक्या मनोवृत्तीमुळे अत्याचार, खून होतात व भारतीय पर्यटनावर नकारात्मक परिणाम होतो.
ड्रग्ज, दारू, अंमली पदार्थ, जुगार यासारखी इतर व्यसनेही याला तितकीच कारणीभूत आहेत. यापूर्वी हणजूण येथे घडलेले स्कार्लेट किलिंग खून प्रकरण असो वा काणकोणातील डॅनियलीची हत्या. त्यामधून हेच सिद्ध झाले आहे. घटनेनुसार दोषी व्यक्तीला पुढील कोर्टात धाव घेण्याची मुभा असल्याने डॅनियली प्रकरणी पोलिस, तिच्या कुटुंबीयांना कदाचित पुढेही लढा सुरू ठेवावा लागेल.
निळ्या सागराची गाज, स्फटिकासारखे पाणी, केळी, नारळाची हिरवीकंच कुळागरे, प्रज्ञावंतांची गाणी, समुद्रातले पाणी आणि मद्यालयातली फेणी आणि त्यामुळे गोवा हा बारमाही पर्यटकांचा, त्यातही विशेषत: परदेशी पर्यटकांचा प्रियकर ठरला आहे.
गोव्याच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तींचा किमान सन्मान राखणे म्हणूनच गोमंतकीय म्हणून आपले आद्य कर्तव्य ठरते. त्यांना आपल्या शारीरिक वासना भागवण्याचे साधन म्हणून पाहिल्यास तो पवित्र नात्यास लागलेला कलंक ठरतो. गोवा म्हणजे उन्मुक्तता, स्वैर वर्तन हा ठसा बसण्यास जे जे कारणीभूत आहेत, ते ते सर्व काही अंशी तरी या अशा घटनांसही कारणीभूत आहेत. अर्थात असे असले तरी प्रत्येक गोमंतकीय असे वागत नाही.
पण, आपण कशाला प्रोत्साहन देतोय याचे भान सरकारला ठेवावेच लागेल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे न्याय मिळण्यास लागणारा विलंब. सात वर्षे खटला चालल्यानंतर फक्त सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले आहे. इथून पुढे तोच आरोपी उच्च, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतो. निकालाचा परिणाम सर्व स्तरावर चांगला, विपरीत होतो. म्हणूनच प्रत्येकाने आपापले काम आपापल्या स्तरावर करणे सर्वांच्या हिताचे ठरते, हाच या निकालातून घ्यावयाचा बोध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.