केरी-फोंडा येथील श्रीधर सतरकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या पूजा नाईक हिला न्यायालयाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सतरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पूजा नाईकविरुद्ध म्हार्दोळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. काही दिवसांपूर्वी, या प्रकरणात पूजाला दोन सरकारी अधिकारी मदत करत असल्याचे समोर आले होते. त्यापैकी श्रीधर सतरकर हे एक होते. सतरकर चौकशीनंतर बेपत्ता होते. मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड होताच एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणारी पूजा नाईक हिला फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाने 20 हजार रुपयांची हमी आणि अन्य अटींवर सशर्त जामीन मंजूर केला होता, मात्र या अटींची पूर्तता करेपर्यंत तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. पोलिसांनी आत्तापर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले असून, अजून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश देखील या प्रकरणात समावेश उघड झाल्याने काही मंत्र्यांची देखील नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, काही मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत.
पूजा नाईक हिच्या सरकारी नोकरीच्या जाळ्यात सुमारे शंभरजण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूजाने या कामासाठी काही गावांमध्ये एजंट ठेवले होते. त्या एजंटांमार्फत ती पैसे घेत होती. अजित सतरकर आणि श्रीधर सतरकर या दोघांनी अनेकांकडून पैसे घेऊन ते पूजाकडे दिले होते. दरम्यान, राज्यात सध्या सरकारी नोकरी घोटाळ्यावरुन रान उठलं आहे. विरोधक सातत्याने सावंत सरकारवर हल्लाबोल करत आहेत. नोकरी घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधक करतायेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.