सासष्टी: गोव्यात सध्या हवामानात बदल झालेला आहे. सकाळच्यावेळी अधून-मधून दव पसरतो. वातावरण मध्येच थंड तर दुपारच्या वेळी उष्मा वाढलेला जाणवतो. काही दिवसांपूर्वी गोव्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला. त्यामुळे आंबे व काजूचे मोहोर गळुन पडले. त्यामुळे यंदा आंबे, काजुचे पीक समाधानकारक होणार की नाही याबाबत बागायतदारांत साशंकता आहे.
या वर्षी तापमानात वाढ झालेली आहे. सध्या राज्यात तापमान 30 ते 32 अंश सेल्सीयसपर्यंत आहे. पुढील काही दिवसांत ते वाढण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सासष्टी तालुक्यातील कृषी झोनल अधिकारी शरीफ फुर्तादो यांनी सांगितले की, हवामानाचा परिणाम सासष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणार नाही. पिकांचा अंदाज पुढील 15 दिवसांत येणार आहे. असेच वातावरण राहिले तर आंब्याचा मोसम उशीरा सुरू होऊ शकतो, असे फुर्तादो म्हणाले.
आंब्याचा मोसम बहुदा एप्रिल, मे मध्ये तेजीत असतो. काही ठिकाणी आताच आंब्यांच्या झाडाला फळे यायला लागली आहेत. दरम्यान मडगावात कैऱ्या उपलब्ध असल्या तरी 50 रुपयांना बारीक मोठ्या सरसकट 10 नग विकले जातात. काही ठिकाणी आंबे उपलब्ध आहेत. मात्र, दर सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहेत.
आंब्यांचे दर गगनाला
गावठी मानकुराद आंब्यांचे दर डझनाला 3600 रुपये असे आहेत. हापूस आंबे डझनाला 1500 रुपये तर पायरी आंबे प्रति डझन 1200 रुपये प्रमाणे विकले जातात. बाजारात मुबलक प्रमाणात आंबे उपलब्ध नाहीत. शिवाय भाटकारांकडील आंब्यांच्या झाडांचेही दर वाढलेले आहेत. आंबे काढण्यासाठी लागणाऱ्यांचा दिसवडा दरही वाढलेला आहे. त्यामुळे सध्या दर महागच आहे. यंदा आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात होणार असून, मे महिन्यामध्ये आंब्याचे दर कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.