

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बुधवारी कैद्यांमध्ये पुन्हा हाणामारीची घटना घडली. आयरिश तरुणी डॅनियली मॅकलॉग्लीन हिच्या २०१७ मधील बलात्कार व खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या विकट भगत याच्यावर सुमारे दहा कैद्यांच्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात विकट गंभीर जखमी झाला असून, भांडण सोडवण्यासाठी गेलेला जेलगार्डही जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ३.४५ ते ४ च्या दरम्यान ही घटना घडली. इतर कैद्यांशी वारंवार वाद होत असल्याने कारागृह प्रशासनाने विकट भगत याला ‘हाय सिक्युरिटी सेल’मध्ये ठेवले होते. बुधवारी जेलगार्डच्या उपस्थितीत तो सेलबाहेर असताना जुन्या वैमनस्यातून तसेच अंतर्गत वर्चस्वाच्या वादातून सुमारे दहा कैद्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले.
यावेळी मध्यस्थी करणाऱ्या जेलगार्डलाही मारहाण झाली. घटनेची माहिती मिळताच कारागृह प्रशासनाने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. गंभीर जखमी भगत याला प्रथम म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला खोल जखमा असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्याला पुढील उपचारांसाठी गोमेकॉत हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी कारागृह प्रशासनाने हल्ल्यात सहभागी कैद्यांची नावे नमूद करून कोलवाळ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. उशिरापर्यंत पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया आणि पुढील तपास सुरू होता. दरम्यान, जेलगार्ड उपस्थित असतानाही हाय सिक्युरिटी विभागाजवळ हल्ल्याची घटना घडल्याने कोलवाळ कारागृहातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.