

पणजी: ग्रामस्थांना विचार न घेता गावावर सरकारने लादलेल्या युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभाविरोधी लढ्याला ४४ व्या दिवशी यश आल्यानंतर आझाद मैदानात उपोषणकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शिवाय पारंपरिक आदिवासी लोकनृत्य करीत उपोषणकर्त्यांनी या आनंदोत्सवात आणखी भर घालत वातावरण उत्सवी करून टाकले.
या आनंदोत्सवाला एक किनार होती, ती किनार म्हणजे उपोषणाची आणि एकजुटीने दिलेल्या लढ्याची. आनंदोत्सवावर मागे वळून पाहताना या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे किंवा त्या समजून घेणे तरी गरजेचे आहे. सरकारने सोमवारी दोन्ही प्रकल्प चिंबल येथून रद्द करून ते इतरत्र स्थलांतरित केले जाणार असल्याची पत्रे सायंकाळी दिल्यानंतर उपोषणकर्त्या लोकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याच्या दिसल्या.
उपोषणकर्त्यांचे नेते गोविंद शिरोडकर या आंदोलनाला आलेल्या यशाविषयी सर्वांचे आभार मानत होते, तेव्हा त्यांचे मन भरून आल्याचे जाणवत होते. त्यांना काय बोलायचे याचे शब्दही आठवत नव्हते. विशेष बाब म्हणजे युवा नेते अजय खोलकर यांनी उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. चाळीसपेक्षा जास्त दिवस दररोज उपोषण करायचे आणि सायंकाळी अल्पोपाहार करून उपोषण सोडविण्याचा शिरस्ता राहिला.
या आंदोलनाच्या दरम्यान चार महिला आणि खोलकर यांच्यासह एका ज्येष्ठ नागरिकाला येथील दररोजच्या उष्माचा, वातावरणाचा आणि धुळीचा त्रास झाला, आरोग्यावर परिणाम झाला तरीही त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे सोडले नाही. काही दिवसांपूर्वी आंदोलनात बदल करण्यात आला होता, त्यात एका एका गटाने आंदोलनात सहभागी व्यायचे असा निर्णय घेण्यात आला होता.
तर दुसरीकडे चिंबल जैवविविध समितीचे गोविंद शिरोडकर हे आंदोलनाचे नेतृत्व करतानाही सरकारी पातळीवर लढा देत होते. त्यांना मदत मिळाली ती ॲड. नॉर्मा अल्वारिस, क्लॉड अल्वारिस, ॲड. मेलिसा सिमोईस, ॲड. ओम डिकॉस्ता, स्वप्नेश शेर्लेकर यांनी आवश्यक ते मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांनी सरकारी पातळीवर मांडलेल्या भूमिकेची सरकारला दखल घ्यावी लागली.
आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी जसा ‘आप''चा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर त्यांनी चिंबल ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या ठिकाणी बसणे, सरकारी खात्यांकडून व्यवसायिकांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात निवेदने देण्याचे कार्य केले. परंतु आज सायंकाळी चिंबल ग्रामस्थांना दोन्ही प्रकल्प स्थलांतर करण्याचे पत्र मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांनी आझाद मैदानावरील ग्रामस्थांना पेढ्याचे वाटप केले. तसेच आंदोलनकर्त्यांनी एकमेकांना केक भरवित आनंदोत्सव साजरा करीत लोकगीतावर फेर धरत नृत्य सादर केले.
आझाद मैदानात आनंदोत्सव साजरा केल्यानंतर चिंबलच्या ग्रामस्थांनी श्रीनेत चिंबल वाड्यावरील श्री सातेरी आणि श्रीराम मंदिरात जाऊन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मंदिरात विविध गीतांचे गायन करीत महिला वर्गाने देवतांची पूजा केली. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
ग्रामस्थांनी तोयार तलावाच्या प्रभाव क्षेत्राच्या सर्वेक्षणाची केलेली मागणी सरकारने मान्य केली होती. त्यानुसार जीटीडीसीचे सल्लागार प्रमोद बदामी यांच्या नेतृत्वाखाली तोयार तलावाच्या प्रभाव क्षेत्राचे सर्वेक्षण केले. त्यावर जो अहवाल तयार केला गेला त्यावर मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. प्रभावक्षेत्राचे दोन भाग पाडल्याने चिंबल जैवविविध समितीचे शिरोडकर यांनी तीव्र आक्षेप नोंदविला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.