

मडगाव : कोलवा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विक्रम नाईक हे बिल्डरांची पाठराखण करत स्थानिकांना सतावतात. तीन महिन्यांपूर्वी बदली झाल्याचा आदेश जारी होऊनही ते अजून कोलव्यातच कसे, असा सवाल करत कोलवा येथील नागरिकांनी पोलिस स्थानकाला वेढा घातला.
तथापि, उद्यापर्यंत नाईक यांची बदली केली जाईल असे आश्वासन दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिल्यावर लोकांनी आंदोलन मागे घेतले. सायंकाळी निरीक्षक नाईक यांना कोलवा पोलिस स्थानकावरून हटवून राखीव पोलिस विभागात बदली केली. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
कोलवा येथील मच्छीमार आंतोनियो रॉड्रिग्स यांच्यावर काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील बिल्डर शुभ्रांशु गुप्ता याने पोलिस निरीक्षक नाईक हे त्या जागी उपस्थित असताना हल्ला केला. मात्र, नाईक यांनी त्यावेळी हस्तक्षेप केला नाही. उलट रॉड्रिग्स यांना तुम्ही मरायला आला आहात, अशा शब्दांत हिणवले असा ग्रामस्थांचा आरोप होता.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सेंट अँथनी चॅपेलजवळ बैठक बोलावली होती. यावेळी निरीक्षक नाईक हे दहा पंधरा पोलिसांसह त्या ठिकाणी आले. त्यांनी चॅपेलच्या पाद्रीकडे बंद खोलीत बोलण्याचा प्रयत्न केल्याने जमाव खवळला आणि लोक पोलिस स्थानकात दाखल झाले. त्यामुळे पोलिस स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, अशी विनंती करण्यासाठी चॅपेलमध्ये गेलो होतो, असे निरीक्षक नाईक यांनी सांगितले.
या जमावात स्थानिक आमदार वेंझी व्हिएगस हेही उपस्थित होते. स्थिती हाताबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस अधीक्षक संतोष देसाई आणि सिद्धांत शिरोडकर हे त्या ठिकाणी पोहोचले. स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांची अतिरिक्त पोलिस कुमक तिथे तैनात केली होती. यानंतर अधीक्षक देसाई यांनी लोकांची समजूत काढली. पोलिस निरीक्षक नाईक यांनीही लोकांची माफी मागितली, असे व्हिएगस यांनी सांगितले. मच्छीमार रॉड्रिग्स यांच्यावर हल्ला करणारा बिल्डर गुप्ता यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी लोकांनी केली.
काही दिवसांपूर्वी बिल्डरने पुन्हा काम सुरू केल्याने हा वाद पुन्हा चिघळला. हे काम सुरू असताना त्याचे चित्रीकरण सुरू केल्यावर त्या बिल्डरने पोलिसांना फोन केला. त्यावेळी पोलिस निरीक्षक नाईक यांनी रॉड्रिग्स यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुप्ता यांनी रॉड्रिग्स यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करूनही नाईक यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही, असा लोकांचा आरोप होता. या प्रकल्पाला पंचायतीने परवाना दिला नसतानाही हे काम सुरू ठेवले होते.
कोलवा पंचायतीच्या प्रभाग तीनमध्ये दहा स्विमिंग पूल असलेला दहा व्हिलांचा प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमारांची पारंपरिक वाट अडविल्याने हा वाद निर्माण झाला. हा प्रकल्प ज्या ठिकाणी उभारण्यात येत आहे, त्याच्या बाजूला मच्छीमार रॉड्रिग्स यांची जागा असून त्यांची वाट अडवली जाणार नाही, असे आश्वासन त्यांना सुरुवातीला दिले होते. मात्र, आता ती वाट कुंपण घालून बंद करण्याचा प्रयत्न केल्याने हा वाद निर्माण झाला. रॉड्रिग्ज यांनी तक्रार केल्यावर पंचायतीने ‘काम बंद’ची नोटीस बजावून १३ रोजी पाहणी ठेवली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.