Chimbel Protest: चिंबलमध्ये राग, आक्रोश अन् बघ्यांची उत्‍कंठा! पुरुषांसह महिला, मुलेही उपोषणाला; युनिटी मॉलला तीव्र विरोध

Chimbel Unity Mall Goa: विशेष बाब म्हणजे उपोषणास बसलेल्यांपैकी काही युवकांकडून कडक उपोषण केले जात आहे. त्यामुळे त्यांना अधून-मधून थोडासा आराम करावा लागत आहे.
Chimbel Unity Mall Goa
Chimbel Unity Mall GoaDainik Gomatnak
Published on
Updated on

पणजी: तोयार तळे व डोंगरावरील जैवविविधता वाचवण्याचा दावा करत, प्रस्तावित प्रशासन स्तंभ आणि युनिटी मॉलविरोधात चिंबल ग्रामस्थांनी सुरू केलेल्या उपोषणाला शुक्रवारी (ता.२) दिवसभरात विविध संघटना, विविध गावचे ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि नेतेमंडळींनी येऊन पाठिंबा दिला. युनिटी मॉलचे ज्या चिंबल डोंगरावर काम सुरू आहे, त्या कामाच्या प्रवेशद्वारासमोर काही अंतरावर महामार्गालगत ग्रामस्थांनी मंडप घालून उपोषण सुरू केले आहे.

विशेष बाब म्हणजे आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांना घरी कोणी नसल्यामुळे लहानग्या मुलांनाही आंदोलनस्थळी आणावे लागले आहे.

महामार्गाच्या बायपास रस्त्यालगत उपोषणास बसण्यास घातलेल्या मंडपात महिला वर्ग, पुरुष वर्ग आणि ज्यांना जमिनीवर बसता येत नाही, अशा लोकांसाठी ठेवलेल्या खुर्च्या, ठिकठिकाणी मागण्यांचे फलक अडकवलेले,

त्यात तोयार तलावाचे छायाचित्र व प्रस्तावित इमारतींची छायाचित्रे असलेले फलक, याशिवाय लोकांची गर्दी पाहून महामार्गावरून ये-जा करणारे लोक थांबून तेथे काय चालले आहे ते पाहत होते. महामार्गाच्या बाजूला सुरक्षेसाठी लावलेल्या खांबांवर आंदोलनाचे फलक लावल्याने तिथे आंदोलनस्थळ असल्याचे दिसत होते.

विशेष बाब म्हणजे उपोषणास बसलेल्यांपैकी काही युवकांकडून कडक उपोषण केले जात आहे. त्यामुळे त्यांना अधून-मधून थोडासा आराम करावा लागत आहे.

याशिवाय गेल्या पाच दिवसांपासून आंदोलनात सहभागी होणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ॲना ग्रासियस यांचा वावर पूर्वीसारखाच आक्रमक दिसून येतो. काही आंदोलक पारंपरिक आदिवासी समाजाचा पेहराव करून उपोषणास बसले आहेत.

दरम्यान, या आंदोलनाला राज्यातील सर्वपक्षीय विरोधकांसह आम आदमी पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला आहे. ‘आप’चे आमदार क्रुझ सिल्वा व नेते अ‍ॅड. अमित पालेकर यांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यापूर्वी मॉलविरोधात उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांना ‘आप’चा पाठिंबा जाहीर केला होता.

करमळी ग्रामस्थांचा पाठिंबा

१.आंदोलनाचा शुक्रवारी सहावा दिवस... सकाळी टॅक्सी संघटनेचे नेते योगेश नाईक, सुनील नाईक, पत्रकार किशोर नाईक, हणजूणचे काँग्रेस नेते गजानन तिळवे यांनी इतर टॅक्सी मालकांसह येऊन तसेच सायंकाळी खासदार विरियातो फर्नांडिस व आमदार क्रूझ सिल्वा यांनी या उपोषणास पाठिंबा दिला.

२.करमळीचे ग्रामस्थ म्हणून सुनील नाईक यांनी सांगितले की, चिंबल आणि करमळी गावचे सख्य आहे. आमच्या गावच्या मुली चिंबलमध्ये सुना झाल्या आहेत आणि चिंबलच्या काही मुली आमच्या गावात सुना झाल्या आहेत. करमळी ग्रामस्थांच्यावतीने आम्ही या उपोषणाला पाठिंबा देत आहोत.

३.करमळीत सुमारे ८४ सदनिकांची इमारत उभारली जाणार आहे, त्यास येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आम्ही करीत असलेल्या आंदोलनासही चिंबलवासीयांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करीत येत्या ४ तारखेच्या सभेला करमळीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

४.या प्रकल्पामुळे केवळ उपोषणास बसलेल्यांनाच नाही, तर सर्व ग्रामस्थांना फटका बसणार आहे. त्यामुळे त्याचा त्यांनी विचार करावा. येत्या ४ रोजी येथे होणाऱ्या जाहीर सभेस सर्व विरोधी राजकीय पक्षातील नेत्यांनी उपस्थित राहून चिंबलच्या ग्रामस्थांचे मनोबल वाढवावे, असे तिळवे यांनी नमूद केले.

सुरक्षेच्या आड काम सुरू

युनिटी मॉलच्या प्रस्तावित जागेवर काम सुरू झाले आहे. जेसीबी, मिक्सर व इतर वाहने संरक्षणासाठी उभारलेल्या लोखंडी पत्र्याच्या आतमध्ये ये-जा करीत आहेत.

विशेष बाब म्हणजे आंदोलनस्थळावरील प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराबाहेर केवळ तीनच पोलिस दिसून आले. तर उपोषणकर्त्यांची संख्या दररोज पन्नासाच्यावर असते. आंदोलन शांततेत सुरू असल्याने पोलिसांना धावपळ करावी लागत नाही. विशेष बाब म्हणजे शांततामय वातावरणात आणि कोणताही गोंगाट नसलेल्या ठिकाणी उपोषण सुरू आहे.

Chimbel Unity Mall Goa
Unity Mall Goa: युनिटी मॉलच्या कामाला ब्रेक; न्यायालयाकडून 'जैसे थे' स्थितीचे आदेश

रविवारच्या सभेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने चिंबल गावच्या हद्दीतील प्रस्तावित युनिटी मॉलचे बांधकाम गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) ८ जानेवारीपर्यंत स्थगित ठेवावे, असे सांगितले होते. तरीही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ‘जीटीडीसी’ने काम सुरू केले होते. त्यासाठी पुन्हा आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली व न्यायालयाने पुन्हा सरकारचे कान टोचले. ८ जानेवारीपर्यंत पुन्हा काम स्थगित केले आहे. या प्रकल्पाविरोधात रविवार, ४ रोजी आयोजित केलेली सभा होईल. त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन गोविंद शिरोडकर यांनी कले.

Chimbel Unity Mall Goa
Chimbel Unity Mall: चिंबल युनिटी मॉलसंदर्भात गोंधळ! सरकारी पक्षाने याचिकाकर्त्यांना पकडले पेचात; बांधकाम स्थगितीवर २ जानेवारीस निकाल

शेतात राबणारे हात उपोषणस्थळी!

तोयार तळ्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यावर शेती करणाऱ्या कुंकळकर कुटुंबातील महिला मोहिनी सांगतात की, तळ्याच्या पाण्यावर विविध भाजीपाला पिकवतो. तळ्याच्या वरील बाजूला हा प्रकल्प झाल्यास येथील सांडपाणी, कचरा तळ्यातील पाण्यात मिसळण्याची भीती आहे. त्याशिवाय या परिसरातील झाडांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. हा प्रकल्प झाल्यास आमच्या भावी पिढीला शेती करता येणार नाही. सांताक्रूझ सोडून इतर ३९ मतदारसंघ आहेत, त्याठिकाणी हा प्रकल्प भाजप सरकार का नेत नाही, असा सवाल उपोषणास बसलेल्या स्मिता यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com