

पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने नव्याने केलेल्या आरोपांची क्राईम ब्रॅंचकडून सध्या सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे गरज पडल्यास तिची नार्को चाचणी करण्याची तयारीही पोलिसांनी चालविली आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी शनिवारी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीशी संवाद साधताना दिली.
‘‘पूजा नाईकने ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात नव्याने केलेल्या आरोपांची संपूर्ण चौकशी करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यांतर्गत (बीएनएसएस) आम्हाला १४ दिवसांचा कालावधी मिळाला आहे. या कालावधीत ही चौकशी पूर्ण केली जाणार आहे.
पूजा नाईकने नव्याने जे दावे केले आहेत, त्यातील काही दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत आणखी सखोल चौकशी केली जात आहे’’, असे गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.
त्यानंतर आता ‘‘पुढील काही दिवसांत पूजाने केलेल्या दाव्यांबाबत आणखी चौकशी केली जाईल. गरज पडल्यास तिची नार्को चाचणी करण्याची तयारीही पोलिसांनी केली आहे’’, असे गुप्ता म्हणाले.
पूजा नाईक हिने या प्रकरणात विद्यमान वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांची नावे घेतली आहेत.
यात पूजाने सुदिन ढवळीकर यांना थेट पैसे दिले नसल्याचा दावा केला आहे. परंतु, देसाई आणि पार्सेकर यांना १७.६८ कोटींची रक्कम पोहोचवल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्यात येणार नाही, असे राहुल गुप्ता यांनी याआधीच सांगितले आहे.
दरम्यान, गतवर्षी राज्यात गाजलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात विद्यमान मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या एका मंत्र्यासह एक आयएएस अधिकारी आणि पीडब्ल्यूडीच्या अभियंत्याला १७.६८ कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट पूजा नाईक हिने केला होता.
त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. पण, या प्रकरणात सहभागी असलेल्यांची नावे घेण्याचे तिने टाळले होते. तो मंत्री आणि ते अधिकारी कोण? असा प्रश्न सर्वांकडूनच उपस्थित होत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना, ‘‘या प्रकरणात मंत्री सुदिन ढवळीकर, आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर हे गुंतले असल्याची चर्चा जनतेत आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या तीन नावांबाबत स्पष्टीकरण द्यावे’’, अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी पूजा नाईकने प्रसार माध्यमांसमोर या तिघांचीही नावे उघड केली. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार, याची उत्कंठा सर्वांना लागून राहिली आहे.
मगोपच्या कार्यालयात काम करताना सरकारी नोकऱ्या मिळवून देण्यासाठी लोकांकडून पैसे घेतल्याचा आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांनीच आपली ओळख निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर यांच्याशी करून दिल्याचा दावा पूजा नाईकने केला आहे.
त्यामुळे हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न मंत्री सुदिन ढवळीकर, पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर आणि इतर काही नेत्यांनी सुरू केला आहे. पूजा मगोपच्या कार्यालयात कधीच कामाला नव्हती, असे सांगत दीपक ढवळीकर यांनीही पूजा नाईकला खोटे ठरवले आहे. तर, मगोपचे नाव घेत पूजा जनतेची दिशाभूल करीत असल्याचा दावा पक्षाचे पदाधिकारी करीत आहेत.
१ संशयितांकडून सत्य जाणून घेण्यासाठी नार्को टेस्ट केली जाते. ही चाचणी फॉरेन्सिक तज्ज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ इत्यादींच्या उपस्थितीत केली जाते.
२ चाचणीत आरोपीला काही औषधे दिली जातात, ज्यामुळे त्याचे जागृत मन सुप्तावस्थेत जाते. त्यामुळे कानावर पडणाऱ्या गोष्टींविषयी विचार करून उत्तर देण्याचे संशयिताचे कौशल्य कमी होते. काही प्रकरणांमध्ये आरोपी बेशुद्धावस्थेत जातो, तेव्हा सत्य जाणून घेता येत नाही.
३ या चाचणीत आरोपीला सोडियम पेंटोथॉलचे एक इंजेक्शन दिले जाते. या औषधाला ‘ट्रुथ ड्रग’ म्हणूनही ओळखले जाते. हे औषध दिल्यामुळे व्यक्ती एका वेगळ्याच अवस्थेत जाते. ती पूर्णतः शुद्धीत असत नाही किंवा बेशुद्धही होत नाही. या स्थितीत व्यक्तीला फारसे बोलता येत नाही. या स्थितीत व्यक्ती खोटे बोलत नाही. त्यामुळे तपास पथकाला वस्तुस्थितीपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. यात संशयित तांत्रिक गोष्टींचा विचार करू शकत नाही. त्याची विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे व्यक्ती जास्त प्रमाणात किंवा गतीने बोलू शकत नाही.
सरकारच्या मान्यतेनंतर केवळ देसाई आणि पार्सेकर यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्यात येईल, असे गुप्ता यांनी म्हटले होते. त्याबाबत विचारले असता, ‘‘या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच देसाई आणि पार्सेकर यांच्याविरोधात ‘एफआयआर’ नोंदवण्याबाबत सरकारकडे अर्ज केला जाईल. त्यास सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतरच ‘एफआयआर’ दाखल करून त्यांची चौकशी सुरू केली जाईल’’, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.