पिसुर्ले: राज्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे (Heavy Rain) दि 23 रोजी पहाटे म्हादई नदीच्या (Mhadei River) पात्रात पाण्याची वाढ झाल्याने (Goa Flood) या परीसरात असलेल्या सावर्शे, म्हादई, पाडेली, वांते बोनकवली वाडा, तसेच भटवाडी अडवई येथिल नागरिकांच्या घरांना साखर झोपेत असताना फटका बसला, त्यामुळे येथील सुमारे 49 घरात पाणी शिरून त्यातील बरीचशी घरें एका क्षणात जमनी सफाट झाली व उभे आयुष्य खर्चून कुटुंबाच्या निवाऱ्यासाठी निर्माण केलेले छत डोळ्यासमोर कोसळत असलेले पहाण्या वाचून कोणताच पर्याय त्यांच्याकडे नव्हता, सद्या उद्धवस्त झालेले संसार उभे करावे कसे या यक्षप्रश्न पुरग्रस्ता समोर आवासून उभा राहिला आहे, निवाऱ्यासाठी डोक्यावर छत नाही, अन्न शिजवायला चुल नाही तर शेजारी नातेवाईकांनी दिलेल्या आधारावर किती दिवस काढायचे अशा असंख्य समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या भिरोंडा पंचायत क्षेत्रातील पुरग्रस्त बांधवांना गरज आहे ती माणुसकीच्या आधाराची व उद्धवस्त झालेले संसार उभे करण्याची. (Citizens have to suffer due to floods in Goa)
या भागात चार पाच वाडे मिळून 49 घरांना पाण्याचा तडका बसला आहे, त्यामधील काही घरे जमीनदोस्त झाली असून काही घरांना पाण्याच्या धक्क्याने तडे जाऊन असुरक्षित बनलेली आहेत, त्यामुळे बऱ्याच कुटुंबांना गुरांच्या गोठ्यात किंवा नातेवाईक तसेच शेजारच्या घरात आसरा घेण्याची पाळी आली आहे, परंतू अशा प्रकारे किती दिवस काढायचे असे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यात बऱ्याच घरा मध्ये जेष्ठ पुरूष व महिला, लहान मुले असा परिवार आहे, त्यांना दुसऱ्याच्या घरी निवारा घेऊन दिनक्रम कसा सुरु करायचा या विवंचनेतून सद्या या परीसरातील पुरग्रस्त बांधव जात आहे. या पैकी काही जणांनी आपल्या घराजवळ असलेल्या गुरांसाठी तयार केलेल्या गोठ्यात आसरा घेतला आहे, पण त्याठिकाणी मनुष्य जीवनासाठी आवश्यक असलेली व्यवस्था नसल्याने गुजरणा कशी करावी हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या भागात तब्बल तीन दिवसांनी शासकीय पातळीवरून आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून आज तांदूळ, दाळ व इतर प्रकारचे काही जिन्नस पुरग्रस्ताना वितरीत केले आहेत, परंतू डोक्यावर निवाराच नसल्याने हे शिजवून खायचे कसे ही समस्या त्यांच्या समोर निर्माण झाली आहे, गेल्या तीन दिवसांपासून सकाळ, दुपारी व रात्री शेजारी व नातेवाईकांनी दिलेल्या आधारावर दिवस काढले.
या भागातील पुरग्रस्त कुटुंबांच्या नुकसानी संबंधीचे सर्वेक्षण सत्तरी तालुका आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काल दि 23 रोजी पुर्ण झाले, नुकसानीचा नक्की आकडा समजू शकला नसला तरी एकमेव भिंरोडा पंचायत क्षेत्रात सुमारे दोन ते तीन कोटी रुपयांची नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे, यात नागरिकांची बागायती, भिंरोडा येथिल एका शेतकऱ्याच्या दुभत्या गायी, मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेली वाहने, जमीनदोस्त झालेली घरे, घरातील किंमती वस्तू, इतर साहित्याचा समावेश आहे.
सदर घटना शुक्रवारी पहाटे घडल्या नंतर भिरोंडा पंचायतीच्या वतीने संध्याकाळी पुरग्रस्त कुटुंबांना काही प्रमाणात फराळ, तर काही जणांना जेवणाची पाकिटे (पार्सल जेवण) तसेच धान्याचे वाटप केले असल्याचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच उदयसिंह राणे यांनी सांगितले.
मात्र सदर घटना शुक्रवारी पहाटे घडून सुद्धा सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना ज्या सुविधा पोचायला हव्या होत्या त्या पोचल्या नाही, तर आज तीन दिवसांनंतर कडधान्यांचे वाटप करण्यात आले आहे अशी माहिती पुरग्रस्तांनी दिली. त्यामुळे मायबाप सरकारच्या आशेवर राहणाऱ्या नागरिकांना आपत्कालीन काळात सुद्धा अशा स्वरूपाची वागणूक मिळते यावरून नागरिकांनी संकटाच्या काळात कोणाच्या तोंडाकडे बघावे असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
त्याच प्रमाणे तीन दिवसांपूर्वी आलेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी वाळपई अग्निशमन दल किंवा सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणे कडे नागरिकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी कोणतीच साधन सुविधा नसल्याने, पाण्याच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना कसे बसे बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे निदान यापुढील काळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सरकारने महत्वाच्या अशा अग्निशमन दलाकडे योग्य पद्धतींची साधनं सामुग्री उपलब्ध करावी, त्याचं प्रमाणे तालुका पातळीवर असलेला आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष 365 दिवस व 24 सुरूच ठेवावा अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान आज सकाळी नगरगाव जिल्हा पंचायत सदस्या राजेश्री काळे हिने भिरोंडा पंचायत क्षेत्राचा दौरा करून नागरिकांवर ओढवलेल्या परिस्थितीची पाहणी केली.
महत्त्वाचे
1. घरे पडलेल्या कुटुंबातील ज्येष्ठ महिला, पुरूष व लहान मुलांना जास्त समस्या
2. पुरग्रस्ताच्या पुनवर्सनासठी जलद कृतीची गरज
3. तडे गेलेल्या घरातील नागरिकांना जाणवते असुरक्षा
4. आपत्कालीन व्यवस्थापन समितीत पंचायत पातळीवरील नागरिकांचा विचार व्हावा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.