
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून अखेर अपेक्षेप्रमाणे फातोर्ड्यातील दामू नाईक यांची अधिकृत घोषणा झाली आहे. भाजपाने एका तळागाळातून पुढे आलेल्या प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्याला प्रमुख पद दिले आहे असे सगळ्यांचेच मत बनले आहे. काहीजण भंडारी समाजाला एकत्र आणण्यासाठी भाजपाची ही खेळी असल्याचे म्हणतात. त्या पक्षाचे आजवरचे डावपेच पाहिले तर ते खरेही असू शकते. तसे ते असेल तर दामू समोरील ते एक आव्हान असेलच, पण दुसरे आणखी एक आव्हान आहे ते त्यांची कर्मभूमी असलेल्या फातोर्ड्यातच असेही काहीजण म्हणतात. २०१२ नंतर दामूबरोबरचे असंख्य कार्यकर्ते त्यांची साथ सोडून गेलेले आहेत जे त्या पूर्वीच्या दोन निवडणुकीत त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून होते. ते त्यांना का दुरावले ते स्वतः दामूच जाणोत, पण पक्षाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर आता ही सगळी मंडळी त्यांच्याकडे परतली तर दुधात साखर पडल्यासारखे होईल अशी चर्चा फातोर्ड्यात सुरू आहे. ∙∙∙
दामू नाईक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची विविध अंगाने समाज माध्यमांवर चर्चा सुरू झाली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे, की दामू नाईक काहीसे कमनशिबी, ते २०१७ मध्ये पराभूत झाले नसते, तर मुख्यमंत्रिपदीही विराजमान झालेले आपणाला पाहायला मिळाले असते. ते पराभूत झाल्याने मनोहर पर्रीकरांना सरकार स्थापन करण्यासाठी विजय सरदेसाईंची मदत घ्यावी लागली व दामूंना राजकारणात माघार घ्यावी लागली... ते जिंकले असते, तर कदाचित पर्रीकरांच्या निधनानंतर मुख्यमंत्री झाले असते. कारण ते प्रमोद सावंतांनाही ज्येष्ठ आहेत. ∙∙∙
परवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते बाणावलीत कोलवा येथे उभारलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पामुळे कोलवा खाडीत सांडपाणी व मलमूत्रामुळे होणारे प्रदूषण टळणार म्हणून भाजप सरकारने हा प्रकल्प आखला व तो पूर्णही केला. या प्रकल्पाच्या कार्यवाहीत अनेक विघ्नसंतोषींनी अडथळे आणले, त्यातील पाणी समुद्रात सोडले तर त्याचा पर्यटनावर परिणाम होईल असा कांगावा करून ते पाणी सोडण्यासाठी खारेबांधपर्यंत नवी वाहिनी टाकण्यास सरकारला भाग पाडले. हे सर्व अडथळे पार करून तो प्रकल्प सुरू केला गेला. आता त्याचा लाभ लोकांनी घरांना मलनिस्सारण वाहिनीच्या जोडण्या घेऊन घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले व त्या घेतल्या नाहीत, तर पाण्याच्या जोडण्या तोडल्या जातील असा इशाराही दिला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण मडगावात असा प्रकल्प पूर्ण होऊन दहा वर्षे उलटली तरी अनेक घरे व व्यापारी आस्थापने जोडण्या न घेता आहेत व त्यामुळे सांडपाणी गटारांतून व नाल्यांतून वाहून साळ नदीत जाते व ती प्रदूषित होते. यासाठी सरकारने प्रथम मडगावातील अशा घरे-आस्थापनांवर कारवाई करावी व नंतर कोलवा येथे यावे असेही ते म्हणत आहेत. खरे तर अशा कारवाईची तरतूद संबंधित नियमावलीत आहे, पण सरकार कारवाई करत नसल्यानेच लोक मलनिस्सारण जोडण्याबाबत उदासीन आहेत. ∙∙∙
पणजी कला अकादमीच्या फोंड्यातील नाट्यशाळेने मेक-अप कार्यशाळा आयोजित केली आहे. पाहुणे घरात यायचे असतात, त्यावेळी अगोदर यजमान दिवाणखाना स्वच्छ करतात. बेडरूम नव्हे. तात्पर्य, नाटकाची महत्त्वाची अंगे - संहिता लेखन व दिग्दर्शन. ती स्वच्छता अगोदर नको का? गोव्यात स्वतंत्र नाट्यलेखनाचा दुष्काळ. यु ट्यूबवरून व इंग्रजी संहितांवरून रूपांतरीत केलेला, आपणाला न समजलेला शिळा माल कोंकणी मराठीतून फेकला जात आहे. दिग्दर्शक संहिता खरडून नाटककार समजू लागले आहेत. साहित्य, संवाद या गोष्टी ‘मजले रे मजले’ या उथळ कोट्यांनी उंची-खोलीने समजत नाहीत. अशा शाळांत अगोमंतकीयांची भरती झाल्यावर निष्पन्न काय होणार? राज्यात एकच रंगभूषा प्रशिक्षक आहे का, शाळेनं एक तरी चांगलं प्रोडक्शन दिलंय का? असे प्रश्न विचारले जातात. रंगमंचावर पाऊल न ठेवलेले प्रमुख होतात, तेव्हा नाटकाचं फलीत म्हणजे ‘घट्टण’ (पतन) हे निश्चित! ∙∙∙
बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी ऐन अस्मिताय दिनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची तुलना बांदोडकर यांच्याशी केल्याने सध्या त्यांना मतदारसंघात टीकेला तोंड द्यावे लागत आहे. व्हेंझी भाजपात जाण्याच्या वाटेवर आहेत असा त्यांच्यावर उघड आरोप होऊ लागला आहे. यावर उत्तर देताना व्हेंझींनी आपण भाजपात जाणार नाही, पण भाजपाला जातीयवादी असेही म्हणणार नाही असे म्हटले आहे. बाणावलीसारख्या मतदारसंघात व्हेंझी अशी भूमिका घेऊ शकतात का? मुख्यमंत्र्यांची ही स्तुती व्हेंझींना भोवणार तर नाही ना? ∙∙∙
पणजीत एकाबरोबरच स्मार्ट सिटीच्या कामासाठी सहा रस्ते बंद करण्याचा हुकूमनामा निघाला, त्याच दिवशी लोकोत्सवाची सुरवात झाली. कला अकादमी संकुलात लोकोत्सव सुरू होतो, तेव्हा वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. कांपाल भागात वाहने कशीही उभी करून ठेवली जातात व त्या भागात राहणाऱ्यांचे हाल होतात. त्यात आता रस्ते खोदून ठेवले आहेत व अनेक रस्ते बंद आहेत. लोक प्रश्न विचारतात की यंदा तरी ‘नागाळी हिल’सारख्या उपनगरात लोकोत्सव नेता आला नसता का? एका नागरिकाने विचारले आहे की, आपल्या नेत्यांचे डोके ठिकाणावर नाही का? पणजीच्या नेत्यांनाही हे का सुचत नाही? ∙∙∙
सध्या रुद्रेश्वराची रथयात्रा गोवाभर फिरत आहे आणि या निमित्ताने गटबाजीमुळे काहीशा मरगळलेल्या भंडारी समाजाला ऊर्जा प्राप्त झाल्यासारखी दिसत आहे. या यात्रेचे जनक असलेले कृषिमंत्री रवी नाईक यांनी यातून दोन तीर मारल्याचे बोलले जात आहे. पहिला तीर म्हणजे आपणच भंडारी समाजाचे खरे नेते असल्याचे परत एकदा दाखवून देणे आणि दुसरा तीर म्हणजे या समाजावर असलेल्या आपल्या वर्चस्वाची चुणूक भाजप श्रेष्ठींपर्यंत पोहोचवणे. आहे की नाही रवींचा ‘मास्टर स्ट्रोक’? आता याचा त्यांना काय फायदा होतो हे कळेलच, पण सध्या या त्यांच्या ‘मास्टर स्ट्रोक’ची फोंड्याच्या भंडारी समाजात जोरदार चर्चा सुरू आहे एवढे मात्र नक्की. ∙∙∙
आसगाव येथील रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चालकांना खड्ड्यांवर डांबर टाकले आहे का, की खड्डेच डांबरी झाले आहेत, हे समजणे कठीण झाले आहे. दुचाकीस्वारांना आता रस्ता पार करणे म्हणजे एखाद्या ‘स्टंट शो’चा अनुभव मिळतोय. त्यामुळे गाडी चालविण्याचा परवाना मिळवायचा असेल, तर या रस्त्यावर ‘टेस्ट’ देऊन मिळवावा! अशी चेष्टा लोक करू लागले आहेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.