Goa Assembly Monsoon Session 2023 : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या आहारावर दरवर्षी सरासरी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात येतात. कारागृहात ड्रग्ज तस्करीप्रकरणी 9 तुरुंगरक्षकांना मुख्य प्रवेशद्वारावर पकडण्यात आले होते.
त्यातील एकजण वगळता इतरांविरोधातील चौकशी सुरू ठेवून त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी दिली. आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
कोलवाळ कारागृहात सध्या एकूण ५८० कैदी आहेत. त्यात ५४८ पुरुष तर ३२ महिला कैद्यांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत विविध कारणांसाठी अर्ज केलेल्या ८८ कैद्यांना पॅरोल व फर्लोगवर सोडण्यात आले आहे.
गोवा तुरुंग नियम २०२१ नुसार कैद्यांच्या वर्तणुकीबाबत कालांतराने आढावा घेण्यात येतो. या आढाव्यानुसार १३२ कैद्यांची वर्तणूक चांगली असल्याचे प्रमाणित करण्यात आलेले आहे. जे कैदी १४ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा भोगत आहेत व ज्यांची कारागृहातील वर्तणूक चांगली आहे, त्यांच्या पूर्वसुटकेसाठी निर्णय घेतला जातो.
गेल्या पाच वर्षात कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या आहारावर दरवर्षी सरासरी खर्च अडीच कोटी एवढा झाला. २०१८-१९ या आर्थिक वर्षात २५५.८९ लाख, २०१९-२० मध्ये १८६.३३ लाख, २०२०-२१ मध्ये १८५.०५ लाख, २०२१-२२ मध्ये २६०.३१ लाख तर २०२२-२३ या वर्षात २४६.०६ लाख रुपये खर्च झाला आहे.
गेल्या पाच वर्षांत ड्रग्ज तसेच तंबाखूजन्य पदार्थांसह 9 तुरुंगरक्षकांना पकडून त्यांना निलंबित करण्यात आले होते. 9 पैकी 8 जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. समीर मोटे या तुरुंगरक्षकाला अजूनही सेवेत घेण्यात आलेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.