उच्च न्‍यायालयाच्‍या निवाड्याला काँग्रेसचे 'सर्वोच्च' आव्‍हान, फोंडा पोटनिवडणूकप्रश्‍नी न्‍यायालयात याचिका सादर करणार

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीसंदर्भात उच्च न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशाला प्रदेश काँग्रेस पक्षातर्फे सर्वोच्च न्‍यायालयात आव्‍हान देण्यात येणार आहे.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फोंडा पोटनिवडणुकीसंदर्भात उच्च न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशाला प्रदेश काँग्रेस पक्षातर्फे सर्वोच्च न्‍यायालयात आव्‍हान देण्यात येणार आहे. याबाबत आम्‍ही सर्व कागदपत्रे तयार केली असून रविवारीच सर्वोच्च न्‍यायालयात आव्‍हान दिले जाईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष एम. के. शेख यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार (स्‍व.) रवी नाईक यांच्‍या निधनानंतर भारतीय निवडणूक आयोगाने ९ एप्रिल रोजी फोंड्यात पोटनिवडणूक घेण्‍याचे निश्‍चित केले होते. त्‍यानुसार मुख्‍य निवडणूक आयोगासह भाजप, काँग्रेस, आप या पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली.

Court
Goa Politics: आपल्याकडून विश्वासघात होणार नाही! काँग्रेस प्रवेशावेळी अमित पालेकरांनी नेत्यांना दिली ग्वाही

परंतु, या काळातच फोंड्यात निवडून येणाऱ्या नव्‍या आमदाराला कायद्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ मिळत नसल्‍याचा दावा करीत काहीजणांनी उच्च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. त्‍यावर सुनावणी घेऊन उच्च न्‍यायालयाने निवाडा राखून ठेवला होता. अखेर, ९ एप्रिल रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार असतानाच ८ एप्रिलला याचिकादारांची याचिका ग्राह्य ठरवत न्‍यायालयाने ही निवडणूकच रद्द केली. त्‍यामुळे राज्‍यात खळबळ उडाली होती.

उच्च न्‍यायालयाने फोंड्याची निवडणूक रद्द केल्‍यानंतर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याचे खापर भारतीय निवडणूक आयोगावर फोडले. आयोगाने निवडणूक अगोदर घेतली असती तर चांगले झाले असते, अशी भूमिका त्‍यांनी घेतली. तर इतर नेत्‍यांनी ‘न्‍यायालयाचा निर्णय मान्‍यच करावा लागेल’, असे स्‍पष्‍ट केले.

Court
Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 34 अंशांवर, घामाच्या धारांनी गोवेकर हैराण

विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’च्‍या नेत्‍यांनी मात्र पराभवाच्‍या भीतीने भाजपने भारतीय निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणूक रद्द केल्‍याचा दावा केला होता. त्‍यानंतर आता पाच दिवसांनी प्रदेश काँग्रेसकडून उच्च न्‍यायालयाच्‍या निवाड्याला सर्वोच्च न्‍यायालयात आव्‍हान देण्यात येणार आहे.

फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्‍याच्‍या उच्च न्‍यायालयाच्‍या आदेशाला सर्वोच्च न्‍यायालयात आव्‍हान देण्‍याची तयारी आमच्‍याकडून सुरू होती. त्‍याबाबतची सर्व कागदपत्रे तयार केली असून, रविवारी प्रदेश काँग्रेस सर्वोच्च न्‍यायालयात या आदेशाला आव्‍हान देणारी याचिका सादर करणार आहे.

- एम. के. शेख,

वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष, प्रदेश काँग्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com