Goa Politics: खरी कुजबुज: चर्चिलची ‘बीफ मध्‍यस्‍थी’

Khari Kujbuj Political Satire: नुकत्याच एका प्रसंगात अाल्तिनो येथून पणजीत येणाऱ्या एका बसमध्ये चढण्यासाठी अनेक प्रवासी थांबलेले होते. एवढे प्रवासी ताटकळत असूनही केवळ त्यांच्याकडे ‘स्मार्ट कार्ड’ नाही, असे सांगून त्यांना बसमध्ये चालकाने चढू दिले नाही.
Khari Kujbuj
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

चर्चिलची ‘बीफ मध्‍यस्‍थी’

गोव्‍यात बाहेरून बीफ आणले जाते, म्‍हणून त्‍या विरोधात गोरक्षकांनी मोहीम उघडल्‍यावर गोव्‍यातील बीफ विक्रेत्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे ऐन ख्रिसमस सणावेळी राज्‍यात बीफचा तुटवडा भासला होता. त्‍यानंतर २५ डिसेंबरला ही विक्री सुरू झाली. त्‍यामागे चर्चिल आलेमाव यांचे प्रयत्‍न बरेच होते. चर्चिल आलेमाव यांनी थेट मुख्‍यमंत्र्यांना फोन करुन बीफ विक्रेत्‍यांना संरक्षण द्या, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर मुख्‍यमंत्र्यांनीही त्‍यांची ही मागणी मान्‍य केली. गोव्‍यात बीफ हा एका समाजाच्‍या जेवणातील मुख्‍य भाग असल्‍याने त्‍यापासून त्‍यांना तुम्‍ही दूर ठेवू शकत नाही, असे आलेमाव यांनी मुख्‍यमंत्र्यांना सुनावल्‍यावर त्‍यांनीही तुम्‍ही काही काळजी करू नका, बीफ विक्रीच्‍या आड कुणी येणार नाही, असे आश्‍वासन त्‍यांना देऊन टाकले. ∙∙∙

स्मार्ट ‘कदंब’ची अनागोंदी!

आधीच कदंब महामंडळ तोट्यात आहे, ते फायद्यात यावे यासाठी सरकारने मदत करावी, अशी ओरड करायची. विनावाहक असलेल्या ‘स्मार्ट बस’ अन् आलेले प्रवासी केवळ ‘स्मार्ट कार्ड’ नसल्याच्या सबबीखाली परतवून लावायचे, हा काय प्रकार, अशी विचारणा ‘कदंब’ प्रेमी प्रवाशीच करू लागलेत. नुकत्याच एका प्रसंगात अाल्तिनो येथून पणजीत येणाऱ्या एका बसमध्ये चढण्यासाठी अनेक प्रवासी थांबलेले होते. एवढे प्रवासी ताटकळत असूनही केवळ त्यांच्याकडे ‘स्मार्ट कार्ड’ नाही, असे सांगून त्यांना बसमध्ये चालकाने चढू दिले नाही. शेवटी केवळ एकच प्रवाशासह ही बस निघाली. ‘स्मार्ट कार्ड’ नसेल तर रोख तिकीटानेही प्रवासी घ्यायला हवेत ना?, ‘कदंब’ने व्यवसायवाढीचा स्मार्टनेस दाखवलाच नाही, तर फायदा कसा होणार अन् तोट्यातले महामंडळ फायद्यात येणार तरी कसे? ∙∙∙

आता लोबो काय बोलणार?

कलंगुट दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. गुरुवारी स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी पर्यटन, बंदर कप्तान तसेच पोलिसांसोबत बोट मालकांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी घडलेल्या घटनेबाबत चिंता तसेच जलसफरवेळी सुरक्षतेच्या अनुषंगाने झालेल्या हलगर्जीपणाबाबत त्यांनी संपात व्यक्त केला. मात्र हा संताप दुर्घटनेनंतर का? लोबो एरवी प्रचंड ॲक्टिव असतात, मग आपल्याच मतदारसंघातील किनाऱ्यावर होणाऱ्या उल्लंघनचा त्यांना थांगपत्ता नव्हता का? हा प्रश्न पडतो. तसेच लोबोंनी बेकायदा दलाल यांचा विषय पुन्हा काढला. हा विषय काही आजचा नाही. लोबो जे एरवी दुसऱ्यांच्या मतदारसंघात घडणाऱ्या गोष्टींबाबत बोलणारे स्वतःच्या मतदारसंघातील अनधिकृत बाबत नियंत्रण मिळवू शकले नाही? असे लोकांनी म्हणावे का? ∙∙∙

बोटीत २० सीट आल्याच कशा?

कळंगुट येथे जलक्रीडा बोट उलटून झालेल्या अपघातामध्ये खेड येथील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. इतरही पर्यटक या घटनेत जखमी झाले. मात्र, यामुळे जलक्रीडा व्यावसायिकांच्या दक्षतेवर प्रश्‍नचिन्ह उभे झालेय, सध्या सोशल मीडियात पोस्ट फिरत असून बोटीची क्षमता १० + १ अशी असूनही त्यात २० प्रवासी होते. मुख्य म्हणजे सर्वांसाठी बसण्यासाठी व्यवस्था होती. आता ११ क्षमतेच्या बोटीत २० सीट कशा आल्या. जलक्रीडा बोटीची तपासणी बंदर कप्तान खात्याने केली नव्हती का?, अशी लोक विचारणा करताहेत. ∙∙∙

सरकारने जेट खरेदी केले तर!

राज्यातील मंत्र्यांचे दिल्लीला होणारे दौरे आणि त्यावर होणारा आर्थिक खर्च पाहता सरकारच्या मालकीचे एखादे जेट विमान असावे असे वाटते. काही दिवसांपूर्वी जेटद्वारे राज्यातील आमदार जयपूरला गेल्याचे छायाचित्र समाज माध्यमांत व्हायरल झाले. त्यावर विरोधी पक्षातर्फे जोरदार टीका झाली आणि आजही त्यावर टीका होत आहे. परंतु तसे पाहिले तर वर्षाला मंत्र्यांचे दिल्ली किंवा इतर शहरांचे दौरे भरपूर होत आहेत. त्यांच्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केला जातो. तो खर्च पाहिला तर दोन आकडी कोट्यवधी रुपयांमध्ये नक्कीच आहे. काही नेटकऱ्यांनी अशा मंत्र्यांच्या दौऱ्यावर खोचक टीका केली आहे. त्यात सरकारने आता स्वमालकीचे जेट विमान खरेदी केल्यास कधीही आणि केव्हाही मंत्र्यांना विविध ठिकाणी किंवा दिल्लीश्वरांच्या दर्शनासाठी जाता येईल नाही काय? ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: ..'मंत्रिमंडळ फेरबदल' आताच होणार असे नाही! तानावडेंच्या प्रतिक्रीयेमुळे चर्चांना पूर्णविराम

कला अकादमीची दुचाकी लंपास

आदिलशाह पॅलेस (जुने सचिवालय) समोर गोवा कला अकादमीची दुचाकी उभी केली होती म्हणे. ती दुचाकीच अज्ञाताने पळवली. आधीच कला अकादमीचे नाव विविध कारणांनी चर्चेत नेहमीच असते. गेल्या वर्षी छत कोसळल्याने कला अकादमीची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. नंतर छताला गळती लागल्याचे व्हीडिओ पावसाळ्यात व्हायरल झाल्यानेही कला अकादमीवर चर्चा झडली होती. त्यात आता या दुचाकी चोरीमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. दुचाकी चोरीला गेल्या संबंधीची तक्रार कला अकादमीचे सदस्य सचिव अरविंद खुटकर यांनी पणजी पोलिस स्थानकात दिलीय. ही दुचाकी २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबरच्या दरम्यान गायब झाली,असं तक्रारीत त्यांनी म्हटलंय. अकादमीचे कारभारी कुठं कुठं लक्ष ठेवतील? ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics Flashback 2024: विरोधक हतबल; मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित हाताळले नोकरी घोटाळा प्रकरण

चौकशी होणार?

कळंगुटमध्ये जलसफर करणारी पर्यटक बोट उलटल्याने एका पर्यटकाला जीव गमावावा लागला. ही बोट प्रमाणाहून अधिक प्रवाशांनी भरलेली अर्थात ‘ओव्हर क्राऊड’ होती, असे समजते. मात्र बोट मालकाच्या मते यात फक्त दहाच प्रवासी होते. अशावेळी प्रशासन या प्रकरणाची सखोल कारवाई करणार का? हा मोठा प्रश्न! अलीकडे मुंबईमध्ये अशीच बोट दुर्घटना घडली होती. त्यामुळे प्रश्न पडतो की, जलसफरीच्या नावाने चालणाऱ्या अनागोंदी कारभाराला चाप बसणार का? तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? अलीकडे दुर्घटना घडल्यानंतर दोन दिवस चर्चा होते अन् नंतर सगळेजण विसरून जातात. ही बोट क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन समुद्रात उतरली होती. मात्र, घटनास्थळी काहीजण ही बाब दाबण्याचा प्रयत्न करताना दिसले. यात एका टीव्ही माध्यमाचा प्रतिनिधीही होता. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com