

सासष्टी: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक असलेला कोलवा समुद्रकिनारा सध्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येला सामोरा जात आहे.
निसर्गरम्य वातावरण, शुभ्र वाळू आणि शांत समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखला जाणारा हा परिसर आता दुर्गंधी, सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, किनाऱ्यावर जाण्यासाठी पर्यटकांना ज्या खाडीमधून प्रवेश करावा लागतो, तीच खाडी सध्या प्रदूषणाने भरून गेल्याने पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक कोलवा किनाऱ्याला भेट देतात. मात्र, खाडीत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने आणि सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्यावर हिरवट शेवाळाचा थर जमा झाला आहे. या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून किनाऱ्यावर प्रवेश करतानाच पर्यटकांना नाक दाबून चालावे लागत आहे. अनेक पर्यटक नाकाला रुमाल बांधून खाडी पार करताना दिसत आहेत. पर्यटनस्थळाच्या प्रतिमेला हा प्रकार मारक ठरत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
खाडीशेजारी असलेल्या उद्यानाचीही दयनीय अवस्था झाली आहे. लहान मुलांसाठी बसविण्यात आलेली खेळणी आणि इतर साधने गंजली असून काही उपकरणे मोडकळीस आली आहेत. त्यामुळे हे उद्यान मुलांसाठी धोकादायक बनल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कोलवा किनाऱ्याच्या सौंदर्यावर प्रदूषणाचे सावट गडद होत असून प्रशासनाने तातडीने खाडी स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि उद्यान दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून होत आहे.
स्थानिक रहिवासी फिडोल परेरा यांनी या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. खाडीची नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हे अत्यंत लाजिरवाणे चित्र आहे. पर्यटन विभागाने उद्यानाच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी टीकाही परेरा यांनी केली.
पर्यटन विकासासाठी शासन आणि पर्यटन खाते कोट्यवधी रुपये खर्च करीत असले, तरी प्रत्यक्षात मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केवळ जाहिराती करून चालणार नाही, तर स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.