राजेंद्र पां. केरकर
गोवा: दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 1969 साली मोले अभयारण्यातील पेयजलांच्या स्रोतांचे रक्षण करण्याच्या दूरगामी हेतूने अधिसूचना काढली. 1978 साली येथील सधन जंगलातील 107 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाला मोले राष्ट्रीय उद्यानाचा तर उर्वरित 133 चौरस किलोमीटर क्षेत्राला महावीर अभयारण्याचा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 द्वारे दर्जा लाभला होता.
सांगे तालुक्यातील काही गावांना वगळून गोवा सरकारने धारबांदोडा तालुक्याची निर्मिती येथील लोह खनिज उत्खननाला चालना लाभावी म्हणून केली. परंतु 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने 88 खाणींच्या 72 परवान्यांचे नूतनीकरण स्थगित ठेवले तेव्हाच धारबांदोडा तालुक्याबरोबर गोव्यातील बहुसंख्य जनतेला पेयजल आणि प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या स्रोतांचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर येथील तत्कालीन वन परिक्षेत्राधिकारी परेश परोब यांनी लावलेल्या कॅमेऱ्यामुळे 14 मे 2019 रोजी मोलेच्या जंगलात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले.
मोले राष्ट्रीय उद्यान आणि महावीर अभयारण्य क्षेत्राच्या कक्षेत येणारा दूधसागरचा धबधबा हा देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणबिंदू ठरलेला आहे. दरदिवशी शेकडो जीपगाड्या निरंतर या जंगलातून येजा करत असतात. वाघीण बछड्यासह याच जंगलात वावरत असल्याने वन खात्याच्या वन्यजीव विभागाचे येथील वन परिक्षेत्राधिकारी डॉ. सिद्धेश नाईक यांनी १ एप्रिल रोजी मोले ग्रामपंचायतीला पत्र पाठवून दक्षता घेण्याचे आवाहन केलेले आहे.
पट्टेरी वाघाच्या संचारामुळे येथील पर्यटक जीपगाड्यांवर निर्बंध घातले नसले तरी पदभ्रमण आणि गिर्यारोहणाबरोबर गुरा-ढोरांना जंगलात चरण्यास नेऊ नये असे आवाहन वन खात्याने केले आहे. येथील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि राखीव जंगल क्षेत्राच्या अस्तित्वाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असल्याने पट्टेरी वाघांबरोबर अन्य वन्यजीवांनाही पदोपदी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. याबाबत वर्तमानपत्रे आणि दृकश्राव्य माध्यमांद्वारे बऱ्याच कपोलकल्पित बातम्या प्रसिद्ध होत असल्याने गैरसमज निर्माण होत आहेत.
आपल्याला कायदेशीररीत्या संरक्षित करण्यात आलेल्या वनक्षेत्रातच वाघांनी वावर करणे ही गोव्यातील काही घटकांची अपेक्षा आहे. मात्र ती त्यांच्यासाठी तापदायक ठरत असल्याने याविषयीचा गैरसमज शिगेला पोहोचला आहे. मुख्य वनसंरक्षक संतोष कुमार यांनी मोलेला काल रविवारी भेट देऊन वाघांच्या संरक्षणासाठी खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
दोन बछड्यांसह वाघीण
दर चार वर्षांनी केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत भारतीय वन्यजीव संस्था डेहराडूनच्या मार्गदर्शनाखाली जी व्याघ्रगणनेची प्रक्रिया गोव्यात सुरू आहे, त्याअंतर्गत सध्या मोलेच्या जंगलात पट्टेरी वाघीण दोन बछड्यांसह फिरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. राष्ट्रीय महामार्ग, भारतीय रेल्वेमार्गाच्या प्रकल्पांमुळे मोलेतील नैसर्गिक अधिवासावरती प्रतिकूल परिस्थिती आलेली असताना, जेथे तृणहारी जंगली श्वापदांच्या पैदासीला पोषक जंगल क्षेत्र लाभले, तेथेच ही वाघीण आपल्या बछड्यांसह संचार करत असल्याचे दिसून आले आहे.
वाघ सुरक्षित राहिला तरच...
गोव्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या बहुतांश लोकसंख्येला पेयजलाचा पुरवठा करणाऱ्या जंगलात अन्नसाखळीत शिखरस्थानी असलेला पट्टेरी वाघ सुरक्षित राहिला तरच हवामान बदल, जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या वर्तमान आणि भविष्यकालीन प्रतिकूल परिस्थितीत संरक्षण होणार आहे. त्यामुळे या वनक्षेत्राचे संवर्धन करण्याबरोबरच आपल्या संरक्षणासाठी गोमंतकीयांनी दक्ष रहाणे गरजेचे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.