कोळसा हाताळणी करणाऱ्या उद्योगांना प्रदूषणप्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे लवकरच फाईल पाठविणार आहे, असे उद्योग व कौशल्य विकासमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. कोळसा प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सज्ज राहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी वाढविण्यास परवानगी दिली असल्यामुळे तेथे कोणतेही प्रदूषण होणार नाही असे आपल्याला वाटते. तसेच हे प्रदूषण गोवा राज्य प्रदूषण नियंत्रणसारख्या स्थानिक सरकारी संस्थांनी सुनिश्चित केले पाहिजे.
मी सर्व प्राधिकरणांशी संपर्क साधणार आहे आणि त्यांनी या उद्योगांना अधिक कोळसा हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रदूषणविरोधी उपाययोजना करण्यास भाग पाडावे यासाठी एक फाईल पाठविणार आहे. जेएसडब्ल्यूने जयगड बंदरात केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोळसा प्रदूषण रोखले गेले आहे, असा दावा गुदिन्हो यांनी केला.
विकासाभिमुख प्रकल्पांमुळे राज्यात रोजगार निर्माण होतात. अनेक बेरोजगार युवकांच्या हातांना काम मिळते. लोक आर्थिक क्रियाकलापांशिवाय जगू शकत नाहीत. रोजगारामुळे प्रगतीला हातभार लागतो. दुसरी बाजू म्हणजे कंपन्यांचा खूप मोठा खर्च.
कोळशा प्रदूषणाविरोधात आंदोलन करणे ही आता काही लोकांसाठी एक फॅशनच बनली आहे. जे आता सत्तेच्या बाहेर गेलेले आहेत आणि कोणत्याही निर्णयाने पक्षाबाहेर गेले आहेत, त्यांचीच या आंदोलनाला फूस आहे, असा आरोप गुदिन्हो यांनी केला.
राजकारणातून बाहेर फेकल्या गेलेल्या लोकांना जेव्हा प्रगती खुपते, तेव्हा ते लोकांना भडकवतात. आंदोलन करण्यास भाग पाडतात. परंतु शेवटी ते समाजाच्या व्यापक हिताच्या विरोधात आहेत. हा खरा गंभीर मुद्दा आहे आणि सरकार त्याकडे लक्ष देईल. पण लोकांना रस्त्यावर आणून आपली हरवलेली राजकीय कारकीर्द पुन्हा जिवंत करण्यासाठी आंदोलन केले जाऊ नये.
- माविन गुदिन्हो, उद्योग व कौशल्य विकासमंत्री
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.