Goa Politics: मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत हे भलतेच नशीबवान आहेत; खरी कुजबूज...

विरोधकांकडे अनेक विषय आहेत; परंतु त्‍यांचा त्‍यांना ‘इश्‍‍यू’ बनवता आला नाही.
Chief Minister of Goa Pramod Sawant
Chief Minister of Goa Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

नशीबवान मुख्‍यमंत्री

मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत हे भलतेच नशीबवान आहेत. विरोधकांकडे अनेक विषय आहेत; परंतु त्‍यांचा त्‍यांना ‘इश्‍‍यू’ बनवता आला नाही. कला अकादमी प्रकरणात अनेक कोटींचा चुराडा झाला. शाहजहान प्रकरण विरोधी पक्षांना गाजवता आले असते. कला अकादमीसमोर विरोधी पक्षांचे किमान 50 जण 15 दिवस निदर्शने करायला उभे राहिले असते तर दिल्‍लीपर्यंत हे प्रकरण गेले असते. ‘आयआयटी’ प्रकरणातही सांगेतील शेतकऱ्यांच्‍या मागे कोणी उभे राहिले नाही. या भागाची विरोधी नेत्‍यांनी साधी परिक्रमा करून तेथील झाडे, वन्‍य पशु-पक्षी यांचा सर्व्हे हाती घेतला असता तरीही सरकारला दरदरून घाम फुटला असता. परंतु, कुणालाही हा विषय हाती घ्‍यायचा नाही. विरोधात भाजप असता तर या विषयावर सरकार निश्‍चित गडगडले असते. त्‍या दृष्‍टीने मुख्‍यमंत्री नशीबवानच आहेत. ∙∙∙

तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा थांगपत्ता नाही

तृणमूल काँग्रेस गोव्याच्या राजकीय मैदानात मोठा गाजावाजा करून आले होते, परंतु निवडणुकीचा निकाल आल्यानंतर त्यांची हवाच निघून गेली आहे. त्यात शेवटच्या क्षणाला इतर पक्षातून तिकीट नाकारलेल्या अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश करून तृणमूलच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, परंतु निवडणुकीचा निकाल झाल्यापासून ही मंडळी भूमिगत झाली आहे. काही आपल्या मतदारसंघातच नव्हे, तर सोशल मीडियावरूनदेखील गायब आहे. केवळ निवडणूक लढविण्यासाठी ही मंडळी पक्षात आली होती का? अशी चर्चा रंगली आहे. ∙∙∙

(Chief Minister Pramod Sawant is very lucky Political Gossip in goa)

Chief Minister of Goa Pramod Sawant
Silly Souls Restaurant Goa: 20 ऑक्टोबर रोजी होणार ‘सिली सोल्स’चा निर्णय

रवींची भेट आणि औपचारिकता

भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी काल संध्‍याकाळी गोव्‍यात पोहोचले. गेले दोन ते तीन महिने ते येथे पोहोचले नव्‍हते. त्‍यामुळे काँग्रेस पक्षातून आठ जणांनी भाजपात प्रवेश घेतला व त्‍यानंतर घडलेल्‍या अनेक घडामोडींचा त्‍यांना पत्ता नाही. किंबहुना आठजण भाजपात आले तो निर्णय दिल्‍लीत पक्षश्रेष्‍ठींनी घेतला होता. त्‍याची खबरही रवी यांना देण्‍यात आली नाही. रवी आज मंत्री, आमदार व भाजपच्‍या सुकाणू समितीचीही बैठक घेणार आहेत. रवी यांना आजच कर्नाटकात परत जायचे आहे. त्‍यामुळे या सगळ्या बैठका 15 ते 20 मिनिटांच्‍याच असतील. त्‍यात फारसे काही घडणार नाही, याची जाणीव सरकारमधील सर्वांना आहे. परंतु, त्‍यातील एक औपचारिकता म्‍हणून रवींना तोंड दाखवायला येतील. ∙∙∙

शहाभेटीने आत्‍मविश्‍वास दुणावला

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. सावंतांचा आत्‍मविश्‍‍वास सध्‍या बराच वाढला आहे. गोव्‍यात आता खाणींसंदर्भात निर्णय घेण्‍याचे अधिकार त्‍यांनाच देण्‍यात आले आहेत. अमित शहा यांना भेटल्‍यावरही त्‍याच आत्‍मविश्‍‍वासाने ते गोव्‍यात परतले. मंत्रिमंडळ विस्‍तारासंदर्भात पक्षश्रेष्‍ठींनाही काही घाई नाही. त्‍यामुळे सावंतांवरही कोणता तणाव दिसत नाही. वेळ येईल तेव्‍हा मी आत्‍मविश्‍‍वासाने समोरचा पूल ओलांडून जाईन, या आविर्भावात ते आहेत. ∙∙∙

सत्तेचा रंग महत्त्वाचा!

आपल्या पदावर टांगती तलवार आल्याने सध्या म्हापसा नगराध्यक्ष मॅडम या विविध राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत अशी चर्चा आहे. दुसरीकडे सत्ताधारी पालिका मंडळात आपल्याविरोधात असंतोष असल्याने तो शमविण्यासाठी किंबहुना हा राजीनाम्याचा मुद्दा इतरत्र वळविण्यासाठी सध्या तीन नगरसेवकांनी कथित हफ्ता मागितल्याचा विषय परस्पररीत्या समोर आणल्याची चर्चा सत्ताधारी नगरसेवकांत सुरू आहे, पण प्रत्यक्षात काय खरे व काय खोटे हे देवा परमेश्वरालाच माहिती. मात्र, एक गोष्ट नक्की की, झेंड्याचा रंग कुठलाही असला, तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा! ∙∙∙

Chief Minister of Goa Pramod Sawant
Goa News: पोर्तुगीज दस्तावेजांमुळे तपासकामात अडथळा

देव तारी त्याला कोण मारी?

कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांना विरोधी पक्षनेते म्हणून सभापतींनी मान्यता दिल्यास पंधरवडा होत आला. कर्नाटकात राहुल गांधींच्या भेटीनंतर गुरुवारी युरींचे बंगळुरू येथून गोवा विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी त्यांना नेण्यासाठी त्यांची खाजगी गाडी आली होती. सरकारने दिलेली गाडी अवघ्या १० दिवसांत मोडकळीस आल्याने सध्या गॅरेजमध्ये दुरुस्‍तीसाठी पाठवली असल्याचे समजले. आश्चर्याची बाब म्हणजे माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबोंना दिलेले सुरक्षारक्षक व अंगरक्षक अजून काढून न घेतल्याने म्हणे युरींना अद्याप पोलिस सुरक्षारक्षक व अंगरक्षक मिळालेले नाहीत. कदाचित कॉंग्रेसच्या फुटीर आठ आमदारांनाच पोलिस संरक्षणाची जास्त गरज असल्याचे सरकारला कळले असावे. युरींचे समर्थक म्हणतात, ‘युरींना पोलिस संरक्षणाची गरज नाही. देव तारी त्याला कोण मारी?’ ∙∙∙

बदनामी कुठंपर्यंत

नेत्रावळी गाव आता खूपच गाजू लागला आहे. अटल आदर्श ग्रामचे कार्य पर्रीकर सरकार असताना सुरू केले होते. तो विचार आता बाजूला पडल्याचा संशय बळाऊ लागला आहे. सोशल मीडियावर चेअरमन असलेल्या सुभाष वेळीप यांची धुलाई केली जात असताना चेअरमन स्वतः खुलासा करत नाहीत आणि सरकार अटल आदर्श ग्रामचे भिजत घोंगडे सावरत नाही, सात वर्षे चेअरमनपद बदलले जात नाही आणि गावात काही विकास केला जात नसल्याची टीका सुरू असताना सगळेच तोंड बंद करून असल्यामुळे टीका केली जात आहे, ती सत्य असल्याचा संदेश जनतेत पोचला असून सरकारने चेअरमनपद बदलले तर सरकारची फजिती होईल आणि बदलले नाही तरीही फजिती होणारच की. आता पाहुया बदनामी कुठंपर्यंत खपवून घेतली जाणार ती. ∙∙∙

लुईझिनबाब ‘नॉट आऊट’

काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांना पक्षाने राज्यसभेवर पाठवले होते, परंतु विधानसभा निवडणुकीत फातोर्ड्यातून लढण्यास नकार दिल्यानंतर तृणमूल पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज होत्या. एवढेच नव्हे, तर फालेरो यांना पायउतार होण्याचा आदेश येऊ शकतो अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती, परंतु असे काहीही घडलेले नसून फालेरो हे अजूनही आपल्या पदावर कायम आहेत. राज्यसभा खासदार म्हणून ते एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत आपण कुठेच जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतल्याची चर्चा सुरू असून लुईझिनबाब ‘नॉट आऊट’ आहेत. ∙∙∙

सरकारचा पाठिंबा कोणाला?

सध्या गोव्यातील फुटबॉलमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे. चर्चिल आलेमाव यांचा पुत्र सावियो याच्यासमोर दोनापावला येथील उद्योजक कायतान जुझे फर्नांडिस यांनी प्रबळ आव्हान उभे केले आहे. दोन्ही गट विजयाचा दावा करत आहेत, त्याचवेळी राज्यातील फुटबॉलच्या विकासासाठी राज्य सरकारचा, पर्यायाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आपल्यालाच पाठिंबा आहे असे आलेमाव व कायतान यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क असलेले क्लब बुचकळ्यात पडले आहेत. सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार नेमके कोणाच्या बाजूने आहे याचा म्हणे शोध सुरू आहे. प्रत्यक्षात, ज्याचे पॅनल गोवा फुटबॉल संघटनेत सत्तारूढ होईल त्याची सरकारकडून पाठराखण असे एकजण म्हणाले. खरे-खोटे मुख्यमंत्रीच जाणे...∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com