

वाळपई: अंबेशी - पर्ये येथील जमीन विकास आणि भूखंड विक्री व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत जमीनमालक नवीन विष्णू देसाई यांनी वाळपई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनुसार, अंबेशी-पर्ये येथील सर्व्हे क्रमांक ९५/१ए मधील सुमारे ४७,८०० चौरस मीटर जमिनीच्या विकासासाठी नवीन देसाई यांनी विश्वजीत के. राणे, शीतल बळीराम पाटील आणि विवेक अनंत आंबेकर यांच्याशी सामंजस्य करार केला होता.
शीतल पाटील आणि त्यांचे सहकारी श्रीधर शिवाजी नागोजीचे यांनी भूखंड विक्री व्यवहाराबाबत दिशाभूल करून फसवणूक केली. वारंवार संपर्क, पाठपुरावा आणि पैसे परत करण्याची मागणी करूनही संबंधितांनी संपूर्ण रक्कम अदा केलेली नाही.
श्रीधर शिवाजी नागोजीचे हे मूळ सामंजस्य करारातील पक्षकार नसतानाही त्यांनी स्वतःला करारातील तिन्ही भागीदारांचे प्रतिनिधी म्हणून सादर केले. या माध्यमातून त्यांनी तक्रारदारावर दबाव टाकून भूखंड विक्री व्यवहार करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या व्यवहारांमधील संपूर्ण विक्री रक्कम देण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या व्यवहारांबाबत विश्वजीत के. राणे आणि विवेक अनंत आंबेकर यांच्याकडे चौकशी केली असता, संबंधित व्यवहार त्यांच्या माहितीशिवाय झाल्याचे समजल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
तक्रारीनुसार, शीतल पाटील यांच्याकडे १ कोटी ६० लाख ६९ हजार १०० रुपये इतकी रक्कम थकीत आहे, तर श्रीधर शिवाजी नागोजीचे यांच्याकडे ५४ लाख ६१ हजार ९०० रुपये इतकी रक्कम बाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नवीन विष्णू देसाई यांनी वाळपई पोलिसांकडे केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.