

पणजी: राज्यात काही व्यापारी गोव्याचा काजू म्हणून चक्क आफ्रिकेतील आणि परराज्यातील काजूची विक्री करतात; परंतु अशा प्रकारे गोव्याचे नाव वापरून जर कोणी भलताच काजू विकत असेल तर अन्न व औषध प्रशासन खात्यामार्फत कठोर कारवाई केली जाईल. असले प्रकार अजिबात खपवून घेणार नसल्याच्या इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
अध्यक्ष केदार नाईक, आमदार दाजी साळकर, दिलायला लोबो, प्रधान वनसंरक्षक कमल दत्त, अमर हेबळेकर आणि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यातील काजू हा इतर राज्यांतील काजूच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. सेंद्रियरित्या पिकविला जात असल्याने तो चविष्ट आहे. त्यामुळे गोव्याच्या मातीत पिकलेलाच ‘गोव्याचा काजू’ म्हणून विकला जावा. गोव्यातील काजू हा स्वयंपूर्णतेचे प्रतीक आहे. गोव्याच्या ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. राज्यातील काजू शेतकऱ्यांना, उत्पादकांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार लवकरच कृषी संचालनालय आणि गोवा वनविकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने काजू बोर्डची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केली.
काजू हा गोमंतकीयांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आहे. आमदार डॉ. दिव्या राणे यांनी गोवा वनविकास महामंडळाच्या माध्यमातून अतिशय उत्तम कामगिरी करत आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.
कला अकादमीत आज चर्चासत्रे
गोवा काजू महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध सांगितिक कार्यक्रम, प्रदर्शन होणार आहे. त्यासोबतच सकाळी १० वाजल्यापासून कला अकादमी येथे दोन चर्चासत्रे होणार आहेत. पहिले सत्र ‘काजू बोंडूपासून खाद्यपदार्थ : नवीन पाककृती आणि लोकप्रिय खाद्य संस्कृतीची जपणूक’ आणि दुसरे ‘सेंद्रिय काजू शेती हेच भविष्य आहे का?’ या दोन्ही सत्रांत तज्ज्ञ मान्यवर सहभागी होत मार्गदर्शन करणार आहेत.
प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोवा काजू महोत्सवाच्या चौथ्या पर्वाचे दयानंद बांदोडकर मैदानावर उत्तम आयोजन केले आहे. महोत्सवाचे प्रवेशद्वार अतिशय आकर्षक असून काजू महोत्सवाला साजेशी कलाकृती साकारली आहे. काजूपासून फेणी कशी तयार होते, याची माहिती देणारे प्रात्यक्षिक येथे असून काजू उत्पादने, काजूगर, काजू बोंडूपासून बनविलेली फेणी, हुर्राक व इतर उत्पादने देखील येथे उपलब्ध आहेत. येथे उभारलेल्या स्टॉल्सवर नागरिकांची गर्दी होत आहे.
डीआरएस प्रात्यक्षिकाचे आकर्षण
राज्यातील प्रस्तावित ‘डिपॉझिट रिफंड स्कीमविषयी (डीआरएस) जनतेत निर्माण झालेल्या संभ्रम दूर करण्यासाठी या महोत्सवात गोवा डीआरएस पथकाकडून प्रथमच ‘अनुभव कक्ष’ उभारला आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना या योजनेची माहिती आणि कशा प्रकारे बॉटल, प्लास्टिक मशीनमध्ये टाकल्यावर कशा प्रकारे अतिरिक्त रक्कम परत मिळते, याची प्रत्यक्ष माहिती देत तिचे स्वरूप आणि फायदे स्पष्ट करण्यात येत आहेत. काजू महोत्सवातील अनुभव कक्षामध्ये नागरिकांना ‘रिव्हर्स व्हेंडिंग मशीन’चे थेट प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळत आहे.\
गोव्याच्या ग्रामीण अर्थकारणात काजूचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गोव्याच्या काजूला वेगळी चव आहे; कारण तो सेंद्रियरित्या पिकतो. काजूसाठी केंद्राने यंदा जी योजना आखली आहे, तिचा लाभ गोव्यातील शेतकऱ्यांना कसा करून देता येईल त्यासाठी प्रयत्न करावा.
- सदानंद शेट तानावडे, खासदार.
एकेकाळी काजू फेणीची ‘देशी दारू’ अशी ओळख होती; परंतु आज तिला सन्मान मिळाला आहे. काजूगर, बोंडू आणि फेणीला जीआय टॅग मिळाला आहे. गोव्याच्या नावावर आफ्रिकन काजू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याने आता त्याला आळा बसला आहे. परंतु गोव्यात उत्पादन क्षमता घटली असून ती वाढविण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.
३० हजार कुटुंबे काजूवर अवलंबून : राज्यात नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून काजू उत्पादन आणि लागवड वाढविण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील सुमारे ३० हजारांहून अधिक कुटुंबे काजू शेती, फेणी आणि इतर उत्पादनांशी संबंधित आहेत. त्यांच्या हिताच्या अनुषंगाने सरकार योग्य ती पाऊले उचलत असून येत्या काळात ३५४ हेक्टर क्षेत्रफळातील काजू बागायती पुनरूज्जीवित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
नवकल्पना, शाश्वत विकास आणि कृषी संस्कृतीचा सुंदर मिलाफ या गोवा काजू महोत्सवात दिसून येत आहे. गोव्याच्या अर्थकारणात त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. काजू गोमंतकीयांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असून त्या अनुषंगाने राबविण्यात येणारे उपक्रम स्तुत्य आहेत. - श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.