धारगळ: कासारवर्णे (Kasarvarne, Goa) आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरणावेळी (Covid Vaccination) सुरक्षा नियमांचे योग्य पालन होत नसल्याने कोविड संसर्गाची दाट शक्यता आहे. पावसाची जोरदार सर आल्यानंतर रांगेतील लोक निवाऱ्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे सुरक्षा नियमांचा फज्जा उडत आहे. एवढेच नव्हे, तर तेथील कर्मचाऱ्यांनाही कोविड संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, शुक्रवारी या आरोग्य केंद्रात रॅपीड तपासणीत कुणीतरी पॉझिटिव्ह (Corona Positive) झाल्याची चर्चा दबक्या आवाजात होत होती. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता.
कासारवर्णे आरोग्य केंद्रात धारगळ, चांदेल, नागझर, वझरी व अन्य ठिकाणचे लोक लसीकरणासाठी येतात. तसेच मोप विमानतळ प्रकल्पातील कामगार, आयुष इस्पितळाचे काम करणारे कामगारही मोठ्या संख्येने येत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी तेथील कर्मचाऱ्यांना मलेरियाची लागण झाली होती. त्यामुळे स्थानिकांत घबराट पसरली होती. आता मोठ्या संख्येने तेथील कामगार कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी येत असल्याने स्थानिक व प्रकल्पातील कामगारांसाठी स्वतंत्र लसीकरण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
निवाराशेडचा अभाव
या आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी सकाळपासून लांबपर्यंत लोकांच्या रांगा लागत आहे. त्यात मोप विमानतळ व आयुष इस्पितळातील कामगारांचाही मोठ्या संख्येने समावेश असतो. रांगा लांबपर्यंत लागल्यानंतर जोरदार पाऊस आल्यानंतर रांगेतील लोक तात्पुरती सोय केलेल्या ठिकाणी गर्दी करतात. त्यामुळे लोकांमध्ये दोन मीटर नव्हे, तर अर्ध्या फुटाचेही अंतर असत नाही. त्यामुळे कोविड संसर्गाचा धोका अधिक संभवतो. निवाराशेडअभावी लस घेण्यासाठी आलेल्या लोकांची गैरसोय होत आहे.
काय झाले नेमके?
या लसीकरण केंद्रावर शुक्रवारी दुपारी ११.४५ वा.च्या सुमारास कुणीतरी कोविड पॉझिटिव्ह सापडल्याच्या वृत्ताने खळबळ माजली. नेमका कुणाला संसर्ग झाला याची बित्तंबातमी फुटू नये म्हणून दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. रांगेत असलेल्या दोन परप्रांतीय व्यक्तींना लसीकरण केंद्रातून नोंदणीवेळी अचानक बाहेर जाण्यास सांगितले. त्यापैकी एकाला सर्दी झाली होती व तो थोडा खोकत होता, तर दुसऱ्या व्यक्तीने ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र, त्यात काहीतरी तांत्रिक दोष होता. मात्र, दुसऱ्या बाजूने इस्पितळाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित कोविड पॉझिटिव्ह असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगत होती. यावेळी तेथे उपस्थित एका व्यक्तीने कुतुहलाने विचारणा केली असता, आपले गुपित फुटू नये म्हणून कागदपत्रे देऊन त्याला अक्षरश: घालवून देण्यात आले. मात्र, काहीतरी गौडबंगाल होते, हे मात्र तेथील त्यांच्या देहबोलीवरून संशयास्पद वाटत होते. दरम्यान, आमच्या प्रतिनिधीने याबाबत खात्री करण्यासाठी डॉ. दामोदर नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत तसे काहीच घडले नाही. तसेच जी व्यक्ती पॉझिटिव्ह सापडली, ती आपल्या आरोग्य केंद्राशी संबंधित नव्हती. लोक काहीतरी अफवा पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.