सासष्टी : दक्षिण गोव्यातील सर्व पंचसदस्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन आज मडगाव रवीन्द्र भवनात झाले. या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, आमदार उल्हास तुयेकर व पंचायत खात्याचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पंच हा गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोेचणारा दुवा आहे. त्यामुळे सर्व सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे तसेच त्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रोत्साहित करणे ही पंचाची जबाबदारी आहे. स्वयंपूर्ण गाव बनविला तर आपोआप स्वयंपूर्ण गोवा मोहीम यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पंचायत राज कायद्याच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक पंचाला स्वत:ची जबाबदारी कळणे महत्त्वाचे आहे. त्याचसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम गिपार्ड (गोवा इन्स्टिट्यूट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एण्ड रुरल डेव्हलपमेंट) मार्फत राबविण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन कमिटी कार्यरत करून प्रत्येक पंचायतीने गावाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच शाश्र्वत विकासाचे ध्येय राखण्यावर पंचांना प्रशिक्षित केले जाईल.
केवळ पंचांसाठीच नव्हे तर सार्वजनिक प्रशासन व ग्रामीण विकास प्रशासनासाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार असून त्याद्वारे सरकारी कर्मचारी, अधिकारी व युवकांना त्याचा लाभ घेता येईल. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असलेल्यांचाच सरकारी नोकरीसाठी विचार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
अमृत सरोवर योजनेअंतर्गत गोव्यातील 150 तळ्यांचा विकास केला जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. याप्रसंगी ‘स्वच्छता ही सेवा’ स्क्रोलरचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
गोव्यातील पंच, सरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारकडे मांडला जाईल, असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी जाहीर केले.
याप्रसंगी गिपार्डचे संचालक मायकल डिसोझा, डॉ. नारायण देसाई, अमित शिरोडकर, राशोलचे सरपंच जोसेफ वाझ, पंचायत सचिव मेनिनो डिसोझा (आयएएस), राज्य आर्थिक आयोगाचे चेअरमन दौलत हवालदार, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा सुवर्णा प्रभू तेंडुलकर यांनीही पंच व सरपंचांना मार्गदर्शन केले. पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर यांनी आभार व्यक्त केले. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.