

केपे: म्हापसा, काणकोण येथील घटनांनंतर आता कुडचडे परिसरातही लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला निर्जन डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी रॉबिन मार्क्स (वय २१, मूळ मेघालय, सध्या रा. काकोडा) याला अटक केली आहे.
कुडचडे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित रॉबिन याची पीडित महिलेच्या आईशी केरळ येथे काम करत असताना ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत त्याने पीडित महिलेच्या आसाम येथील आईशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. कुडचडे-काकोडा परिसरात काम उपलब्ध असल्याचे सांगून त्याने महिलेला गोव्यात बोलावून घेतले होते.
त्यानुसार, मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी पीडित महिला आपल्या पतीसह आणि आईसोबत काकोडा येथे दाखल झाली होती. बुधवारी सकाळी सुमारे सहाच्या सुमारास संशयिताने काकोडा औद्योगिक वसाहतीत काम असल्याचे सांगून त्या महिलेला आपल्यासोबत नेले. नंतर औद्योगिक वसाहतीच्या बाजूला असलेल्या निर्जन डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच, या घटनेची माहिती कोणालाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडित महिलेने पोलिसांनी सांगितले.
घरी परतल्यानंतर त्या महिलेने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या पतीला आणि आईला सांगितला. त्यानंतर कुडचडे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.