Chimbel: चिंबलवासीय जिंकले! 44 दिवसांचा लढा यशस्वी; पर्यटन महामंडळ, प्रशासन विभागाकडून उपोषणकर्त्यांना पत्र

Chimbel Protest: चिंबलमधील प्रस्तावित युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ हे वादग्रस्‍त प्रकल्‍प रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या स्‍थानिकांच्‍या आंदोलनाला अखेर ४४ व्या दिवशी यश मिळाले.
Chimbel News
Chimbel NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चिंबलमधील प्रस्तावित युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ हे वादग्रस्‍त प्रकल्‍प रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या स्‍थानिकांच्‍या आंदोलनाला अखेर ४४ व्या दिवशी यश मिळाले. गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळाने युनिटी मॉल तर राज्य प्रशासन विभागाने प्रशासन स्तंभ स्थलांतरित केले जातील अशी लेखी हमीपत्रे सोमवारी सायंकाळी उपोषणकर्त्यांना दिली.

पत्रे मिळताच आझाद मैदानावर जमलेल्या चिंबलच्या ग्रामस्थांनी हा विजय ग्रामस्थांच्या एकजुटीचा व आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक घटकाचा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पेढे व गोड पदार्थांचे वाटप करून विजयोत्‍सव साजरा करण्यात आला.

सरकारला दिलेली मुदत शनिवारी संपल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आझाद मैदानावर धाव घेतली होती. सकाळी सरकारला एक दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

सायंकाळी तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी भिकू गावस हे स्वतः दोन्ही विभागांची अधिकृत पत्रे घेऊन आझाद मैदानावर पोहोचले. ही पत्रे आंदोलकांचे नेते गोविंद शिरोडकर व ॲड. सिमॉईस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

पत्रांची खात्री केल्यानंतर गोविंद शिरोडकर यांनी ‘आतापर्यंत दिलेला लढा यशस्वी ठरला आहे’ अशी घोषणा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ॲड. नॉर्मा आल्‍वारीस, डॉ. क्लॉड आल्‍वारीस, ॲड. मेलिसा सिमॉईस, ॲड. ओम डिकॉस्‍टा, स्वप्नेश शेर्लेकर, प्रवीण शेटगावकर यांच्‍यासह आंदोलनाला पाठिंबा देणारी प्रसारमाध्यमे, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कायदेशीर सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

मुख्यमंत्री सावंत यांनी आझाद मैदानातील मागणीची तातडीने दखल घेत दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे निर्देश दिले. फक्त दहा मिनिटांत पत्रांचा प्रश्न मार्गी लागला, असे शिरोडकर यांनी सांगितले. आता गाव व तोयार तलावाच्या संरक्षणाची जबाबदारी अधिक वाढली आहे. युनिटी मॉलसाठी केलेली जागा पूर्ववत करून घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलकांचे नेते अजय खोलकर यांनी दोन्ही विभागांची पत्रे उपस्थितांसमोर वाचून दाखवली. ॲड. सिमॉईस यांनी हा क्षण ऐतिहासिक असल्याचे सांगत चिंबलच्या आदिवासी समाजाने दिलेला हा लढा संपूर्ण गोव्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे नमूद केले.

आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये

  ४४ दिवस सलग उपोषण व आंदोलन

  ग्रामस्थ, महिला, युवकांचा सहभाग

  कायदेशीर, सनदशीर मार्गाचा अवलंब

  सरकारकडून अखेर लेखी हमीपत्रे

हा संपूर्ण गोव्याचा विजय : ॲड. नॉर्मा आल्‍वारीस

चिंबलकरांचा हा लढा अतिशय अवघड होता. सरकारला वाटत होते की प्रकल्प लादता येईल; मात्र ग्रामस्थांनी एकजुटीने, सनदशीर मार्गाने न्यायालयात व प्रशासनाकडे ठाम भूमिका मांडली. विधानसभा अधिवेशनादरम्यान महिलांना रस्त्यावर यावे लागले. तेव्हा मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री आश्वासन द्यावे लागले. हा विजय संपूर्ण गोव्याचा आहे. ग्रामस्थांची संमती नसताना प्रकल्प लादता येत नाही, हे यातून सिद्ध झाले आहे. तोयार तलाव हा गावाची जीवनदायिनी असल्याचे चिंबलवासीयांनी दाखवून दिले, असे सामाजिक कार्यकर्त्या ॲड. नॉर्मा आल्‍वारीस यांनी सांगितले.

Chimbel News
Chimbel: चिंबलवासीयांनी सरकारला दिलेली मुदत संपली! आंदोलनाची दिशा ठरणार; ग्रामस्थ घेणार मुख्य सचिवांची भेट

तोपर्यंत एक कोटी परत देऊ नका : क्लॉड आल्‍वारीस

युनिटी मॉलसाठी झाडांची कत्तल करण्‍यात आली. जेसीबीद्वारे खोदकाम करण्‍यात आले. त्‍यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी झाली. आता पर्यटन खात्याने ही जागा पूर्णपणे पूर्ववत करेपर्यंत ग्रामपंचायतीत ठेवण्‍यात आलेले एक कोटी रुपयांचे शुल्क परत देऊ नये. ही रक्कम हमी म्हणून ठेवावी, जशी बँका कर्ज देताना हमी घेतात तशी. ‘तुम्ही माझे हिरो आहात’ असे म्हणत सामाजिक कार्यकर्ते डॉ. क्लॉड आल्‍वारीस यांनी आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच हा एकजुटीचा विजय असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

Chimbel News
Chimbel: चिंबलवासीय पुन्हा नाराज! तोयार तलाव सर्वेक्षणावर आक्षेप; NIO चे जलशास्त्रज्ञ महत्वाच्या बैठकीस अनुपस्थित

पुढील लढ्याचा टप्पा

१.युनिटी मॉलसाठी वापरलेली जागा पूर्ववत करणे

२.तोयार तलावाच्या प्रभाव क्षेत्राचे संरक्षण करणे

३.भविष्यात ग्रामसभेच्या संमतीशिवाय प्रकल्प नको

४. विकासास विरोध नाही, पण लोकविरोधी विकास नक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com