
पणजी: पावसाळ्यानंतर मुरगाव बंदरातून कंटेनर वाहतुकीस प्रारंभ होण्याची शक्यता आहे. यामुळे औषध कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘ओशन नेटवर्क एक्स्प्रेस’(वन) या जागतिक शिपिंग कंपनीने यासाठी पुढाकार घेतला असून या कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधींनी नुकतीच गुरगाव बंदरातील डेल्टा पोर्ट्स मुरगाव टर्मिनलला भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
वनचे व्यवस्थापकीय संचालक मासाहिरो साकिकुबो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बंदरात भेट दिल्यानंतर मुरगाव पोर्ट प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीस मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विनोद कुमार, डेल्टा पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक अहमद मोहिउद्दीन, संचालक शमिल अहमद, उपाध्यक्ष राघोबा कोटकर, संचालन प्रमुख प्रवीर पटनायक, व्यवसाय विकास प्रमुख विष्णुप्रसाद आदी उपस्थित होते.
‘वन’ने गोव्यात कंटेनर सेवा सुरू करण्यासाठी स्पष्ट रुची दाखवली असून यासाठी फीडर ऑपरेटरचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. ही कंपनी गोवा बंदराला आपल्या नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. सीएमए-सीजीएम, मर्स्क, एमएससी आणि एचएमएम यांच्यासोबतही कंटेनर टनेजबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोव्यात अनेक मोठ्या औषध कंपन्यांचे निर्यातप्रधान प्रकल्प कार्यरत आहेत. सध्या त्यांच्या निर्यातीसाठी लागणारे कंटेनर ट्रक किंवा रेल्वेने मुंबईतील न्हावाशेवा बंदरात पोहोचवावे लागतात. यामुळे वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. मात्र मुरगाव बंदरातून थेट कंटेनर सेवा सुरु झाल्यास या कंपन्यांना घराजवळूनच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळू शकणार आहे. तसेच या उपक्रमांमुळे गोव्यातील सुक्ष्म, लघू, मध्यम आकाराच्या उद्योजकांना थेट निर्यात-आयात सुलभ होणार असून त्यांचे लॉजिस्टिक्स खर्च लक्षणीयरित्या कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुरगाव पोर्ट प्राधिकरणानेही या उपक्रमांना आवश्यक ती सर्व मदत आणि प्रोत्साहन देण्याची तयारी दर्शवली आहे. डेल्टा पोर्ट्सने देखील ‘स्माईल’ या सेवेअंतर्गत गोव्याचा समावेश करण्यासाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत चर्चा सुरु केली आहे. या सेवेअंतर्गत औषधे, मीठ, औद्योगिक मीठ, टाईल्स,आणि इतर उत्पादने जहाजातील कंटेनर मार्गे वाहून नेण्याची योजना आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.