फोंडा/पणजी : आपेव्हाळ-प्रियोळ येथील गुरुदास गावडे यांच्या तक्रारीवरून समोर आलेले कथित नोकरी विक्री गौडबंगालाचे लोण संपूर्ण प्रियोळ परिसरात पसरले असून, एकूणच ही ठकसेनांची ‘कलानगरी’ बनली असल्याचे समोर आले आहे.
पूजा नाईक प्रकरणामागोमाग समोर आलेल्या दीपश्री सावंत गावस प्रकरणात आपली मध्यस्थ म्हणून करोडोंची फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन म्हार्दोळ पोलिस स्थानकात आलेले माशेल-प्रियोळ येथील रहिवासी, तथा तक्रारदार संदीप परब यांच्यावरच हे प्रकरण शेकण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.
तक्रारदार परब हे जलस्रोत खात्याचे कनिष्ठ अभियंता असून, त्यांनी स्वत:हूनच सरकारी नोकरी खरेदी-विक्री प्रकरणात मध्यस्थ म्हणून गुंतलो असल्याचे जाहीर केल्याने त्यांची दक्षता खात्याकडून चौकशी केली जाणार आहे.
नोकऱ्या विक्री प्रकरणाच्या चौकशीदरम्यान दीपश्री सावंतच्या एका मित्राला फोंडा पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले होते. नंतर एका राजकीय व्यक्तीने त्याला आपल्याकडील खासगी सेवेतून दूर केले असून तो राहात असलेला माशेल येथील कोट्यवधींचा अलिशान फ्लॅट चर्चेत आला आहे. त्यातच बाणस्तारी बाजार गाळेवाटप प्रकरणात वादग्रस्त ठरलेले भोम-अडकोणचे सरपंच दामोदर नाईक यांचे नाव मध्यस्थ म्हणून पुढे आल्याने ही ‘एजंटगिरी’ प्रियोळ परिसरात उघडपणे सुरू होती हे जाहीर झाले आहे.
खांडोळा पंचायतीचे एक पंच सदस्य ‘एजंट’ म्हणून काम करीत असल्याचा संशय असून त्याचे नाव अद्याप पोलिसांसमोर आलेले नाही. नोकऱ्यांसाठी पैसे प्रकरण गोवाभर गाजले आहे. शेकडो युवक आणि युवतींची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीत राजकारण्यांच्या जवळची माणसे गुंतल्याचे समोर येत आहे. तरीही प्रियोळच्या आजी-माजी आमदारांना त्याचा गंध कसा काय लागला नाही, असा प्रश्न प्रियोळ परिसरातील लोकांना पडला आहे. राजकारण्यांनी तूर्तास ‘वेट ॲण्ड वॉच’ भूमिका घेतली आहे.
मुख्य सूत्रधार पूजा नाईक आणि दीपश्री सावंत गावस यांच्या चौकशीत पोलिसांसमोर अनेक मध्यस्थांची नावे येत होती; पण पोलिस त्यांची जाहीर वाच्यता करीत नव्हते. त्यातच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात गुंतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची गय करणार नाही, असे जाहीर करताच इतर मागास वर्ग आयोगाचे एक शिपाई श्रीधर सतरकर यांनी आत्महत्या केली, तर दीपश्री सावंत गावस हिचे मध्यस्थ संदीप परब हे आपल्यामार्फत करोडोंची फसवणूक झाल्याची यादीच घेऊन सार्वजनिकरित्या समोर आल्याने पोलिसांची पुरती गोची झाली आहे. हा घोटाळा करोडोंच्या वर जाऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधिकृत स्पष्टीकरण दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नव्याने समजलेल्या माहितीनुसार, माशेल येथील संदीप परब याने दीपश्रीने ४४ लोकांचे सुमारे पावणेचार कोटी रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यात भोम-अडकोणचे सरपंच दामोदर नाईक यांचेही नाव आहे. मात्र, दामोदर नाईक यांनी तगादा लावल्याने ५८ लाख रुपये संदीपने परत केले. सरपंच नाईक यांची म्हार्दोळ पोलिस तसेच पणजीच्या इकॉनॉमिक सेलच्या पोलिसांनी जबानी घेतली आहे. नाईक यांनी संदीपकडे दिलेले सर्व पैसे परत मिळाल्याचे सांगितले आहे. संदीप परब हा जलस्त्रोत खात्यातील अधिकारी असून या खात्यातील काहीजण गळाला लागल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील मास्टर माईंड दीपश्री सावंत गावस ही सध्या फोंडा पोलिसांच्या ताब्यात असून म्हार्दोळ पोलिसही दीपश्रीला अटक करणार आहेत. पैसे देऊनही काम होत नसल्याने या प्रकरणात अडकलेल्या लोकांनी पैशांसाठी संदीप परबकडे तगादा लावल्याने दीपश्रीने २५ लाख रुपये संदीपकडे दिले होते, तर संदीप परब याने सुमारे ८० लाख रुपये काहीजणांना परत केले आहेत.
१. आतापर्यंत सार्वजनिक स्वरूपात पुढे आलेल्या माहितीवरून सूत्रधार आणि त्यांचे मध्यस्थ यांचे एकमेकांशी तसेच कोणत्या ना कोणत्या राजकारण्यांशी असलेले नातेसंबंध समोर आले आहेत.
२. पूजा नाईक ही जुने गोवे येथील रहिवासी असली तरी ती पूर्वाश्रमीची सावईवेरे येथील असून तिचे नाव ‘रूपा पालकर’ असे होते. ती प्रियोळ येथे एका राजकारण्याची सक्रिय कार्यकर्ती होती.
३. तिचे मध्यस्थ अजित सतरकर आणि मयत श्रीधर सतरकर हे दोघेही प्रियोळ परिसरातील असून ते तिचे माहेरकडून नातेवाईक आहेत. अजित सतरकर हे एका माजी आमदाराचे चालक होते.
४. कुर्टी-फोंडा येथील आयआरबी पोलिस सागर नाईक आणि माशेल येथील विद्यालयातील शिक्षिका सुनीता शशिकांत पावसकर यांच्यातील नाते मामी-भाचा असे आहे.
५.ठकसेन दीपश्री सावंत गावस ही माशेल येथील विद्यालयातील पालक-शिक्षक संघाची सदस्य होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.