पणजी: राज्यात (Goa) गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धामधूम सुरू असतानाच शहरे खास करून पणजीत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. सुनसान रस्ते, रिकाम्या बाजारपेठा, बंद दुकाने आणि मोकळे थिएटर्स आणि हॉटेल्स असा माहौल शहरातून फिरताना दिसून येत आहे.
राज्यात गणेशोत्सवाच्या काळात हीच परिस्थिती असते. मात्र, त्याची प्रखरता रविवारी जास्तच दिसून येते. कारण गणेशोत्सवाच्या काळात रविवारी ख्रिश्चन बांधवही घरी राहाणे पसंत करतात. त्यामुळे सध्या रस्त्यावर आणि पर्यटन स्थळांवर दिसतात ते केवळ निवडक पर्यटकच.
शहरांत राहणाऱ्या नागरिकांचे मूळ गावात आहे. शिवाय राज्यातल्या आस्थापनात काम करणारे कामगार, चाकरमानीही गणेशोत्सवाच्या काळात गावचा रस्ता धरतात. त्यामुळे शहरे सुनसान बनली आहेत. वाहतूक मंदावल्याने सिग्नल चालू असूनही सिग्नलवर वाहने नाहीत, असे दिसून येते. बाजारपेठांचीही अशीच अवस्था आहे. बाजारपेठेतील फळ आणि भाजी विक्रेते मुस्लिम आहेत. त्यांनी दुकाने सुरू ठेवली आहेत. मात्र, तेही हताशपणे ग्राहकांची वाट पाहात आहेत. मासळी बाजाराचीही तीच स्थिती आहे. फिश मार्केटमध्ये मासे घेऊन बसणारे विक्रेते आहेत. मात्र, तेही ग्राहकांची वाट पाहताना दिसत आहेत.
हॉटेल्स बंद, तुरळक वर्दळ
राज्यातील हॉटेलांची स्थितीही तशीच आहे. रविवारी कॅफे भोसले बंद होते. कॅफे आरामने गणेशोत्सवाची संधी साधत दुरुस्तीचे काम काढल्याने तेही बंद होते. गुजराती लॉजसमोरील कॅफे गुजराती, सरोवर आणि मिश्रा पेढा ही हॉटेल्स सुरू असली तरी तिथेही पर्यटक वगळता नागरिकांची ये-जा थंडावलेली दिसली. रविवारी अनेक छोटी हॉटेल्स बंद होती. पणजी शहरात मनोरंजन हब असलेल्या आयनॉक्समध्ये इतर व्यवहार बंद असल्याने केवळ पर्यटकांनी जाणे पसंत केले. मात्र, थिएटर्सही मोकळीच होती. दिवसभरात 20 शो झाले, त्यांना एकूण मिळून 219 रसिक म्हणजे प्रत्येक शो ला केवळ दहा रसिकांची उपस्थिती होती.
"गोव्यात पर्यटनाच्या निमित्ताने यापूर्वी खूप वेळा आलो आहे. मात्र, इतकी नीरव शांतता कधीच पाहिली नव्हती. कदाचित कोरोनामुळे ही स्थिती असेल. मात्र, हळूहळू पर्यटक येतील. सध्या अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे आम्ही रस्त्यावरचेच खाणे पसंत केले."
- रोमिल रंजन, पर्यटक, दिल्ली.
"आम्ही मैत्रिणी मिळून गोव्यात आलो असून आम्हाला येथे येऊन तीन दिवस झाले. जुने गोवे येथील चर्च बघायचे होते. मात्र, तेही बंद होते. सध्या अनेक हॉटेल्स बंद असल्याने खाण्या-पिण्यावर खूपच निर्बंध आले आहेत. मात्र, गर्दी नसल्याने मोकळेपणाने फिरता येत आहे."
- प्रीती सामरा, पर्यटक, बंगळुरू.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.