म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी आपले कौशल्य दाखवत विविध आकाराच्या सुरेख गणेशमूर्ती बनवल्या आहेत. या मूर्ती आता सर्वसामान्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असून आकारानुसार १२०० ते ३५०० रुपयांपर्यंत त्यांचा दर आहे.
कोलवाळ कारागृहातील पॉटरी विभागात काम करणाऱ्या कैद्यांच्या गटाने सुमारे १०० गणेशमूर्ती बनवल्या आहेत. गुन्हेगारीत अडकलेल्या हातांना समाजाच्या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी कारागृह प्रशासनातर्फे अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून हा प्रयत्न केला आहे. कैद्यांना त्यांच्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आणि त्यांच्या सुटकेनंतर त्यांना मदत करणारी कौशल्ये शिकण्यासाठी प्रवृत्त आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृह प्राधिकरण विविध उपक्रम आखत आहे.
कारागृह विभागाने सुधारात्मक उपक्रम सुरू केले आहेत. उत्पादनात अनेक पटींनी वाढ झाली आहे. मध्यवर्ती कारागृहाचे अधिकारी व इतर कर्मचारी कैद्यांना सत्कार्यास प्रवृत्त करत आहेत. परिणामी यावर्षी पुन्हा पॉटरी (कुंभार) विभागाशी संलग्न असलेल्या कैद्यांना १०० हून अधिक नागोबाच्या मूर्ती बनवून त्यांची विक्री करून कारागृह विभागात एक नवीन भरारी घेतली.
कैद्यांसाठी सुधारात्मक उपक्रमांचा एक भाग म्हणून त्यांच्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. अलीकडे कैद्यांनी नागोबाच्या मूर्ती तयार केल्या होत्या व त्या सर्व हातोहात विकल्या गेल्या होत्या. आता पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवल्या आहेत. अलीकडेच आम्ही कैद्यांसाठी नवीन स्मार्ट कार्ड कॉलिंग सिस्मटसह सुरक्षा उपायांमध्ये सुधारणे करणे, महिला कैद्यांसाठी फुल बनविणे, मसाला दळणे व इतर उपक्रम उपलब्ध करून दिले आहेत. ते राबवताना तुरुंगातील वातावरण सकारात्मक राहते, असे कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर यांनी सांगितले.
आमचा मुख्य हेतू कैद्यांमध्ये सुधारणा करणे हा आहे, जेणेकरून ते बाहेर गेल्यानंतर ते चांगले व्यक्तिमत्त्व बनून स्वावलंबी होऊ शकतात. आमच्याकडे सुमारे १०० पर्यावरणपूरक मूर्ती तयार आहेत. लोकांनी त्या खरेदी करून कैद्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे.
शंकर गावकर, (अधीक्षक, कोलवाळ मध्यवर्ती कारागृह)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.