

म्हापसा: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली. तिघा कैद्यांकडून झालेल्या या मारबडवमध्ये सीमांचल परिदा हा कैदी जखमी झाला असून त्याला उपचारार्थ गोमेकॉत दाखल केले.
या मारहाण प्रकरणी तुरूंग प्रशासनाने मंथन च्यारी, बाबू भालेकर व सागर पाटील या कैद्यांसह जखमी सीमांचल परिदा याच्याविरूध्द परस्परविरोधी गुन्हा नोंदवण्याची तक्रार गुंडरली आहे.
ही घटना बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली. रात्रीच्या जेवणावेळी कैद्यांना त्यांच्या सेल (बॅरेक)मधून बाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी जखमी सीमांचल परिदा हा कैदी वरच्या सेलमध्ये गेला. तिथे मंथन च्यारी, बाबू भालेकर व सागर पाटील यांच्या सोबत त्याचा वाद झाला. नंतर प्रकरण हातघाईवर गेले.
या संशयितीं कैद्यांनी इतर काही कैद्यांच्या सहाय्याने सीमांचल याला पकडून जमीनीवर पाडून लाथाबुक्कीने मारहाण करण्यास सुरूवात केली. हा प्रकार तुरूंग कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत, संशयित कैद्यांच्या तावडीतून जखमी कैद्याची सुटका केली. नंतर जखमी सीमांचल याला उपचारार्थ म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. डोक्याला मार लागल्यामुळे त्याला पुढील उपचारार्थ गोमेकॉत पाठवण्यात आले.
चार कैद्यांवर परस्परविरोधात तक्रार
या प्रकरणी तुरूंग प्रशासनाने कोलवाळ पोलिसांत परस्परविरोधात तक्रार गुंडरली आहे. परंतु ही तक्रार सविस्तर नसल्यामुळे पोलिसांनी तुरूंग प्रशासनाला घटनाक्रमानुसार व्यवस्थित तक्रार दाखल करण्याची सूचना केली आहे. कारागृह अधिकाऱ्यांकडून ही तक्रार आल्यावर पोलिस गुन्हा नोंद करणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
कारागृहात चार कैद्यांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला असून याबाबतीत कोलवाळ पोलिसांत परस्परविरोधी तक्रार नोंदवण्यात आली आहे.
– सूचिता देसाई, तुरूंग अधीक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.