Goa Ganesh Chaturthi 2023: फोंडा शहरातील चतुर्थीचा मुख्य बाजार पूर्वीच्याच ठिकाणी बुधवारपेठ मार्केट संकुल परिसरातील रस्त्यावर भरणार असून बागायतदार भवन ते वरचा बाजार बसथांब्यापर्यंत वाहतूक बंद करण्यात येईल, अशी माहिती फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली.
फोंडा पालिकेच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीत अन्य विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. फोंड्यातील प्रसिद्ध चतुर्थीचा बाजार यंदा कुठे भरणार याबाबत साशंकता निर्माण झाली होती. कधी बुधवारपेठ मार्केट संकुल रस्ता तर कधी मार्केटच्या मागे असलेल्या ओरबिंदो रोड रस्त्यावर हा चतुर्थीचा बाजार भरवला जात होता. मात्र, यंदा हा बाजार पूर्वीच्याच ठिकाणी बाजार संकुलातील मुख्य रस्त्यावर भरवण्यात येणार आहे.
त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली असून फोंडा बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसगाड्या व इतर वाहने भवानी सदनला वळसा घालून वरचा बाजार भागातील विठोबा मंदिराजवळील रस्त्यावरून जाणार आहेत. बागायतदार भवन ते वरचा बाजार बसथांब्यापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक बंदी असेल. त्यामुळे विक्रेते व ग्राहकांना खरेदीत सोयिस्कर ठरेल. या बैठकीला नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच उपनगराध्यक्ष व इतर नगरसेवकांसह कृषिमंत्री रवी नाईक उपस्थित होते.
फोंड्यातील डेंग्यूची स्थिती काय आहे, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर सध्या डेंग्यू नियंत्रणात असून पूर्वीचेच संशयास्पद रुग्ण आहेत. मात्र, त्यात वाढ झाली नाही, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली. डेंग्यूचा तसेच मलेरियाचा फैलाव होऊ नये यासाठी नुकतीच फोंड्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे एक बैठक झाली होती,
त्यात आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय झाला होता, सध्या तरी फोंड्यात डेंग्यू नियंत्रणात आहे, तरीही लोकांनी खबरदारी घ्यावीअसे आवाहन पालिका मंडळाने केले.
भारताने चांद्रयान मोहीम यशस्वी केल्याबद्दल फोंडा पालिकेतर्फे केंद्र सरकार तसेच वैज्ञानिकांचे अभिनंदन करण्यात आले. चांद्रयान मोहीम फत्ते झाल्याने भारताने अभिमानास्पद कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले असून जागतिक स्तरावर देशाचे कौतुक होत आहे, त्यामुळे या मोहिमेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक म्हणाले.
पालिकेजवळ उभारणार बालोद्यान
फोंडा पालिकेच्या बाजूला असलेल्या जमिनीत बालोद्यान उभारण्यात येणार असून या बालोद्यानात मुलांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णयही यावेळी झाला. या ठिकाणी तेरा हजार चौरस मीटर जमीन बालोद्यानासाठी निर्धारित करण्यात आली आहे, त्यावर बैठकीत चर्चा झाली.
नोव्हेंबरपर्यंत स्मशानभूमी तयार...
फोंड्यातील मुक्तीधाम स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू असून हे काम पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरमध्ये ही स्मशानभूमी खुली करण्यात येईल, अशी माहिती फोंडा पालिकेतर्फे देण्यात आली.
गैरसोयी असल्याने मुक्तिधाम स्मशानभूमीचे काम हाती घेण्यात आले होते, ते आता पूर्णत्वास येत असल्याचे सांगण्यात आले.
कृषिमंत्र्यांकडून शुभेच्छा
फोंडा पालिका बैठकीला उपस्थित फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी सर्वांना गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा गणराया सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो, असे रवी नाईक म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.