
पणजी: पर्यटन विभागाच्या पुढाकाराने ५ ते ७ जुलै या काळात माशेल येथील श्री देवकीकृष्ण मंदिराच्या आवारात गोव्याच्या एकात्मतेचा, भक्तीचा आणि सांस्कृतिक वैभवाचा ‘चिखलकाला’ हा पारंपरिक उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. या लोकोत्सवाला यंदा केवळ गोव्यातूनच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटकांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
याबाबत पर्यटन संचालक केदार नाईक यांनी म्हटले आहे की, ‘गोवा बियॉण्ड बीचेस’ या उपक्रमाअंतर्गत आम्ही चिखलकाला यासारख्या आध्यात्मिक आणि ग्रामीण वारशाचा प्रचार करत आहोत. या उत्सवाच्या माध्यमातून गोव्याचा अस्सल अनुभव जगभर पोहोचवत आहोत.
दरम्यान, या उत्सवाचा शिखर बिंदू म्हणजेच ‘चिखलकाला’ होणार आहे ७ जुलै रोजी. यात तरुण-प्रौढ मिळून चिखलात खेळतात, कुस्ती करतात, चेंडूफळी खेळतात. गोव्यातील पारंपरिक वाद्य घुमट, शामेळच्या गजरात वातावरण भारले जाते.
एकादशीच्या पवित्र दिवशी ६ जुलैला मंदिर परिसरात भजनाचा गजर होईल. औपचारिक उद्घाटनानंतर डॉ. भरत बलवल्ली यांच्या नेतृत्वाखाली पं. मकरंद कुंडले, प्रसाद करंबेळकर, अमर ओक, दादा परब आणि गोविंद भगत या नामवंत कलाकारांची ‘भक्तिसंगीत’ मैफल रंगणार आहे.
उत्सवाची सुरवात ५ जुलैला पारंपरिक शाकाहारी पदार्थांच्या स्वयंपाक स्पर्धेने होणार आहे. त्यात स्थानिक महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. त्यानंतर ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या भक्तिपर संगीत कार्यक्रमाद्वारे वातावरण अधिक पावन होणार आहे. मुग्धा गावकर, हृषिकेश साने, अनय घाटे, उत्पल सायनेकर, केदार धामस्कर आणि गोविंद गावठणकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार ‘विठ्ठलवारी’ या भक्तिगीतांचे सादरीकरण करणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.