Goa Politics: मुंबईत फडणवीस भेट; खरी कुजबूज

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Devendra Fadnavis and Goa CM Pramod Sawant discussing
Devendra Fadnavis and Goa CM Pramod Sawant discussingDainik Gomantak

मुंबईत फडणवीस भेट

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खरे तर सावंत आणि तानावडे एका कार्यक्रमाला फडणवीस यांच्याबरोबर उपस्थित होते. त्यामुळे या भेटीविषयी गोव्यातील भाजप गोटात अनेक तर्कवितर्क व्यक्त होऊ लागले होते. शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे ज्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. तो कार्यक्रम संपताच त्या ठिकाणाहून मुख्यमंत्री व फडणवीस दोघे बाहेर पडले, ही बाब तेथील पत्रकारांच्या नजरेतून सुटली नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच ठिकाणी होते. त्यामुळे ज्या गाडीतून फडणवीस व सावंत एकत्रित गेले, त्या प्रवासात काय चर्चा झाली असावी याची उत्सुकता काही पत्रकारांना होती. कारण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना उपस्थित मुंबईतील पत्रकार चांगलेच ओळखतात. ∙∙∙

(cm Pramod Sawant and State President Sadanand Tanawade met Devendra Fadnavis in Mumbai)

Devendra Fadnavis and Goa CM Pramod Sawant discussing
Goa Kala Academy: ‘क्लिप दाखवा स्पष्टीकरण देऊ’; मंत्री गोविंद गावडे यांचे स्पष्टीकरण

सत्य स्थितीपासून दूर

सी. टी. रवी हे गोवा भेटीवर एक सामंजस्य दौरा म्हणून आले होते. तीन महिन्यानंतर गोव्याला येऊन येथील ख्याल-खुषाली विचारून घ्यावी, असा काहीसा हा हेतू आहे. गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी उमेदवार जिंकून आणणे हा सध्या पक्षासमोरील एक कलमी कार्यक्रम आहे. दिल्लीचे लक्ष गोव्याकडे आहे याची जाणीव सी. टी. रवी यांना आहे. त्याच दृष्टिकोनातून आमदार, मंत्री आणि सुकाणू समितीच्या सदस्यांशी ते बोलले, परंतु काल आम्ही म्हटल्याप्रमाणे या बैठका अंदाजे ४५ मिनिटे चालल्या. त्यामुळे फारसे काही त्यांना समजून घेता आले नाही. सदस्यांनाही ही एक रुटिन बैठक आहे, असे वाटलेच होते. त्यामुळे कोणी अधिक खोलात जायच्या भानगडीत पडले नाही. सी. टी. रवी यांना मात्र गेल्या तीन महिन्यांत भाजपा पूर्णपणे बदलून तर गेली नाही, असे प्रत्यक्ष भास झाले असावेत. मुख्यमंत्री आत्मविश्‍वासपूर्वक बोलत होते. सुकाणू समितीचे सदस्य अधिकारवाणीने बोलले व काही मंत्र्यांनीही सारे काही आलबेल असल्याचा निर्वाळा दिला. वास्तविक मंत्र्यांमध्ये असलेली अस्वस्थता व तिजोरीतील खडखडाट किती प्रमाणात रवींकडे पोहोचविण्यात हे सर्व सदस्य यशस्वी ठरले, हा एक प्रश्‍नच आहे. त्यामुळे रवींना गोव्याची नाडी कळली, असे म्हणता यायचे नाही. ∙∙∙

रवींनी हात झटकले

भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी आले आणि गेले. ते आल्याने विविध बैठका झाल्या, परंतु घ्यायला पाहिजे म्हणून त्या केवळ औपचारिक स्वरूपाच्या होत्या. त्यातल्या त्यात दिगंबर कामत आणि आलेक्स सिक्वेरा वैयक्तिकरित्या भेटून गेले. आलेक्स सिक्वेरा यांनी त्यांना आपल्याला मंत्रिपदाचे आश्‍वासन देण्यात आले आहे, त्याचे काय झाले अशी विचारणा केली. त्यावर सी. टी. रवी यांनी मला काय माहीत असे सांगून त्यांची बोळवण केली आणि तेही खरेच आहे म्हणे. काँग्रेसमधील आठजणांना प्रवेश देण्याचा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आला. सी. टी. रवी यांना शेवटपर्यंत या मोहिमेचा पत्ता लागला नाही. ते स्वतः घडामोडींची माहिती घेण्यासाठी गोव्यातील नेत्यांना फोन करीत. त्यामुळे यांना पूर्णतः काळोखात ठेवले आहे, याची प्रचिती गोव्यातील नेत्यांना आली. सध्या भाजपचे प्रभारी नावाला आहेत. सारी सूत्रे दिल्लीहून हलविली जात आहेत. ‘मी काही तुला शब्द दिला नव्हता’, असे सांगून शुक्रवारी रवी यांनी आपले हात झटकले. ∙∙∙

कामतसुद्धा भेटले...

दिगंबर कामत हे तसे अनेक पावसाळे पाहिलेले राजकीय नेते आहेत. तेसुद्धा काल भाजपचे प्रभारी सी. टी. रवी यांना भेटले. त्यांनी रवी यांना आपल्या दिल्ली भेटीची थोडक्यात माहिती दिली. आपण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना फार पूर्वीपासून ओळखतो आणि आमचे चांगले सख्य आहे, हे सुद्धा त्यांनी रवी यांच्या मनावर बिंबविले. रवी यांना कामत यांचे राजकारणातील महत्त्व माहीत आहे. त्यामुळे त्यांनी इकडच्या-तिकडच्या गोष्टी केल्या. कामत सध्या भाजपमध्ये शिस्तबद्ध सैनिकासारखे वावरत आहेत. नेत्यांच्या भेटी-गाठी घेणे, गोवाभर फिरून कार्यकर्त्यांना भेटणे एवढेच नव्हे, तर रात्री नऊ वाजता ते ब्रह्मेशानंद स्वामींचे स्वागत करायला दाबोळी विमानतळावर गेले होते. कामत यांना तशी या स्वामींना भेटण्याची गरज नव्हती, परंतु ते सध्या अखिल भारतीय पातळीवरची आपली प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागेपुढे मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल, हा त्यांचा हेतू कळल्याशिवाय राहत नाही. कामत यांना लवकरच मोठी जबाबदारी दिली जाईल, असे त्यांचे कार्यकर्तेही सांगतात. खरे-खोटे दिल्लीला माहीत... ∙∙∙

बाबू पुन्हा जुन्या भूमिकेत

बाबू म्हणजे आमचे बाबू आजगावकर. आमदार होण्यापूर्वी त्यांची ओळख होती ती गांधी मार्केटचे नेते म्हणून. त्यावेळी बाबू महिन्याला एकदा तरी मडगाव पालिकेवर मोर्चा आणायचेच. नंतर बाबू आमदार झाले, मंत्री झाले. बाबूंना गांधी मार्केटमध्ये लक्ष द्यायला नंतर सवड मिळत नव्हती. मात्र, आता तशी स्थिती नाही. आता ते कोणच नसल्याने त्यांच्याकडे वेळच वेळ आहे. म्हणून त्यांनी आता पुन्हा गांधी मार्केटात लक्ष घालायचे ठरविले असावे. मडगाव पालिकेने दुकानदारांना विक्री परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेची सक्ती केली आहे. त्यावर काल पत्रकार परिषद घेऊन बाबूंनी आवाज उठविला. ही पद्धत काही जुन्या दुकानदारांना जाचक ठरत असून ती बदलली नाही, तर मडगाव मार्केट बंद करून व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरविणार असा इशारा त्यांनी दिला आहे. हे ऐकून मडगाव येथील काही ज्येष्ठांना बाबू आता आपल्या बरोबर मार्गावर आले असे वाटल्यास नवल काहीच नाही. बाबूने आता आपल्याच भाजप पक्षाच्या पालिकेवर मोर्चा आणला नाही तर मिळविली, असेही लोक म्हणू लागले आहेत.

चला नोकरीच्या जत्रेला

सरकार कधी आणि कसल्या जत्रा भरविणार याचा नेम नाही. आता बेरोजगार युवकांना खूष करण्यासाठी नोकरीच्या जत्रा आयोजन सुरू केले आहे. किती बेरोजगार युवकांना नोकऱ्या मिळणार देव जाणे. विधानसभा निवडणुकीत पूर्वी तर प्रत्येक मतदारसंघात बेरोजगार युवकांना घेऊन जत्रा भरविल्या, त्या जत्रेला गेलेल्या किती युवकांना नोकऱ्या मिळाल्या त्याची माहिती सरकारने दिल्यास चांगले होईल. आता परत तीच फरफट करण्यासाठी खासगी कंपन्यांना हाताशी धरून बेरोजगार युवकांची जत्रा आयोजित केली जात आहे. सरकारी नोकरीत आपल्या कार्यकर्त्यांना घुसडताना शिक्षण, गुण, वयाच्या कोणत्याही सीमा न पाहता नोकऱ्या दिल्या. आता शिल्लक राहिलेल्यांना खासगी कंपनीत नोकरी देण्यासाठी ही नोकऱ्यांची जत्रा भरविली जात आहे. योग्य आणि गरजूंना या राज्यात फुकट आणि सहज नोकऱ्या मिळणे शक्य नाही. हा केवळ दिखावा करण्यात येत आहे. तसे नसल्यास नोकर भरतीत ढ असलेले सरकारी नोकरीला लागले आणि पात्र असलेले नशिबाला दोष देत बसले नसते. किमान आता तरी पात्र बेरोजगार युवकांना नोकऱ्या मिळतील का?

‘गोमंतकीय दारू पितात, पण झोकांड्या खात नाहीत’

रवी नाईक म्हणजे अफलातून व्यक्तिमत्त्व. कुठल्या प्रश्‍नावर ते गुगली टाकतील सांगता यायचे नाही. मागे एकदा त्यांचे ‘चाय पिया सामोसा खाया’ बरेच गाजले होते. आता हेच पाहा. वाहतूकमंत्री माविन यांनी दारुड्यांना घरी पोचवण्याची जबाबदारी बारवाल्यांची असे जाहीर केल्यावर त्यावर भाष्य करताना रवी नाईक यांनी ‘गोमंतकीय बेवडे नाहीत, ते दारू पितात, पण कधी झोकांड्या खात नाहीत की पडतही नाहीत’, असा दावा केला. हा अफलातून दावा तसा ‘अपील’ होण्यासारखा आहे खरा, पण त्यावर पुढे बोलताना रवी नाईक म्हणाले, की ‘प्रत्येक बेवड्याला गाडीने घरी सोडायचे म्हणजे बारवाल्याचे दिवाळेच निघेल.’ ते पण खरेच की राव..! गोमंतकीयांचे सोडून द्या, पण गोवा म्हटले की कमरेचे सोडून बिनधास्तपणे वावरणाऱ्या पर्यटकांकडून चिक्कार दारू ढोसली जाते, मग अशा बेवड्या पर्यटकांची हॉटेले शोधायची म्हटले तर बारवाल्यांचे खरेच दिवाळे निघायचे. आता रवीबाबांचे हे उत्तर बरोबर आहे. कारण या व्यवसायाचा त्यांना पुरेपूर अनुभव आहे, नाही का? ∙∙∙

Devendra Fadnavis and Goa CM Pramod Sawant discussing
Goa Mining Case: रक्कम वसुलीची याचिका गोवा फाऊंडेशनकडून मागे

आता माविन विरुद्ध रवी

गोविंद गावडे आणि नीलेश काब्राल या मंत्रिद्वयींमधील वाद गाजत असताना आता रवी नाईक आणि माविन गुदिन्हो यांच्यामधले करबल घुमत आहे. एरवी आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदी शैलीमुळे रवी नाईक सर्वदूर प्रसिद्ध आहेत. माविन गुदिन्हो यांनी तर्र झालेल्या दारुड्यांना घरी सोडण्याची जबाबदारी बारमालकांचीच अशा केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत अशा दारुड्याना घरी सोडण्याची जबाबदारी बारमालकांवर आल्यास मालकाचे आणि बारचे दिवाळे निघेल, असे रवी नाईक यांनी म्हटले आहे. बघूया आता हे प्रकरण आणखी किती लांबते ते. एकूणच काय मंत्रिमंडळातील मंत्री एकमेकांविरोधात उभे ठाकत आहेत हे मात्र नक्की. ∙∙∙

मंत्रीच बनले एकमेकांचे विरोधक!

सत्ताधारी जास्त आणि विरोधक कमी झाल्याने राज्यातील आमदार - मंत्र्यांचा समतोल ढासळू लागला आहे. आता तर मंत्रीच एकमेकांविरुद्ध जाहीर कुरापती काढून एकमेकांना दुषणे देऊ लागले आहेत. यासाठीच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जास्त तफावत असू नये. कारण ती असली की सत्ताधारी पक्षातीलच मंत्री - आमदार एकमेकांविरुद्ध आरोप - प्रत्यारोप करून आपले आसन सुरक्षीत ठेवण्यासाठी आपण किती श्रेष्ठ हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता काब्राल आणि गोविंद यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. मात्र, काहीजण आतून सुरुंग पेटवून गोविंदरावांना हटवू पाहात आहेत. उघडपणे बोलणे शक्य नसल्याने कदाचित काब्राल यांना पुढे करून गोविंदरावांना अडचणीत आणू पाहात आहेत. गोविंद गावडेंच्या खात्यावर डोळा ठेवून असलेले हा नाहक खटाटोप करून त्यांना शिंगावर घेण्याचा प्रयत्न करीत असतील तर गोविंद हेसुद्धा त्याच तालमीत तयार झालेले गडी असून हात तरी लावून पाहा असे आता त्यांचे कार्यकर्तेच म्हणू लागले आहेत. ∙∙∙

‘फोगोट’ नको फटाके उडवा

राज्यातील खनिज खाणी सुरू करण्यासंबंधी सरकार अधूनमधून फटाक्यातील एक एक ‘फोगोट’ पेटवतात. आता ही हणजुणेतील ‘ती’ फोगोट नाही, बरं का..! पंधरा दिवसांपूर्वी कामगार नेते पुती गावकर यांनी खाणीसंबंधी राज्य सरकारवर आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केल्यानंतर लगेच खाणींचा लिलाव पंधरा दिवसात होणार, त्यासाठी सर्व काही ठरलं असल्याचे ‘टिपिकल’ उत्तर सरकारकडून आले, पण पुढे काहीच नाही. म्हणजे खाणी नेमक्या कधी सुरू होतील, हे अद्याप कुणालाच माहिती नाही. खाण अवलंबित बिचारे डोळे लावून बसले आहेत, निदान यंदाचा खाण सिझन तरी मिळू दे, अशी त्यांची इच्छा आहे, पण सरकारला कुठे पडलेय त्यांचे. निवडणूक जवळ आली की लागतात आपले ठेवणीतले काढायला. आता हे ‘फोगोट’ पेटवणे बंद करा, खाणी सुरू करून फटाकाच उडवा की, अशी अपेक्षा खाण अवलंबितांकडून व्यक्त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com