मायकल लोबो यांना मुख्यमंत्री करा: काँग्रेस नेते

काँग्रेसी हितचिंतक: मायकल लोबोनां जर मुख्यमंत्री म्हणून पुढे केले तर काँग्रेस फुटणार नाही
Michael Lobo Latest News Updates | Goa election 2022 Latest New
Michael Lobo Latest News Updates | Goa election 2022 Latest NewDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: एकेकाळी गोव्याचे राजकारण सासष्टीकर चालवीत होते. काँग्रेस सरकारे सत्तेवर असताना सासष्टीतून काँग्रेसचे आठ आमदार निवडून यायचे. अर्धे मंत्रिमंडळ सासष्टीचे असायचे. मात्र, भाजपची सत्ता आली आणि सासष्टीचे महत्त्व कमी झाले.

आता सासष्टीतील काही अल्पसंख्याक काँग्रेसी नेते व इतर अल्पसंख्याक विद्वान व वकील हे मायकल लोबो यांना मुख्यमंत्री करावे असा सल्ला काँग्रेस पक्षाला द्यायला लागले आहेत. मायकल लोबोला जर मुख्यमंत्री म्हणून पुढे केले तर काँग्रेस फुटणार नाही आणि मायकलाला बाजूला ठेवले तर मात्र काँग्रेसची आणखी शकले होणे नक्की, असा इशारा हे काँग्रेस हितचिंतक पक्षाला द्यायला लागले आहेत. आता आपल्या लक्षात आलेच असणार ‘जोर रडता पेजेक.’ (Goa election 2022 Latest News Updates)

फोंड्यात कार्निव्हल झाला एकदाचा

हो-नाही म्हणत म्हणत अखेर फोंड्यातील कार्निव्हल महोत्सव उत्साहात साजरा झाला. सरकारने फोंड्यातील कार्निव्हलसाठी काही अनुदान दिले नाही. त्यामुळे हा कार्निव्हल होईल की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, फोंड्यातील काही मंडळींनी पुढाकार घेऊन अखेर देणग्या स्वीकारून कार्निव्हल साजरा केला. या कार्निव्हल महोत्सवात एक मात्र ठळकपणे दिसले, ते म्हणजे या महोत्सवात सहभागी लोकांनी ‘रॉय रवी नाईक’ अशी ठळकपणे लिहिलेले टी- शर्ट परिधान केले होते.

त्यामुळे या महोत्सवाचे प्रणेते रवी नाईक हेच असावेत, असा कयास अनेकांनी बांधला. एक मात्र खरे, राज्यात पहिल्यांदा कुणी सरकारी पातळीवर शिगमोत्सव आणला तर तो रवी नाईक यांनी ते मुख्यमंत्री असताना. फोंड्यात कार्निव्हलचीही सुरवात रवी नाईक यांनीच केली होती. आताही फोंड्याला सरकारने निधीसाठी डावलले; पण रवी नाईक समर्थकांनी पुढाकार घेतला आणि अखेर कार्निव्हल झालाच.

अनेक ठिकाणी सत्ताबदल

लोकांच्या मनांत एकंदर व्यवस्थेबद्दल प्रचंड चीड आहे व मतदानातून त्याचे प्रत्यंतर येऊन त्यातून परिवर्तन झालेले निकालानंतर दिसून येईल अशी भाकिते स्वतःच राजकीय विश्लेषक म्हणविणारे करत आहेत. त्यात अजिबात अतिशयोक्ती नाही व त्यामुळे अनेक नगरपालिकांतील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालील वाळू सरकू लागली आहे. याचे संकेत मिळाल्यावर अनेकांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. केवळ कुंकळ्ळीतच नव्हे तर शेजारच्या काणकोण पालिकेतही त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक मानले जाते.

फोंडा कुणाकडे?

फोंडा मतदारसंघात मातब्बर अशी लढत झाली आहे. माजी मुख्यमंत्री, माजी गृहमंत्री आणि फोंडा मतदारसंघाचे मागच्या काळातील आमदार रवी नाईक यांच्याशी काँग्रेसचे राजेश वेरेकर आणि मगोचे केतन भाटीकर यांनी टक्कर दिली आहे. भाजपचेच एक निष्ठावंत कार्यकर्ते असलेले संदीप खांडेपारकर यांनीही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली असली तरी खरी लढत ही तिरंगीच होणार आहे.

त्यामुळे भाजप, मगो आणि काँग्रेस यांच्यातीलच एकजण फोंड्याचा आमदार होणार आहे. या लढाईत मुस्लीम मतदार कुणाच्या पाठीशी आहेत, त्यावर सध्या चर्चा चालली आहे. मागच्या काळात काँग्रेसच्या रवी नाईक यांच्यासोबत बहुतांश मुस्लीम मतदार होते, पण रवींनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याने हे मतदार नाराज झाल्याचे ऐकिवात आहे. तरीपण निवडणुकीच्या आदल्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्याने या मुस्लीम मतदारांची एकगठ्ठा मते कुणाला बरे मिळाली असेल यावर सध्या चर्चा आहे. शेवटी प्रश्‍न अधिकाराचा आहे, आमदारकीचा आहे. त्यामुळे तिरंगी लढतीत कुणाची सरशी होते ते पाहुया.

लोबोंचे चिरंजीवही राजकारणात सक्रिय?

माजी मंत्री मायकल लोबो यांची पत्नी दिलायला लोबो राजकारणात उतरल्यानंतर आता त्यांचे पुत्र डॅनियल हेही राजकारणात हल्ली सक्रिय होत आहेत, असा सध्या बोलबाला आहे. दिलायला यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवल्यानंतर त्या निवडणुकीचा निकाल लागेल तो लागेल! पण, सध्या तरी लोबो कुटुंबीयांनी शिवोली मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून, तेथील जनतेच्या सुखदु:खाशी समरस होत त्यांना यथायोग्य आर्थिक मदत करण्याबरोबरच लोबो कुटुंबीय सध्या कळंगूटपेक्षा शिवोली मतदारसंघातील सार्वजनिक कार्यात अधिक रस घेत आहेत, असे जाणवते. निवडणूक झाल्यानंतरही हे कुटुंब देवस्थानांसाठी भरीव आर्थिक सहकार्य करीत आहेत, हे प्रत्ययास येते.

मायकल, दिलायला यांच्या बरोबरीनेच त्यांचे पुत्र डॅनिएल हेही आता शिवोलीतील कित्येक कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. त्यामध्ये विशेषत: देवस्थानांच्या कार्यक्रमांचा समावेश असतो. दोनच दिवसांपूर्वी त्या तिघांनी सकलवाडा-आसगाव येथील दत्तात्रेय देवस्थानाला भेट देऊन मोठी देणगी दिल्याचेही ऐकिवात आहे.

पाणी बिलाचा शॉक

सरकारने सोळा हजार लिटर्स पाणी दर महिन्याला ग्राहकांना मोफत देणार म्हणून सांगण्यात आले होते, पण आता त्याच पाण्याचा चटका ग्राहकांना दिला जात असून एकूण सहा महिन्याचे एकत्रीत बिलं ग्राहकांच्या माथी मारण्याचे कार्य सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरू केले असले तरी याला उत्तर देण्याची जबाबदारी सरकार म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आहे. कारण मोफत पाणीपुरवठा घोषणा करून ते जनतेकडून शाबासकी मिळवू शकतात तर वाढीव बिलाची जबाबदारी त्यांनीच घ्यावी. कारण आधी मोफत म्हणावे अन मागावून भरमसाट बिलं देणं हे जनतेला मुळीच सहन होणार नसल्याची टीका सर्वत्र सुरू झाली आहे.

म्हापसा मुख्याधिकाऱ्यांचे धैर्य!

म्हापशातील कार्निव्हल उत्सवानिमित्तच्या चित्ररथ मिरवणुकीच्या निमित्ताने दरवर्षी या शहरातील हुतात्मा चौक, महात्मा गांधी चौक इत्यादी राष्ट्रीय स्मारकांच्या आवारात तरुण-तरुणींची ‘भलतीसलती’ छायाचित्रे असलेले पोस्टर्स, बॅनर्स दरवर्षी झळकत असायचे. परंतु, या विषयाचा पाठपुरावा म्हापशातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमकतेने केल्यानंतर यंदा तशा स्वरूपाचा कोणताही फलक कार्निव्हलवेळी त्या परिसरात दिसला नाही, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. या बाबतीत स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा यांना न जुमानता पालिकेचे मुख्याधिकारी दीपेश ऊर्फ गुरुदास सावळ यांनी धैर्य दाखवल्याने संस्कृतिप्रेमी म्हापसावासीयांकडून त्यांची सध्या प्रशंसा केली जात आहे.

नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनीही त्यांना या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद दिल्यानेच राष्ट्रीय स्मारकांचा यथोचित मान यंदा प्रथमत:च म्हापशात राखणे शक्य झाल्याच्या प्रतिक्रिया म्हापसावासीयांकडून व्यक्त होत असून, आगामी शिमगोत्सवातही अशाच प्रकारचा धडाडीचा निर्णय पालिकेने घ्यावा अशी अभिलाषा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. असे असले तरी संस्कृतिप्रिय म्हणून दावा केल्या जाणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनी या विषयावर कोणतेही जाहीर वक्तव्य केले नसल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शंभर टक्के सावित्रीच

सांगेत भाजपतर्फे सुभाष फळदेसाई आणि काँग्रेसतर्फे प्रसाद गावकर यांनी निवडणूक लढविली असली तरी जिंकून मात्र अपक्ष सावित्रीच येणार, अशी खात्री कित्येकजण व्यक्त करीत आहेत. या निवडणुकीत म्हणे सर्वात सढळ हात सवित्रीनेच मोकळा सोडला होता. त्यामुळे त्याची पावती तिला विजयाच्या रुपात मिळणार असे सांगितले जाते.

जांबावली येथील एका गटाने सावित्रीसाठी झटून काम केले होते. काल सावित्री एका कार्यक्रमासाठी जांबावली येथे आल्या असता या गटाने निकालापूर्वीच आपला तिचा विजय साजरा केला. सवित्रीचाच 100 टक्के विजय असा दावा हा गट करत होता. हा आत्मविश्वास की अति आत्मविश्वास हे कळण्यासाठी 10 मार्च ही उजडावी लागणार हेच खरे.

ते खोटे भाजपावाले!

आपल्याबरोबर काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता आमदार बनला तर ती अभिमानाची बाब असावी. मात्र, नावेली मतदारसंघातील तीन भाजपा कार्यकर्त्यांचे उलटेच. उल्हास तुयेकर सारखा एक सामान्य कार्यकर्ता आमदार बनणार म्हणून या तिघा तथाकथित भाजप कार्यकर्त्यांच्या पोटात दुखायला लागले आहे म्हणून या तिघांनी उल्हासला मदत करण्याचे सोडाच उल्हासला पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला मदत केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणारा एक बिल्डर, एक माजी सरपंच व दोनदा निवडणुकीत पराभूत झालेला मिळून या तीन भाजपाच्या अनिष्ठ कार्यकर्त्यांनी द्वेषापोटी पक्षाशीच गद्दारी करून राजकारणी घाणेरडे असतात, हे दाखवून दिले.

‘तळे राखी तो पाणी चाखे’

राज्यातील विधानसभा निवडणूक झाली खरी पण आता दोन महिन्यांनी राज्यातील पंचायतींच्या निवडणुकाही होणार आहेत. नियमाप्रमाणे निवडणूक होणार असली तरी पंचायतींच्या प्रभाग फेररचनेत अनेक ठिकाणी घोळ घातला गेला आहे.

विद्यमान राज्यकर्त्यांनीच हा घोळ घातल्याचा आरोप होत आहे. आपल्याला हवा तसा प्रभाग फाडून, तुकडे करून जी मते आपल्याच समर्थकाला मिळतील, अशा पद्धतीने हे जागावाटप केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांचा रोष उमटत आहे. आता काय खरे काय खोटे हे संबंधित लोकच जाणे. पण एक मात्र खरे ‘तळे राखी तो पाणी चाखे’ बरोबर ना?

Michael Lobo Latest News Updates | Goa election 2022 Latest New
पंचायत प्रभाग फेररचनी घाईगडबडीला दिगंबर कामत यांचा विरोध

अखेर ‘रणजी’चा टिळा लागला

राजकीय वजन वापरून गोव्याच्या रणजी संघात स्थान मिळवू इच्छिणाऱ्या खेळाडूची माहिती ‘खरी कुजबूज’मध्ये गुरुवारी दिली होती, ती प्रत्यक्षात आली. तब्बल पाच वर्षे गोव्याच्या रणजी संघात प्रवेश करण्यासाठी तिष्ठत राहिलेल्या ‘वास्को’कर क्रिकेटपटूस अखेर रणजी क्रिकेट संघाची कॅप मिळाली व तो माजी रणजीपटू ही उपाधी मिरविण्यास पात्र ठरला. सौराष्ट्रविरुद्धच्या लढतीत आपणास कोणत्या कारणास्तव संघाबाहेर जावे लागले हे वगळलेल्या बिचाऱ्या खेळाडूस कळलेच नाही.

ओडिशा व मुंबईविरुद्ध त्याने कठीणसमयी तळात उपयुक्त फलंदाजी केली. दोन्ही लढतीत त्याला फिरकी गोलंदाजीची कमीच संधी मिळाली. मात्र वशिल्याचा तट्टू असलेल्या खेळाडूस गोव्याच्या रणजी संघात घुसवताना गोव्यातील क्रिकेटमधील संबंधितांमुळे अमूल्य ‘बळीचा बकरा’ ठरला हे निश्चित.

Michael Lobo Latest News Updates | Goa election 2022 Latest New
Goa Panchayat Election: राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार पंचायत निवडणुका

सदानंद तुम्ही गैर बोललात!

भाजपा विरुद्ध अपप्रचार करूनसुद्धा राज्यातील मोठ्या पदावर पोहचलेल्या पैकी सदानंद तानावडे होय. इतर बरेचजण आहेत; पण वाचाळवीर म्हणून प्रसिद्धीस पावले ते एकटेच. उत्पल पर्रीकर संदर्भात बोलताना सदानंद जरा आगाऊपणा करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपाने तिकीट नाकारली तेव्हा सदानंद तानावडे(Sadanand Tanawade) यांनी काय प्रताप केले त्याचा पंचनामा अनेक वेळा संगम भोसले यांनी केला. पण, खुलासा करण्याचे धाडस कोणी केले नाही. आता सर्व काही करून आपण कसा निष्ठावंत भाजपा नेता असल्याचा आव आणून दुसऱ्याला फुकटचे उपदेश देत आहेत. त्यामुळे सदानंदरावांनी जरा सांभाळून बोललेच बरे, असे लोकांना वाटते.

राजभवनातील दरबार हॉल

दोनापावला येथील काबो राजभवनात उभारलेल्या नव्या दरबार हॉलचे उद्‍घाटन शुक्रवारी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. या पोर्तुगीजकालीन वास्तूत दरबार हॉल होता. पण, त्याचा आकार मर्यादित होता. आजवर भाऊसाहेबांपासून बहुतेक मंत्रिमंडळांचा शपथविधी तेथेच झाला. अपवाद फक्त 2012 सालचा. त्यावेळी पूर्ण बहुमताचा कौल मिळालेल्या मनोहर पर्रीकर यांनी कांपाल मैदानावर जाहीर सोहळ्यात शपथ घेतली होती. घटकराज्य दर्जानंतर वाढलेली आमदारसंख्या व त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आदींचा विचार करून अधिक क्षमतेच्या दरबार हॉलचे काम हाती घेतले गेले व आता त्याचे काम पूर्ण होऊन उद्‍घाटन झाल्याने मतमोजणीनंतर तेथे कोणत्या सरकारचा शपथविधी होतो, त्याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

संतोष आशावादी!

माणसाने नेहमीच आशावादी असावे. कारण आशेवरच हा संसार उभा आहे, असे म्हणतात ते खरे. विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच दिवसांनी लागणार आहे. गोव्यातील कोणत्या मतदारसंघात कोणाचे पारडे जड आहे, कुठल्या मतदारसंघात कोण जिंकणार व कोण हरणार? याचे गणित व विश्लेषण वर्तमान पत्रात व सोशल मीडियावर येत आहे. किती अपक्ष जिंकणार याचे भाकीतही केले जात आहे; मात्र कुंकळ्ळी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या संतोष फळदेसाई यांचे नाव संभाव्य विजयी उमेदवार म्हणून कोणीच घेत नाही. यावर संतोष म्हणतात - ‘पर्वा नाही. आपणच कुंकळ्ळी जिंकणार.’ याला म्हणतात आत्मविश्वास.

Michael Lobo Latest News Updates | Goa election 2022 Latest New
रशिया-युक्रेन युद्धाचा थेट परिणाम गोव्यात खाद्य तेलाच्या किमतींवर

सरकार कुणाचे?

मतदानापूर्वी गोव्यात सरकारस्थापनेसाठी अनेक पक्ष गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. पण, मतदानानंतर त्यातील अनेकजण बेपत्ता झाले आहेत. तृणमूलशी संधान जुळवलेल्या म. गो. वाल्यांचाही आवाज क्षीण झालेला आढळतो. दुसरीकडे काँग्रेस व भाजप यांचा आवाज वाढलेला आहे. अगोदर 22 प्लसची भाषा करणारे भाजप नेते व काँग्रेस नेतेही सरकार आपलेच असेल ते स्थापण्याची संधी यावेळी सोडणार नाहीत, असे परत परत सांगू लागल्याने या सर्वांनाच विजयाबद्दल संशय वाटू लागला आहे की, काय असे इतरांना वाटू लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com