

‘जे पेराल तेच उगवेल’ असे एक बोधवाक्य आहे. इतरांवर नाहक आरोप करून निष्पापांना संकटात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांच्या वाईट कृत्यांची फळे भोगावीच लागतात. कुडचडे येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांवर विद्यार्थिनीवर लैंगिक छळ करीत असल्याचा आरोप करून काही विद्यार्थिनींना फसवून त्यांच्याकडून खोटी तक्रार शिक्षण खात्याकडे व पोलिसांत करण्यात त्याच उच्च माध्यमिकमधील एक शिक्षिका जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. खोट्या ‘स्कँडल’ची निर्मिती ‘त्या’ शिक्षिकेने केल्याचे उघड झाले आहे.प्राचार्यांचा काटा काढण्याच्या उद्देशाने तिने काही मुलींना हाताशी धरून प्राचार्यांच्या विरोधात खोटी तक्रार केली. या खोट्या तक्रारीची बातमी वर्तमानपत्रात व समाज माध्यमात पेरल्याच्या आरोपावरून त्या शिक्षिकेला आता निलंबित करण्यात आले आहे. याच शिक्षिकेने उच्च माध्यमिक परीक्षेच्या वेळी गोवा बोर्डाकडे खोटी तक्रार केल्याचे उघड झाले आहे. प्राचार्यांवर खोटे आरोप करून त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र मॅडमने आखले होते. मात्र नशीब चांगले म्हणून ते प्राचार्य वाचले. शिक्षणासारख्या पवित्र पेशातील शिक्षिकेचे वागणे खरेच खालच्या थराचे असल्याची चर्चा आता कुडचड्यात होत आहे. ∙∙∙
शिरगावच्या जत्रेला होणाऱ्या गर्दीवर ‘ब्रेक’ लावण्याची जबाबदारी सरकारने अगदी मनावर घेतल्याचं दिसतंय. त्यातच विद्यमान समितीच्या बरखास्ताबाबतचा अर्ज मामलेदारांकडे गेला आणि ‘चार आठवड्यात निर्णय’ असा शब्द न्यायालयात दिला गेला... बस्स! एवढंच ऐकून काहींची झोप उडाली म्हणे. काही जण इतके अस्वस्थ झाले की थेट पत्रकार मित्रांचे फोन खणखणू लागले. ‘असं काही नाही’, ‘तसं काही नाही’, ‘मोठा गैरसमज आहे’ अशा गप्पांचा फड रंगला. आता उपेंद्र गावकर यांचा या सगळ्या प्रकरणाशी नेमका काय संबंध, हा प्रश्न मात्र अजूनही गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय. सरकारने ‘निर्णय घेणार’ एवढं जरी सांगितलं, तरी काहींचे धाबे दणाणले असतील, तर प्रत्यक्ष निर्णय लागल्यावर काय होईल, याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागली आहे. तोपर्यंत... फोन कॉल्सचा सीझन सुरूच राहणार बहुतेक! ∙∙∙
पर्यटन क्षेत्राचा आपणच तारणहार, असे मानणारे आमदार मायकल लोबो यांना क्लबसाठी धोरण असे आता वाटू लागले आहे. कोणत्याही कायद्यात क्लब म्हणजे काय, याची नीट व्याख्याच केलेली नाही. क्लबांवर कारवाईसाठी सरकारी यंत्रणा पुढे सरसावली तेव्हा ही बाब उघड झाली आहे. आधी कायदा करावा लागेल नंतर धोरण. क्लब ही संस्कृती नवी नव्हे. मुक्तीपूर्व काळापासून राज्यात क्लब कार्यरत आहेत. त्यांचे स्वरूप बदलत गेले आहेत. काळानुरूप नियम व कायदे केले गेले असते तर क्लबांवर अंकुश ठेवणे सरकारला शक्य झाले असते. मात्र, धोरण करण्याच्या नावाखाली क्लब म्हणजे काय हे कायदेशीर चौकटीत बसवणे विसरले जाण्याची भीती, यातून निर्माण झाली आहे. ∙∙∙
फोंडा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार रितेश नाईक आणि काँग्रेस उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्यातच खरी रंगत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केतन भाटीकर हे ‘मगो’चे नेते होते. परंतु, काही महिन्यांपूर्वी विविध विषयांवरून त्यांच्यात आणि ढवळीकर बंधूंमध्ये वितुष्ट आले. त्यामुळे भाटीकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवली. आता भाटीकर यांना फोंड्यातील ‘मगो’ समर्थकांचाही पाठिंबा मिळत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी वेगवेगळ्या चाली खेळण्यास सुरुवात केलेली आहे. फिरू शकणारी मते भाजपकडेच ठेवण्यासाठी दामू दिवसभर फोंड्यात तळ ठोकत आहेत. गुरुवारी त्यांनी फोंड्याचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व्यंकटेश नाईक यांचा रितेशना पाठिंबा मिळवून घेतला. नाईक किमान दोन हजार मते रितेशना मिळवून देऊ शकतात, हे माहीत असल्यामुळेच दामूंनी व्यंकटेश नाईक यांना मनवल्याची चर्चा मतदारांत आहे. ∙∙∙
राजकारणात यशस्वी होण्यासाठी जनतेच्या रुची व आवडी, निवडींचा ही विचार करावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ ही नवीन संकल्पना आणली आणि देशात सत्ता काबीज केली. दिवंगत रवी नाईक यांची ‘समोसा खाया, चाय पिया’ हे वाक्य सरळ जनतेच्या हृदयाशी कनेक्ट झाले होते. आता फोंडा पोटनिवडणुकीत भाजप व काँग्रेस तशाच प्रकारची ‘स्ट्रॅटेजी’ वापरू लागले आहेत. फोंडा पोट निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपच्या मोठ्या नेत्यांनी गाड्यावर रस ऑम्लेट खाऊन आपले साधारणपण दाखवण्याचा प्रयत्न केला.आता हे बघितल्यावर काँग्रेस थोडेच मागे राहणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे, व इतर नेत्यांनी फोंड्यातील गाड्यावर वडा पावावर व मिर्ची भजीवर ताव मारून ‘हम भी कुछ कम नहीं’ हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ∙∙∙
फोंडा पोट-निवडणुकीने सध्या जोर पकडला आहे. कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. कॉंग्रसचे तिन्ही आमदार दिवसा घरोघरी भेटी व कोपरा बैठका घेऊन भाषणे करतात व डॉ. केतन भाटीकरांना विजयी करण्याची साद फोंडावासीयांना घालतात. परंतु, गुरूवारी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी राजेश वेरेकरांना बरोबर घेऊन सर्व बुथ प्रमुख, पोलिंग एजंट यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जोश आणला. बैठकीला उपस्थिती चांगली होती. त्यानंतर ठाकरे-पाटकर यांनी ‘फायरब्रांड’ मनिषा उसगांवकरांसोबत जाऊन एका गाड्यावर वडा पाव-भजीचा आस्वाद घेतला. ठाकरे-पाटकरांच्या संघटन बांधणी उपक्रमाचे कॉंग्रेस कार्यकर्ते आज कौतुक करीत होते. आता, त्यांच्या प्रयत्नांना फळ येईल की शुक्रवारी कदाचित जाहीर होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या फोंडा निवडणुकीच्या वैधतेवर येणारा निकाल पाणी फेरेल, हे लवकरच कळेलच. ∙∙∙
अबकारी खाते छापे टाकते. कर न भरलेल्या दारूच्या बाटल्या जप्तही करते. अशा बाटल्या खात्याच्या गोदामात असतात. नियमानुसार त्या नष्टही कराव्या लागतात. कधी कधी कर चुकवेगिरीच्या खटल्यासाठी मुद्देमाल म्हणूनही त्या वापरल्या जातात. या बाटल्यांना केल्या काही वर्षात पाय फुटत होते, अशी चर्चा दबक्या आवाजात होते. खात्यावर ताबा असलेली व्यक्ती मदिरापानासाठी या फुकटच्या बाटल्यांचा वापर करत होती, असे बोलले जात होते. आता ती व्यक्ती खात्यापासून दूर झाली आणि या गोष्टीला वाचा फुटली, असे झाले आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.