
वाळपई: यावर्षी काजू बियांना सुरवातीच्या काळात १६१ रुपये असा प्रति किलो दर होता. हा दर वाढून १७० पर्यंत दर जाईल अशी अपेक्षा काजू उत्पादक बाळगून होता. मात्र मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात केवळ १ रुपया वाढविल्याने दर १६२ असा प्रति किलो झाला. हा दर आजही तेवढाच आहे.
यावर्षी केवळ एक रुपयानेच दरात वाढ झालेली आहे. प्रारंभी चांगला दर मिळाला असला तरी दरवाढ मिळेल ही शेतकऱ्यांची अपेक्षा बारगळली आहे. आता दमट हवामान, वातावरणात होत असलेले बदल, अवकाळी पावसामुळे काजूचा मोहर जळालेला आहे.
सत्तरी तालुक्यात काही गावात काजूचे चांगले उत्पन्न मिळाले आहे, तर काही ठिकाणी काजू उत्पन्न घटल्याचे चित्र आहे. दरवर्षी रामनवमी किंवा पुढे येणारा हनुमान जन्मोत्सवपर्यंत काजू पीक मिळत असते. पण या वर्षी सत्तरीत बऱ्याच ठिकाणी तसे चित्र नाही. मागील दोन चार दिवसांपासून उत्पन्नात घट आलेली पहावयास मिळते आहे.
त्यात खेती व अन्य वन्य प्राण्यांमुळे पिकाचे नुकसान होत आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे, उस्ते, तार आदी भागातील काजू बागायतीत फिरल्यास काजू बिया खाऊन त्याची टरफले जमिनींवर पडलेली दिसत आहेत. याचा मोठा फटका काजू उत्पादकांना बसत आहे.
काजू बियांना सरकारकडून आधारभूत किंमत दिली जाते, पण अशी किंमत नुकसानकारकच ठरत आहे. सरकारने २०० रुपयांपर्यंत असा निश्चीत हमीभाव ठरविला तर ते शेतकऱ्यांचे फायद्याचे ठरणार आहे. त्यासाठी हमीभाव हा निश्चित केला पाहिजे. याबाबत तत्काळ कार्यवाही आवश्यक आहे, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.