

साखळी : पर्यटन राज्य म्हणून असलेली गोव्याची प्रतिमा आता आध्यात्मिक, क्रीडा व इतर विविध क्षेत्रांतून पुढे आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने हरवळेतील प्रसिद्ध श्री रुद्रेश्वर मंदिराच्या परिसराचे आधुनिक पद्धतीने सुशोभीकरण व विकास करण्यात येणार आहे. ‘स्वदेश दर्शन’ या योजनेतून १० कोटी रुपये या प्रकल्पासाठी मिळणार असून उर्वरित १० कोटींचा खर्च गोवा सरकार करणार आहे. डिचोलीत यानिमित्त पर्यटन सर्किट उभे राहिल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
हरवळे, साखळी येथील श्री रुद्रेश्वर देवस्थान परिसर व धबधब्याच्या सुशोभीकरण व विकास प्रकल्पाची पायाभरणी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार केदार नाईक, मतेचे आमदार प्रेमेंद्र शेट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, श्री रुद्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर, साखळीचे उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, फोंडाचे माजी नगराध्यक्ष रितेश रवी नाईक, पर्यटन खात्याचे अधिकारी व इतरांची उपस्थिती होती.
देशातील विविध प्रसिद्ध भागांमध्ये गोवेकर आध्यात्मिक पर्यटनाला जातात, त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात पर्यटक हे आध्यात्मिक पर्यटनासाठी श्री रुद्रेश्वर मंदिराच्या परिसरात भविष्यात येणार असून त्याचा मोठा लाभ श्री रूद्रेश्वर देवस्थान व परिसरातील लोकांनाही होणार आहे, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, हरवळेतील या प्रकल्पाबरोबरच नार्वे, डिचोली या गावात पंचगंगा नदीसंगम घाटावर गंगा आरती हा ‘गोमंत सरिता दर्शन’ या योजनेअंतर्गत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प साकारण्यात येत आहे. गोव्यात येणारे पर्यटक हे या पर्यटन स्थळांतून चांगल्या आठवणी सोबत घेऊन जातील. या अपेक्षेने हे प्रकल्प साकारण्यात येत आहेत.
दरम्यान, यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक यांचीही भाषणे झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व इतरांच्या हस्ते या प्रकल्पाची भूमिपूजन करण्यात आले. स्वागत देवस्थान अध्यक्ष यशवंत माडकर यांनी केले. सूत्रसंचालन पर्यटन खात्याचे संचालक दिपक नार्वेकर यांनी तरआभार माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी मानले.
गोव्याची पर्यटन क्षेत्रात होणारी बदनामी थांबवून गोव्याचे नाव पुन्हा सन्मानाने पुढे यावे यासाठी गोव्यात धार्मिक पर्यटनाची नितांत गरज आहे. अशा पर्यटन स्थळांमधून गोव्याची संस्कृती लोकांसमोर आणणे व तिचे दर्शन घडविणे त्यामुळे गोव्यात येणारे पर्यटकही एका मर्यादित स्वरूपात आपला वेळ घालवतात. त्यासाठी हरवळे येथे होणारा तसेच नार्वेतही निर्माण होणारा गंगा आरती घाट अशा प्रकारचे प्रकल्प आवश्यक आहेत, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.