Goa Congress : दुहेरी नागरिकत्वासाठी काँग्रेसची भूमिकाच नाही; थरूर यांची कबुली

Goa Congress : काँग्रेस भवनात झालेल्या या परिषदेला गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि सरचिटणीस विजय भिके उपस्थित होते.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress :

पणजी,काँग्रेसने दुहेरी नागरिकत्व या विषयावर कोणतीही भूमिका घेतली नसली तरी या विषयावर चर्चा झाली पाहिजे, परंतु त्यासाठी कायदेशीर फॉर्म्युला शोधण्याची गरज आहे असे आपले वैयक्तिक मत असल्याचे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेस भवनात झालेल्या या परिषदेला गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि सरचिटणीस विजय भिके उपस्थित होते.

सुरवातीलाच भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर थरूर यांनी टीका केली. दहा वर्षांत केंद्रात आलेल्या भाजप सरकारमुळे देशातील लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत भाजपच्या राजवटीत हा पक्ष प्रत्येक गोष्टीवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विविध तपास यंत्रणांचा गैरवापर करून निवडक विरोधकांना लक्ष्य केले जाते आहे. त्याचबरोबर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना भाजपात घेतले जात आहे आणि त्यांच्यावरील गुन्हे गायब होत असल्याचे दिसत आहे.

Goa Congress
Goa News : मुलांना आनंदी वातावरणामध्ये शिकवायला हवे; जयश्री बाविस्कर यांचे प्रतिपादन

ते म्हणाले, दोन कोटी नोकऱ्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणे अशी आश्वासने दिली, पण ती सर्व जुमला ठरला आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यास पक्षांतरविरोधी कायदा अधिक मजबूत केला जाणार आहे.

देशातील लोकशाही धोक्यात आहे आणि तिचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गोव्यातील जनतेने लोकशाही, विविधता, भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि ‘वॉशिंग मशिन राजकारण’ रोखण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘उत्तर भारतातून चांगला प्रतिसाद’

अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेवर थरूर म्हणाले, की एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या तोंडावर तुरुंगात टाकून भाजपने आपली हतबलता दाखवून दिली आहे. भाजपने निवडणुकीच्या तोंडावरच असे का केले, असा सवाल त्यांनी केला.

भाजपच्या ४०० पार या घोषणेविषयी ते म्हणाले, भाजप हा आकडा ओलांडू शकत नाही. आम्हाला निवडणुकीच्या दोन टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांमधूनही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

‘देशव्यापी चर्चा व्हायला हवी’

दुहेरी नागरिकत्वाचा विषय जुना आहे. मी अनिवासी भारतीय होतो. नंतर मी देशात आलो, खासदार झालो, केंद्रीय मंत्रिमंडळातही माझा समावेश झाला. मुंबईतील प्रवासी भारतीय संमेलनात प्रथम मी हा विषय मांडला. त्यावेळी विदेशात राहणाऱ्या भारतीयांना मतदानाचा हक्क हवा असा विषय होता.

त्यातून विदेशातील भारतीय नागरिक (ओसीआय) ही संकल्पना पुढे आली, त्यातून त्यांना ओळखपत्र देऊन अनिर्बंध व्हिसाची सोय झाली. मात्र, मतदानाचा प्रश्न तसाच राहिला. आता पुन्हा या विषयावर देशव्यापी चर्चा सुरू करण्याची माझी तयारी आहे. वैयक्तिक पातळीवर मी हे प्रयत्न करणार आहे. पक्षाच्या मंचावरही मी हा विचार मांडेन. मात्र, पक्षाने या विषयावर भूमिका न घेतल्याने मी या विषयावर पक्षाची भूमिका सांगू शकत नसल्याचे थरूर यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com